Monday, February 17, 2014

बोलती जे अर्णब

...आणि आपण सगळेच
लेखांक ९७



सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य

बोलती जे अर्णब 
टीव्ही वरच्या मालिका, त्यांचे एपिसोड्‌स्‌, त्यांचं टी.आर्‌.पी. रेटिंग वगैरेबद्दल खरंतर मी लिहीत नाही. पण या आठवड्यात झालेला एक एपिसोड खरोखरच इतका अफलातून होता, की त्याविषयी लिहिणं भाग आहे. आज पुलं आपल्यात असते तर म्हणाले असते, फार फार वर्षांत इतका मनापासून खळखळून हसलेलो नाही.
      या नव्या तुफान विनोदी मालिकेचा पायलट एपिसोड प्रक्षेपित करण्यात आला, अर्णब गोस्वामीनं घेतलेली राहुल गांधींची मुलाखत.
      आधीच अर्णब गोस्वामी, प्राईम टाईम वृत्तवेळेचा रॉक्‌ स्टार. तो रोज रात्री सरासरी सहा ते आठ जणांना बोलावून भाषण देतो. त्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण अनेक जण पाहून पाहून अती मनोरंजित होतो. त्याच्या कार्यक्रमात बोलावलेल्या ६/८ जणांना वाटत असतं की राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या कोणत्या तरी विषयावरच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्याला बोलावलंय. बिचार्‍यांना माहीत नसतं की खरी अंदर की बात असते, अर्णब गोस्वामीला त्याचं भाषण ऐकायला हक्काचा रोज वेगवेगळा श्रोतृवृंद हवा असतो. कारण प्रेक्षक कार्यक्रम पाहतील, न पाहतील ६/८ जणांना चर्चेत सहभागी होण्याच्या नावाखाली बोलावलं की त्यांना तास-दीड तास त्याचं आक्रमक, आरडाओरडाग्रस्त भाषण ऐकावंच लागतं. त्यांनाही आपला चेहरा टीव्ही वर दिसतोय याचं समाधान लाभतं. त्या समाधानातच ते आपल्याला बोलण्याची संधी केव्हा मिळेल याची वाट पाहात तास-दीड तास थांबतात. थांबला तो संपला इतका साधा संदेश त्यांना समजलेला नसतो. ज्यांना समजलेला असतो ते पॅनेल सदस्य दुसर्‍याच्या थांबण्याची वाट न पाहता, अन्‌ स्वत: अजिबातच न थांबता आरडाओरडा करतात, त्यांना वाटत असतं, ते बोलताय्‌त. पण एका वेळी ३/४ जण बोलत असतात. दुसर्‍याला मध्ये तोडत असतात. मैफलीमध्ये कसलेले बुवा जसं तंबोर्‍यावरच्या पोरांना मध्येच एक-दोनदा ताना मारू देतात तसा अर्णब गोस्वामी या पॅनेल-पोर्‍यांना थोडंसं बोलू देतो. बुवांनी सम पकडली की पोरांनी गप्प बसायचं असतं (तंबोरा खाजवत : इति पुलं!) तसं अर्णब गोस्वामीनं बोलायला सुरुवात केली की बाकीच्यांनी गप्प बसायचं असतं. नाहीतर मी तुमचा मायक्रोफोन बंद करीन असं तो सांगतो. काही वेळा चुकून किंवा खरंच, बोलणार्‍याचा मायक्रोफोन बंद होतो, ते बोलणार्‍याला कळत नाही, तो बोलत राहतो, हातवारे करत राहतो - प्रेक्षकांना चांगलं कार्टून पाहायला मिळतं.
    
  एखाद्याचा चेहरा टीव्ही वर दिसतो म्हणजे तो कुणीतरी मोठा माणूस असला पाहिजे अशी खात्री भारतातच नाही, सर्व जगभर आहे. नेटवर्क चित्रपटातल्या टीव्ही अँकर असलेल्या पत्रकार हॉवर्ड बील ला वाटतं की आपल्याला साक्षात ईश्वरानं थेट दर्शन दिलंय आणि सार्‍या विश्वाला सांगण्यासाठी अंतिम सत्याची अंतिम आवृत्ती आपल्या हातात ठेवलीय. तर भारावलेला हॉवर्ड बील ईश्वराला विचारतो, व्हाय मी... ईश्वर त्याला उत्तर देतो बिकॉज्‌ यू आर ऑन टीव्ही, डमी.
      असं अर्णब गोस्वामीला ईश्वर अंतिम सत्याच्या एकेका अंशाची आवृत्ती बहाल करून सांगतो ही सार्‍या विश्वाला सांग. मग अर्णब गोस्वामी आरडाओरडा करत, चवताळून चवताळून, समोरच्याच्या अंगावर जोराजोरात धावून जात ते सत्य सार्‍या विश्वाला सांगतो. असं आरडाओरडा करत बातम्या देण्यात त्याची स्पर्धा राजदीप सरदेसाई, बरखा दत्त वगैरेंशी आहे. पूर्वी पुण्यात संध्याकाळच्या वेळी एक पेपर निघायचा. तो विकण्यासाठी नेमलेले पोर्‍ये रस्त्यावरून, हात उंचावत, त्या उचललेल्या हातामध्ये पेपर फडकावत तार स्वरात ओरडायचे, पुणे स्टेशनवर एक मर्डर, पुणे स्टेशनवर एक मर्डऽऽऽर. पुढे तंत्रज्ञान बदललं. टीव्ही, केबल, सॅटेलाईट, इंटरनेट आलं. पुण्यातल्या इतर अनेक सांस्कृतिक संस्थांप्रमाणे (उदा. टांगा) ही संध्याकाळच्या आरडाओरड्याची संस्था कायमची बसली. पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातला चार्म हरवला. त्याला नव्या डिजिटल स्वरूपात परत आणलाय अर्णब गोस्वामी अँड कं. नं.
      असा हा अर्णब गोस्वामी.
      भारताच्या राजघराण्यातला लेटेस्ट राजपुत्र राहुल गांधीची मुलाखत घेणार. म्हंजे टी.आर्‌.पी. रेटिंग छप्पर फाडके वर जाणार हे काय वेगळं सांगायला हवं?
     भारताची स्वातंत्र्योत्तर सत्ता ही नेहरू-गांधी घराण्याची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. हिंदू वारसा कायद्यानुसार त्याची विल्हेवाट कशी लावायची याची कलमं आखून देण्यात आलीत. त्यानुसार मुलीला वडिलोपार्जित संपत्तीत समान वाटा आहे. पण आपल्या सांस्कृतिक संकेतांनुसार सर्व हक्क घरातल्या पहिल्या  -थोरल्या मुलाकडे जातात, त्याचबरोबर घराण्याचे कुळधर्म-कुळाचार पाळण्याची जबाबदारीही थोरल्या मुलाकडे, पुरुषाकडे असते. मुलीनं सासरी गेल्यावर फारतर आईचा किंवा भावाचा मतदारसंघ सांभाळायचा असतो. आता हजारो वर्षं चालत आलेल्या या सांस्कृतिक प्रथा आहेत, त्याला राहुल गांधी तरी काय करणार? राहुल गांधीनं काही स्वत:च्या चॉईस्‌नं या घराण्यात जन्म घेतलेला नाही. मग आपल्या पूर्वकर्मानुसार आपल्या वाट्याला आलेल्या संचिताला धीरोदात्तपणे सामोरं जाणं हेच शहाण्या पुरुषाचं काम आहे.
      ते राहुल गांधीनं केलं, अर्णब गोस्वामीला धीरोदात्तपणे सामोरं जात.
      आज नाथांची उणीव फार जाणवतेय. आत्ता असते तर त्यांनी आली आली हो भागाबाईच्या चालीवर भारताच्या राजकारणाचं भारूड रचलं असतं. शाहीर साबळे आणि कोरसचीही उणीव भासतेय. भोवती तोंडपुज्या भाटांची संख्या खूप आहे. शाहीरांचीच उणीव जाणवतेय. छाती ताणून ज्यांचे पवाडे रचावेत, गावेत असे शिवाजी महाराज तरी कुठेय्‌त? उरतं सगळं आली आली हो भागाबाईचं भारूड. शाहीर साबळे त्यांच्या भरदार ग्रामीण ठसक्यात नाथांच्या शब्दांना जिवंत करतात - तिनं लुगडं आणा म्हंटलं की पाठोपाठ कोरस म्हणतो आऽऽऽणलं. तिनं नथ आणा म्हंटली, आणली...
      तसा राहुल गांधीनं, लोकपाल आणा म्हंटलं - आऽऽऽणला. त्यानं RTI आणा म्हंटलं... आणला, त्यानं अध्यादेश कचरापेटीत टाका म्हंटलं - टाकला, त्यानं जैन समाजाला अल्पसंख्यांक दर्जा द्या म्हंटलं - दिऽऽऽला!
      आता अशा या युवकांचं आशास्थान असलेल्या राहुल गांधींची मुलाखत घेणं काही साधी गोष्ट नाही राव. त्याला अर्णब गोस्वामीचं काळीज हवं. काय प्रश्न विचारायचे - काय नाहीत, त्यांना काय उत्तरं आली पाहिजेत याचं नीट स्क्रिप्ट तयार करायलाच हवं की. शिवाय राजघराण्याच्या ज्येष्ठ पुत्राशी बोलायचं म्हणजे अदबशीर बोलायला हवं. एकदम वेगळाच अर्णब गोस्वामी पाहायला मिळाला - सौम्य, खालच्या सुरात बोलणारा, हातवारे, आरडाओरडा न करता डायलॉग डिलिव्हरी करणारा. एकदम शत्रुघ्न सिन्हानं (आनंदमधल्या) अमिताभसारखा अभिनय करावा, तशी अर्णब गोस्वामी आपल्या अभिनयाची रेंज सिद्ध करून दाखवली. काही पॉईंटेड प्रश्न विचारले त्यानं, पण एरवी जसा तो उरावर बसून बुक्क्या मारत राहातो, तसं केलं नाही त्यानं. किंबहुना ज्या प्रश्नांची उत्तरं राहुल गांधीकडून वदली पाहिजेत असे पूर्वतयार प्रश्न विचारल्यासारखं वाटावं अशा रितीनं त्यानं प्रश्न विचारले. त्याला तितक्याच तोलामोलानं आधी तयार केलेली उत्तरं राहुल गांधींनी सादर केली.
      माझ्या शैक्षणिक कामात मी युवकांना चांगली मुलाखत कशी द्यावी, हे शिकवायचा प्रयत्न करतो. आय कॉंटॅक्ट ठेवा, पोपटपंची केल्यासारखी उत्तरं देऊ नका, नीट विचार करून आपलं प्रामाणिक उत्तर द्या, येत नसेल तर माफ करा, मला माहीत नाही असं सौजन्यानं सांगा, पॅनेललाच प्रतिप्रश्न विचारू नका... मुख्य म्हणजे थापा मारू नका. पण हे सर्व IAS, IFS, IPS इ... फालतू सेवांसाठी. सर्वोच्च पंतप्रधानपदाच्या उमेदवाराकडून इतकी सर्व उथळ तयारी अपेक्षित नाही! त्यानं आय कॉटॅक्ट ठेवला नाही तरी चालतं. प्रश्न काहीही विचारला तरी RTI, Women’s Empowerment, भ्रष्टाचार, Youth, System Change - अशीच पोपटपंची केलेली चालते. अर्णब गोस्वामीनंही समजुतदारपणे विचारायचं नसतं की १० वर्षं सरकार तुमचंच आहे - काय केली सिस्टिम चेंज - आत्ता का बोलताय सिस्टिम चेंजबद्दल? राहुल गांधी म्हणत राहिले - आम्ही RTI आणला. माझ्यापासून आण्णा हजारेंपर्यंत आम्हाला वाटत राहतं माहितीचा हक्क जनआंदोलनामुळे मिळाला, तर जनआंदोलनामुळे लोकपाल मिळाला नाही. राहुल गांधींना निवडणूक पद्धत बदलायचीय, पक्षात उमेदवारांची निवड अधिक लोकशाही पद्धतीनं करायचीय - कोणी थांबवलंय आजपर्यंत?
      इतक्या छान, खेळीमेळीच्या परस्पर समजुतीत चाललेल्या, आखीव रेखीव मुलाखतीत, अर्णब गोस्वामीनं, १९८४ मध्ये इंदिराजींच्या हत्त्येनंतर दिल्लीमध्ये झालेल्या शिखांच्या हत्त्याकांडाचा प्रश्न कसा काय उपस्थित केला, याचं मला आश्चर्य वाटतं.

      कदाचित या दु:खद अध्यायाची नीट सांगता करण्याची संधी मिळावी - राहुल गांधी आणि कॉंग्रेसला - असा शुद्ध हेतू असेल.
      पण स्टेडियमच्या बाहेर मारावा या अपेक्षेनं (मॅच फिक्सिंगची गती गहन आहे) बॉलरनं टाकलेल्या लोंबत्या चेंडूवर बॅट्‌स्‌मनची लाईन चुकावी, आणि जोरात घुमवलेली बॅट स्वत:च्याच स्टंपवर येऊन आदळावी, तसं झालं राहुल गांधींचं. शिखांच्या हत्त्याकांडात कॉंग्रेसच्या नेत्यांचा सहभाग होता का आणि आता आज एवढ्या वर्षांनंतर त्यावर तुम्हाला काही म्हणायचंय का असं अर्णब गोस्वामीनं विचारलं.
      नोव्हेंबर १९८४ मध्ये दिल्लीत शिखांचं शिरकाण झालं. त्यात  एच्‌.के.एल्‌.भगत, धर्मवीर शास्त्री, सज्जनकुमार, जगदीश टायटलर इ... कॉंग्रेसी नेत्यांचा सहभाग दिसून आलाय. शिखांच्या हत्त्याकांडाबाबत स्वत: पंतप्रधानांनी क्षमा मागितलेली आहे. पण हे न सांगता राहुल गांधी म्हणाले गोध्रानंतर २००२ साली गुजरातमध्ये जे घडलं त्यापेक्षा, इंदिराजींच्या हत्त्येनंतर १९८४ मध्ये दिल्लीत जे घडलं ते वेगळं आहे. दिल्लीत, सरकार शिखांचं हत्त्याकांड रोखायचा प्रयत्न करत होतं. (राजीव गांधी म्हणाले होते, मोठा वृक्ष कोसळला की भोवतीची जमीन उखडली जाणारच की), तर गोध्रानंतर गुजरात सरकार दंगलींना प्रोत्साहन देत होतं. शीखविरोधी दंगलींचा आजपर्यंत नीट तपास झालेला नाही, कसले आयोग कधी नेमले नाहीत. काहीच नेत्यांचे गुन्हे सिद्ध झाले. गुजरातमधल्या शोकात्म गोध्रा-कांडनंतर नानावटी, बॅनर्जी इ... आयोग अनुक्रमे राज्य आणि केंद्र सरकारांनी नेमले. सर्वोच्च न्यायालयानं SIT नेमून चौकशी केली. आता १९८४ च्या शीखविरोधी दंगलीबद्दल २८ वर्षं उलटून गेल्यावर, आपनं SIT नेमण्याची मागणी केली आहे.
      ३१ ऑक्टोबर १९८४ ला इंदिराजींची हत्त्या झाली त्या दिवशी मी दिल्लीत होतो. पंतप्रधान निवासापासून ५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या गांधी शांती प्रतिष्ठानमध्ये राहात होतो. त्याआधी ६ वर्षं पंजाबमध्ये पेटलेल्या फुटीरतावादी खालिस्तान चळवळीच्या विरोधात अल्पसं काम करत होतो. पंजाबमध्ये दहशतवादी प्रदेशातून पदयात्रा करत होतो. पंजाबी भाषा आणि गुरुमुखी लिपी शिकून सर्वसामान्य शीख-हिंदू समाजांशी संवाद साधायचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी पंजाबमधल्या कॉंग्रेसच्या अंतर्गत राजकारणात दरबारासिंग विरुद्ध ग्यानी झैलसिंग, यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात संत म्हणवणार्‍या खालिस्तानवादी जर्नेलसग भिंद्रावालाचं बळ वाढवलं. अकाली दलावर मात करायला कॉंग्रेसनंच भिंद्रावालाचा भस्मासुर जोपासला. खेळकर आणि दिलदार असलेल्या पंजाबनं अंधार्‍या काळरात्रीसारखा रक्तरंजित अध्याय पाहिला. भांगड्याचे ताल थांबले होते. सूर्यास्तानंतर कर्फ्यूग्रस्त पंजाब काळोखात मिटून जात होता. जून १९८४ मध्ये साक्षात सुवर्णमंदिरावर सैनिकी कारवाई करून दहशतवाद्यांच्या ताब्यातून सुवर्णमंदिर मुक्त करावं लागलं होतं. (तेंव्हा राहुल गांधी किती वर्षांचे होते बरं!) मुळात पराक्रमी आणि देशभक्त (मराठी माणसाप्रमाणेच) असलेल्या शीख समाजात असंतोषाची प्रचंड लाट उसळली होती. पण ऑपरेशन ब्लू स्टार आणि इंदिराजींच्या हत्त्येनंतर घडलेलं शिखांचं हत्त्याकांड यातून सावरत पंजाब आणि भारत, नव्या उमेदीनं उभे राहिले. कारण शीख समाजावर सखोल संस्कार आहेत - दहा गुरुंचे. दसवे पातशहा असलेल्या गुरु गोविंदसिंगांचे. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेला वारसा - मराठी माणसानं भारतासाठी लढायचं असतं - गुरु गोविंदसिंगांनी शिखांना दिलाय. हिंदू आणि शिखांमध्ये भेद नाहीत. सर्व प्रकारचे रोटी-बेटी व्यवहार होतात. कित्येक हिंदू घरांमधला थोरला मुलगा शीख होतो / असतो. या सखोल रुजलेल्या मुळांनी भारताची एकात्मता १९८० च्या दु:खद दशकात सांभाळली, जोपासली, वाढवली.
      निवडणुकीच्या, पक्षीय राजकारणाच्या उन्मादात पिग्मी पोलिटिशियन्स आणि त्यांच्यासमोर राजापेक्षा राजनिष्ठ असलेल्या उथळ माध्यमांनी या एकात्मतेच्या गळ्याला नख लावलं नाही, म्हणजे मिळवलं.



1 comment:

  1. १८५७ च्या स्वतन्त्रयुधात आणि आजच्या आम आदमी पार्टीच्या वागण्या बोलण्यात साम्य म्हणजे दोन्ही स्वतन्त्रयुधेच आहेत आणि दोन्ही लोकांवर अन्याय करणाऱ्या मुठभर सत्तेविरूद्ध ( सध्या आलटून पालटून ) आहेत . दोन्ही ठिकाणी जनता निकोप वातावरण मागत आहे ( तेंव्हा दडपशाहीमुक्त आणि आज भ्रष्टाचारमुक्त ) .
    आणि फरक म्हणजे १८५७ ला जनतेकडे 'शस्र ' हे एकमेव शस्र होते . आज विचार , मत , एकी अशी आधुनिक शस्रे आहेत . भूतकाळात नेतृत्वाचा अभाव दिसून आला आज तो जाणवत नाही . तेंव्हा सुशिक्षित लोकांनी दूर राहणे पसंद केले आज परिस्तिति बर्यापैकी विरुद्ध आहे. मात्र कळस म्हणजे उठाव दडपण्याची सरकारी पद्धत तीच राहिली . क्रूर बिमोड ( शक्य त्या सर्व मार्गांनी )!
    आणि आजही काही लोकांना (कॉंग्रेस आणि भाजपचे एजंट ) सामान्य माणसाकडे सत्ता न देण्याची प्रवृत्ती दाखविल्याशिवाय चैन पडत नाही . असो . मात्र सध्या निघणारे तात्पर्य देखील त्यावेळेस सारखे असणार आहे ते म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर होणारी वैचारिक जागृती . (आम आदमी पार्टीला यश मिळो अगर न मिळो !!!) .

    ReplyDelete