... आणि आपण सगळेच
लेखांक ८३
|
सामान्य नागरिकाच्या
दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य
जय जगत्
अनिवासी भारतीयांची
कहाणी
भारतीय माणूस (मराठी
सुद्धा) आता जगभर पसरला आहे. अमेरिकेत सर्वांत जास्त. पोटापाण्यासाठी, व्यवसायासाठी, चांगल्या जीवनमानासाठी
किंवा भारतातल्या अनेक गोष्टींना वैतागून भारतीय माणूस कुठेही
गेला तरी तो भारतीयच असतो (काही जण हे मान्य करतात, काही नाकारतात, काही त्यापासून पळ
काढत असतात) आणि माणूसही असतो. ‘माणूस’ तर जगभर सारखाच आहे, एक आहे. माणसाची नाळ
जुळलेली असते देशाशी, मातीशी, संस्कृतीशी. भारतीय माणूस जगभर कुठेही गेला
तरी त्याचं ‘जेनेटिक कोड’ - ‘भारतीय’ राहतं, त्याच्या खांद्यावर
भारताचा झेंडा असतोच. त्यानं तो खाली ठेवायचा म्हटलं तरी ठेवला जात नाही. असा
ज्यांना आपल्या खांद्यावरचा भारताचा झेंडा मान्यच आहे, ज्यांचा भारतासाठी जीव
तुटतो अशा अनेक अनिवासी अमेरिकी भारतीयांनी आयोजित केलेली परिषद : म्हणजे ‘इंडिया-३-२-१’.
अमेरिकेतल्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातलं एक
मुख्य गाव रॅले. शिक्षण-उद्योग-संशोधन या ‘ट्राय्अँगल’ त्रिकोणासाठी
प्रसिद्ध. तिथे ही परिषद होती - २१ आणि २२ सप्टेंबरला. त्यात बोलण्यासाठी
प्रश्नोत्तरांसाठी मला (आणि सुरेश प्रभूंना) निमंत्रित करण्यात आलं होतं.
अवकाशयानाच्या ‘टेक् ऑफ्’ - उड्डाणाचा जसा काउंट-डाऊन होतो - तसा आता
भारताचा टेक्-ऑफ् होतो आहे (झाला पाहिजे) म्हणून परिषदेचं शीर्षक ‘इंडिया-३-२-१’ (आणि आता, उड्डाण!) परिषदेच्या
विचारमंथनातून एक ‘थिंक् टँक’ तयार व्हावा, त्यात भारतीय आणि
अमेरिकन जाणकार असावेत, त्यांचा भारत-अमेरिका दोन्ही सरकारांशी
संबंध-संपर्क असावा, या ‘थिंक् टँक’नं विकासाच्या
धोरणांचा अभ्यास करावा, सूचना मांडाव्यात अशी सगळी या परिषदेमागची
संकल्पना होती.
अमेरिका, ब्रिटनसहित युरोप, ऑस्ट्रेलिया इ...
ठिकाणी अनिवासी भारतीय आता बर्यापैकी संख्येनं आहेत. त्यांच्या अनेक संघटना आहेत.
पण अनेक वेळा ते ‘भारतीय’ या नावानं एकत्र न येता - किंवा नाव असलं तरी, प्रत्यक्षात, तमिळ, मल्याळम्, तेलुगु, मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली... या स्वरूपात
एकत्र येतात. तेही अर्थात चांगलंच आहे. पण या परिषदेसाठी अमेरिकेतले सर्व भाषिक
भारतीय एकत्र आले होते. इतकंच नाही तर त्यात स्थानिक सरकारचाही सहभाग होता आणि हे
घडवून आणण्यामध्ये अमेरिकेतल्या मराठी माणसाचा पुढाकार होता. हे सगळंच चांगलंय.
आता परिषदेच्या उद्दिष्टांप्रमाणे पुढच्याही गोष्टी घडत गेल्या, तर दुधात साखर.
जगभर पसरलेला अनिवासी भारतीय समाज मुख्यत:
समृद्ध आणि रूढार्थानं यशस्वी आहे. पाठीवर बिर्हाड घेऊन, आपल्या जमिनीतून
उखडलेला माणूस इथे येऊन यशस्वी का होतोय याचे अनेक समाजशास्त्रीय अभ्यास झालेत.
त्यात एक समान अभिप्राय व्यक्त होतो. स्थिर कुटुंबव्यवस्था, वाढत्या वयात
मुलामुलींना आई-वडील दोघंही ‘मिळणं’, सरळमार्गानं कष्ट
करण्याचे संस्कार, असं सर्व ‘एथिक्’ मुलांना पुढे यशस्वी, प्रभावी ठरवतं.
वेदनादायक प्रश्न हा आहे की मग या ‘एथिक्’ला मूळ भारतातच काय
धाड भरते? तर त्याचं उत्तर मूळ प्रश्नापेक्षा जास्त वेदनादायक आहे.
भारतामध्ये जातीव्यवस्था, अकार्यक्षमता, भ्रष्टाचार, केंद्रीकरण असलेली
सरकारी धोरणं या सर्वांमुळे व्यक्तीची गुणवत्ता, उद्यमशीलता ‘किल्’ केली जाते. नरडीचा तो
फास सोडून भारतीय माणूस ‘मुक्त’ व्यवस्थेत केला की
बहरतो. भारतातही नरडीच्या फासातून मुक्तता झाली तर भारत - भारतीय माणूस बहरेल.
स्वातंत्र्यानंतर पहिल्या टप्प्यात भारताला ‘ब्रेन ड्रेन’च्या समस्येनं ग्रासलं
होतं. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांचे गुलाम म्हणून जहाजं भरभरून भारतीय मळेवाले
कामगार जगभर गेले. फिजी, मॉरिशस, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीजची बेटं
मूळ भारतीय असलेल्या कामगारांनी भरून गेली. युगांडा, केनिया, टांझानिया, हॉंगकॉंग, सिंगापूरमध्ये भारतीय
व्यापारी वर्गानं स्थान मिळवलं. स्वातंत्र्यानंतर अभ्यासात हुशार असलेले, उच्चविद्याविभूषित
भारतीय देश सोडून जगभर मुख्यत: अमेरिका आणि युरोपमध्ये गेले. ‘ब्रेन ड्रेन’च्या या समस्येचं एक
सर्वांत उत्तम स्वरूप म्हणजे आय.आय.टी. भारतात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी
नेहरूंच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या या जागतिक दर्जाच्या संस्था. पण त्यातून
तयार होणारे सुमारे ८५% इंजिनियर्स देश सोडून
जात होते. ‘भारताचा कार्यकर्ता’ होण्याचं स्वप्न
बाळगणार्या मला, हा एक प्रकारचा ‘देशद्रोह’च वाटत होता. त्यापायी
सख्ख्या मोठ्या भावाशी माझं ‘भांडण’ होतं. तो इंजिनियर -
आय.आय.टी.-लॉस् एजेलिस मार्गावर गेला. (अर्थात त्याच्या मते मी अव्यावहारिक, आदर्शवादी मूर्ख! -
अन् ते मला मान्य आहे.)
ब्रिटनच्या प्रवासात एका विद्यार्थिनीनं
सांगितलेली गोष्ट मला विसरता येत नाही. मुळात घरात, शाळेत देशभक्तीचे
संस्कार घेतलेली ही बुद्धिमान, उच्चविद्याविभूषित ‘आई’ - तिच्या बाळाला घेऊन, भारत सोडून, ब्रिटनमध्ये पोचली - १५ ऑगस्ट १९७७ ला! ते सांगताना तिचं
सगळं अंत:करण ढवळून निघत होतं. आणि ऐकताना माझ्या पोटात पडलेला खड्डा अजून तसाच
आहे. अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका अत्यंत जवळच्या मराठी कुटुंबाला अमेरिकन
नागरिकत्व मिळाल्याच्या समारंभाला उपस्थित राहण्याची मला एकदा संधी मिळाली होती, न्यूयॉर्कमध्ये.
नागरिकत्व स्वीकारताना अमेरिकन राष्ट्रध्वजासमोर उभं राहून, अमेरिकेवर सर्व निष्ठा
ठेवण्याची प्रतिज्ञा घेताना, अशा अर्थाचे शब्द उच्चरायचे असतात, की मी माझ्या मागच्या
सर्व निष्ठा विसर्जित करत आहे. परत माझ्या पोटात खड्डाच खड्डा. काही मूळ
भारतीयांनी हे शब्द उच्चारायला जीभ रेटणार नाही, म्हणून नागरिकत्वाच्या
समारंभाला न जाता, केवळ कागदपत्रांवर सह्या करून भागवलेलं आहे. त्यानं आशय
बदलत मात्र नाही. मला काही असामान्य बुद्धिमान माणसं माहीती आहेत की त्यांनी, हे शब्द उच्चारावे
लागतील म्हणून शक्य असून सुद्धा अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलं नाही.
अर्थात ज्या देशात राहायचं तो देश, त्याची संस्कृती, भाषा, कायदा यावर निष्ठा
ठेवलीच पाहिजे. जगभरचा भारतीय माणूस यासाठी प्रसिद्ध आहे. तो जातो तिथे एकरूप होऊन, मिळून मिसळून राहतो -
तो फक्त आपापसात भांडतो! आणि देश, त्याची संस्कृती, कायदा यावर निष्ठा न
ठेवता राहू देणारा एकमेव देश - म्हणजे, मेरा भारत महान!
पण या ‘ब्रेन ड्रेन’मध्ये एक संधी लपलेली
आहे हे राजीव गांधींनी ओळखून त्याला ‘ब्रेन ट्रस्ट’ ही संज्ञा वापरली.
अत्याधुनिक विषयामधल्या तज्ज्ञतेचा साठा आहेत अनिवासी भारतीय. त्यांच्या
तज्ज्ञतेचा, कुशलतेचा देशाच्या हितासाठी वापर व्हायला हवा, तर ‘ब्रेन ड्रेन’चं रूपांतर ‘ब्रेन ट्रस्ट’मध्ये झालेलं दिसेल.
पुन्हा आय.आय.टी. च आदर्श उदाहरण ठरतं. भारतामध्ये योग्य संधी, योग्य व्यवस्था उपलब्ध
झाल्यावर आधी देश सोडून जाणार्या आय.आय.टी.यन्स्नी देशाची शान वाढवणारी कामगिरी
अनेक क्षेत्रांत करून दाखवली आहे. माहिती-तंत्रज्ञानात (IT) - संगणक क्षेत्रात भारताला जागतिक नकाशात
मुख्य स्थान मिळवून देण्यात आय.आय.टी.यन्स्चा वाटा सिंहाचा आहे.
अनिवासी भारतीयांचं भारतात परतणं - भारताच्या
विकासात सहभागी होणं साजरं करण्याचं प्रतीक म्हणून ‘प्रवासी दिवस’ पाळण्याची सद्बुद्धी
सरकारला सुचली. तीही ९ जानेवारी, म्हणजे दक्षिण
आफ्रिकेतून गांधीजी ज्या दिवशी परतले (१९१५) तो दिवस. बदलांच्या
या मालिकेत तर ‘दुहेरी नागरिकत्वा’ची संकल्पना पुढे आली.
म्हणजे भारतीय नागरिकत्व न सोडता अन्य निवडक १६ देशांचं नागरिकत्व
स्वीकारता येतं. म्हणजे आता त्यांच्या किंवा माझ्या पोटात खड्डा
पडण्याचा प्रश्न नाही!
आता भारतानं धोरणं नीट आखली आणि अनिवासी
भारतीयांशी (इंडियन डायस्पोरा) नीट सुसूत्रीकरण घडवून आणण्याची व्यवस्था उभी
राहिली तर ते भारताचं बळ आहे. शिक्षण-उद्योग-संशोधन सर्व क्षेत्रांत अनिवासी
भारतीय महत्त्वाची भर घालू शकतात. एकीकडे भारतातला भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, जातीयता दूर करायला
अनिवासी भारतीय दबाव टाकू शकतात, तर दुसरीकडे जागतिक व्यापारावर अमेरिकेत, वॉशिंग्टन(डीसी)मध्ये
भारताच्या बाजूनं ‘लॉबिंग’ करण्यात त्यांची मोठी
भूमिका असू शकते. योजकस्तत्र दुर्लभ:. पण रॅलेच्या परिषदेत अर्धं पाऊल तरी पडलं हे
निश्चित.
Good to know that you were in Raleigh. Would like to follow up on the conference. I work and stay in Charlotte, not so far from Raleigh.
ReplyDelete