Friday, October 25, 2013

।। भवतू सब्ब मंगलम्‌ ।।


... णि आपण सगळेच

लेखांक ८

    


सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य


।। भवतू सब्ब मंगलम्‌ ।।
विपश्यना आणि सत्यनारायण गोयंका गुरुजी

(३० जानेवारी १९२४ ते २९ सप्टेंबर २०१३)
सत्यनारायण गोयंका गुरुजीगेले. जाताना ते ८९ वर्षांचे होते. आणखी ११ किंवा १११  वर्षं आपल्यातून गेले नसते तरी चाललं असतं. पण शरीर आहे ते कधी ना कधी तरी जाणारच. कधी जाणार खरंचंच कुणाच्या हातात नाही. पण जगतो आहोत तोवर तरी कसं जगायचं, हे आपल्या हातात आहे. आहे का? मला शंका आहे, पण असू शकतं. किंवा आपल्या हातात आहे असं गृहीत धरून जगणं जास्त विवेकनिष्ठआहे. खोल खोल उतरत गेलो तर जाणवेल की आपल्यापाशी दुसरा पर्यायच नाही. दैववादहा काही जगण्याचा पर्याय होऊ शकत नाही.
     तर गुरुजी ८९ वर्षांचं आयुष्य जगून गेले. कसं जगायचं - (कण्हत कण्हत की गाणं म्हणत : थँक्यू’ - कविवर्य मंगेश पाडगावकर) याचा स्वत: आदर्श घालून देत गुरुजी जगले. आणि गाणं म्हणत जगण्याची कला(Art of Living) सर्वांना शिकवत, एक दिवशी - म्हणजे २९ सप्टेंबरला - आपल्यातून गेले. बुद्धाचा अत्त दीपो भव’ - संदेश स्वत: जगून दाखवत, कसा जगायचा आपल्याला शिकवत गुरुजी गेले. बुद्धानं अनुसरलेली, पूर्णत्वाकडे नेलेली, काळाच्या ओघात विसरलेली विपश्यनात्यांनी आपल्या गुरुकडून शिकली, स्वत:च्या जीवनात विपश्यनासाधत पुढे सर्व जगाला शिकवली. त्यांच्या जाण्यानं पोकळी निर्माण होणार नाही (नाही तर अत्त दीपो भवला काही अर्थच उरणार नाही ना) एवढं तर कार्य उभं करून गुरुजी गेले. आता सर्वांच्याच जीवनात जेवढी विपश्यनाराहील, तेवढी त्यांच्या जाण्यानं वाटणारी पोकळी शिल्लक रहाणार नाही. पुन्हा विपश्यना विसरली तर जीवनच एक अस्तित्ववादी पोकळी बनून राहील.
    
ब्रह्मदेशातल्या (आता नाव म्यानमार) मंडाले - या मराठी माणसाला नीट माहीत असलेल्या ठिकाणी गोयंकाया मारवाडी व्यापारी घराण्यात त्यांचा जन्म झाला - ३० जानेवारी १९२४ ला. त्यावेळी त्यांनाच काय कुणालाच काय ठाऊक की २४ वर्षांनंतर याच तारखेला आधुनिक काळातल्या बुद्धाला एक माथेफिरू गोळ्या घालणार आहे. घराण्याच्या प्रथेप्रमाणे सत्यनारायण गोयंका व्यापारात शिरले. त्यांना मायग्रेन-डोकेदुखी-अर्धशिशीचा त्रास होता. कोणतेही दुसरे वैद्यकीय उपाय कामी येईनात तेव्हा कुणीतरी ध्यानधारणेकडे वळण्याचा सल्ला दिला. बौद्ध मठातले एक ज्येष्ठ गुरु उ बा खिन (१८९९-१९७१) प्राणायाम आणि बौद्ध ध्यानाचा प्रकार - विपश्यनाशिकवतात, त्यानं डोकेदुखी बरी होऊ शकते असं कळल्यामुळे ते उ बा खिन यांच्याकडे गेले. शारीरिक डोकेदुखीसारख्या ऐहिक, भौतिक कारणासाठी विपश्यनाशिकवायला खिन गुरुजींचा बहुदा विरोध असावा. बहुदा त्यांच्या मते बुद्धाची विपश्यनाअस्तित्वाची डोकेदुखी (अस्तित्व : एक डोकेदुखी!) दूर करायला आहे, केवळ शरिराच्या अर्धशिशीकरता विपश्यनाशिकवणं त्यांना उथळ वाटलं असावं. म्हणून आधी त्यांनी नकार दिला. मग सत्यनारायण गोयंकांमधला बुद्धत्यांनाही जाणवला असावा.
     त्यांनी शिष्य स्वीकारला. डोकेदुखीवरच्या उपायासाठी विपश्यनेकडे वळलेल्या सत्यनारायण गोयंकांचं सर्व जीवनच बदललं. म्हणजे ज्ञानोबाच्या संगे तुका बिघडला । तुका बिघडला विठ्ठलचि झालाअशी त्यांची अवस्था झाली. वयाच्या ३१ व्या वर्षी - म्हणजे १९५५ मध्ये डोकेदुखीचं निमित्त होऊन विपश्यनेकडे वळलेले सत्यनारायण गोयंका पुढे १४ वर्षं गुरुकडे राहिले. भारतासहित सर्व जग विपश्यना विसरलेलं होतं. गुरुकडे एक तप अधिक दोन वर्षं तपश्चर्या करून, सत्यनारायण गोयंका आता गुरुजीबनून भारतात परतले १९६९ मध्ये. विपश्यना शिकवण्यासाठी त्यांनी १९७६ मध्ये इगतपुरीला केंद्र स्थापन केलं - अशा कामांना महाराष्ट्राची भूमी सुपीक आहे, याचा मला आनंद वाटतो. आता पुढच्या ३५ वर्षांत इगतपुरीचं केंद्र विपश्यनाचं जागतिक मुख्यालय झालंय. ४० पेक्षा जास्त देशांमध्ये विपश्यनेची जवळजवळ २०० केंद्रं आहेत. त्यात ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया पासून अनेक विकसनशील आणि अविकसित देशही आहेत. आणि हो, अमेरिकेत सुद्धा - हे तर लक्षात ठेवून सांगायलाच हवं - कुठल्याही गोष्टीला अमेरिकेत मान्यता मिळाल्याशिवाय आपल्या सध्याच्या भारतीय मेंदूला भारतीय संकल्पना महान वाटत नाहीत ना! स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचा विजय असो!
     विपश्यनेनं आता भारतासहित जगभर अक्षरश: लक्षावधी जीवनांना स्पर्श केलाय, दिशा, अर्थ आत्मदीपदाखवलाय. तिहार जेलच्या इन्स्पेक्टर जनरलअसताना किरण बेदींनी गुन्हेगारांना विपश्यना शिकवली. कट्टर गुन्हेगारांची जीवनं बदलली, उदाहरणार्थ खुनाच्या गुन्ह्याकरता जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी म्हणतो माझ्या हातून खून झाला हे बरं झालं, कारण त्यामुळे तिहारच्या तुरुंगात आलो, म्हणून विपश्यनाशिकता आली! त्याचा अर्थ विपश्यना शिकण्यासाठी सर्वांनीच खून करून तुरुंगात जावं असं नाही. स्वत:कडे आणि सर्व अस्तित्वाकडे अलिप्तपणे समबुद्धीनं बघण्याची क्षमता नसेल तर जन्मच एक तुरुंग आहे!
     शिवाय सध्या तिहारसहित सर्वच तुरुंगांमध्ये विपश्यना शिकवली जाते का याची माहिती घ्यायला हवी. चार्ल्स शोभराजसहित इतर अनेक अट्टल गुन्हेगारांवर विपश्यनेचा चांगला परिणाम झाल्याचं आपल्याला माहीतिय्‌, पण ए.के.राजा, कनिमोळी, सुरेश कलमाडी अँड कं. (आता लालूप्रसाद यादव!) विपश्यना शिकले की नाही माहीत नाही. फक्त, हे लोक इतके पोचलेले आहेत की ते विपश्यना बिघडवतील, ‘मुक्तीसुद्धा विकत घेतील आणि निर्वाणाचा धंदा करतील. तरी हा धोका पत्करून सुद्धा मला वाटतं की लोकसभेत विपश्यनेचा वर्ग चालायला हवा, नाहीतरी संसदेत ध्यानस्थ बुद्ध सर्व राड्याकडे बघत स्मितहास्य करतो आहेच.
     तुका म्हणे त्यातल्या त्यात महाराष्ट्र सरकारनं मात्र अधिकृत जी.आर्‌. काढून सर्व सरकारी कर्मचारी-अधिकार्‍यांनी विपश्यनाशिकावी अशी व्यवस्था केली.
     अहाहा! हे वाक्य लिहायला मला किती किती म्हणून बरं वाटतंय काय सांगू तुम्हाला! महाराष्ट्र सरकारनं एखादी गोष्ट बरोबर केली, योग्य केली, हे म्हणण्याची संधी इतक्या कमी वेळा मिळते की जणू महाराष्ट्र सरकारनं एखादा योग्य निर्णय घेतला म्हणजे राजापूरची गंगा प्रकटली किंवा ब्रह्मकमळ उमललं! महाराष्ट्र सरकारनं योग्य निर्णय घेतला असं म्हणण्याची अशीच वेळ आणि संधी आम्हाला पुन्हा पुन्हा लाभो! ही प्रार्थना कुणा चरणी करायला हवी?
     विपश्यनाशिकण्याचा बेसिक कोर्स १० दिवसांचा असतो. महाराष्ट्र सरकारचा जी.आर्‌. सर्व कर्मचारी-अधिकार्‍यांना हा कोर्स करायला सुचवतो, केल्यास कोर्सचा १० दिवसांचा कालावधी ड्युटी कालावधीसमजला जाईल असं सांगतो - (अडव्हान्स्‌ इन्क्रिमेन्ट देत नाही, सॉरी!) अर्थात मी हा कोर्स १९९६ मध्ये, सेवेतून राजीनामा दिल्यावर केला! खरोखरच सर्व सरकारी कर्मचारी-अधिकर्‍यांनी (सर्व माणसांनीच, हा, किंवा श्रीश्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ्‌ लिव्हिगचा, किंवा अय्यंगार गुरुजींचा... वगैरे वगैरे - मुळात जीवनात आसनं, सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि ध्यान केल्यास) केल्यास प्रशासनाची गुणवत्ता कुठल्या कुठे जाईल याची मला खात्री आहे. भारत सरकारलाही २०१२ मध्ये गुरुजींना पद्मभूषणद्यायची सद्बुद्धी सुचली हे काय कमी आहे!
     नाही म्हटलं तरी मनात विचार येत रहातोच की या आणि अशा अनेक विधायक महान कार्याची मिडियाकाय आणि कितपत दखल घेतो. ३५-४० वर्षं विपश्यनेचं कार्य निरसलपणे चालू आहे - पण विविध मिडियामध्ये कधी ३५-४० ओळी नीट आल्याचं मला माहीत नाही. यापेक्षा नगरसेवकाच्या वह्या-वाटपाच्या कार्यक्रमाच्याही फोटोसहित कॉलमी बातम्या येतात. खून, बलात्कार, भ्रष्टाचाराच्या तर सनसनाटी बातम्या सततच जिभल्या चाटत असतात. किंवा विपश्यनेच्या या दीर्घ आणि प्रभावी कार्याची दखल घेण्याऐवजी जर इगतपुरीच्या आश्रमात एखादी नको ती घटना घडली असती (घडणार नाही, असा आपला माझ्या मनात विश्वास आहे - पण या विश्वासाला धक्का बसणार्‍याही घटना भोवती सतत घडतच आहेत) - तर मात्र प्रिंआणि इलेक्ट्रॉनिकमिडियात बारा दिवस तारस्वरात चर्चा आणि लाईव्हप्रक्षेपण चाललं असतं. भारतीय (बहुदा जगभर) मिडियाला एक निगेटिव्ह’ - नकारात्मक वळण आहे. पत्रकारांच्या प्रशिक्षणात, ‘बातमीकशाला म्हणतात - हे शिकवताना सांगितलं जातं, की डॉग बाईट्‌स्‌ मॅन’ - कुत्रा माणसाला चावतो - ही बातमी - न्यूजनाही, कारण ही नॉर्मलगोष्ट आहे - पण मॅन बाईट्‌स्‌ डॉग’ - माणूस कुत्र्याला चावला - की न्यूजहोते. मग सगळी दृष्टी - पर्स्पेक्टिव्हच तसा बनून जातो. कुत्र्याला चावणार्‍या माणसांच्या बातम्या करता करता माणूसपणाच जागा करणार्‍या कार्यांकडे दुर्लक्ष होतं. शिवाय आता टी.आर्‌.पी. आणि जाहिरातींचा महसूल. आणि हे सर्व कमी आहे म्हणून की काय आता तर पेड न्यूजचा जमाना. म्हणजे आधीच मर्कट, त्यात विंचू चावला, त्यावर मद्य प्याला!
     अर्थात कुणी निंदा कुणी वंदा । आमचा आपला कीर्तनाचा धंदाम्हणत विपश्यनेचं कार्य शांतपणे, व्रतस्थपणे चालू असतं. स्वत:चा प्रकाश स्वत:च हो - हो, म्हणजे काय, की तुझ्यातच तो प्रकाश, ते बुद्धस्वरूप आहे, पण त्यासाठी तू दृष्टी आत वळवायला हवी.
     कशी वळवायची? किती सोपं सांगून ठेवलंय. तुझे आहे तुजपाशी । परि तू जागा चुकलासी. काही, बाहेरची तीर्थक्षेत्रं धुंडाळत, व्रतवैकल्यं, कर्मकांड करत किंवा अंधश्रद्धांची आराधना करत वणवण भटकण्याची गरज नाही. ठायीच बैसोनी करा एकचित्त’. ‘विपश्यनासांगते आहेस तिथे शांत बैस. डोळे मीट. ज्ञानेंद्रियांवर संवेदनांचा सतत बाहेरून होणारा आघात आवरता घेतला की दृष्टी आत वळते. मग तू काही करायचं नाहीये. विविध विचार येतील, येऊ देत. जातील. जाऊ देत. तू त्यांच्यावर भाष्य करू नको, त्यात गुंतू नको, ये म्हणू नको, जा म्हणू नको, का आलास विचारू नको, किंवा थांब की म्हणू नको. मनाच्या सर्व गतिविधींकडे साक्षी भावानं, अलिप्तपणे पहा - की झाली वि+पश्यना. सोपं साधन आहे, श्वासावर लक्ष दे. फक्त लक्षच. जसा श्वास येतो जातो तसा तो येऊ दे. तू लक्ष दे. जाणीव - Awareness - तुला आतला प्रकाश दाखवेल, तुझ्यातल्या बुद्धस्वरूपाची ओळख तुला पटवून देईल.
     अज्ञानाला अहंकाराचं आवरण घालून भाष्य करणारे काही इतिहासकार, विचारवंत म्हणतात अध्यात्माच्या नादाला लागून भारत भौतिक विकासाकडे दुर्लक्ष करतो, या सर्व जगाला भ्रम, माया म्हणतो म्हणून मागे पडतो, सतत पराभूत होतो. की म्हणे बुद्धाचा विचार पलायनवादी, निराशावादी आहे. असं म्हणणार्‍यांनी कधी बुद्धाकडे पाहिलेलं नाही. नाही तर त्यांना जीवन समजलेल्या बुद्धाच्या शाश्वत हास्यात मोनालिसापेक्षा महान अर्थ दिसले असते. जीवन दु:खमय आहे आणि दु:खाचं कारण तृष्णाआहे एवढं म्हणून थांबला असता तर बुद्ध पलायनवादी, निराशावादी ठरला असता. तृष्णेच्या ओरिजिनल सिन्‌मुळे माणूस पापीच आहे आणि दु:खमय जीवनाला कन्डेम्ड्‌आहे असं म्हणत बुद्ध, सेंट ऑगस्टीन किंवा सार्त्र, काम्यूचा सहकारी झाला असता. पण बुद्ध दु:खमुक्तीचा विवेकनिष्ठ अष्टांग मार्ग दाखवतो. तो  पलायनवादी, निराशावादी, नियतीवादी, जीवनाकडे पाठ फिरवणारा कसा ठरेल. उलट जीवन समजल्यामुळे सर्व दु:ख पचवून बुद्ध सतत स्मितहास्यच करतो. सर्व चेहर्‍यांवर स्मितहास्य फुलवतो. तेंव्हाच इस दुखियारे जगत में, सबका मंगल होय रेया प्रार्थनेनं प्रारंभ होणारी विपश्यनाआपोआपच आपल्याला सर्वांनाच भवतु सब्ब मंगलम्‌च्या मुक्कामावर घेऊन जाते.

5 comments:

  1. सर खुप दिवसांनी तम्हाला वाचतोय, काहीतरी निसटलेले पुन्हा गवसलय असे वाटतेय. सर खुप खुप आभार तुमच्या शब्दांसाठी.

    ReplyDelete
  2. Sir tx for treat.sir tumach sagala likhan blog var taka..tumachyach shabdat sangaych tar tyamule maharastrach bhal hoel.

    ReplyDelete
  3. लेख आवडला . सर!
    सर्व शासकीय सेवकांना भरती नंतर "विपश्यना " सक्तीची झाली पाहिजे.
    आय. ए. एस. प्रशिक्षणाचा अविभ्ज्य अंग हे प्रशिक्षण असले पाहिजे.
    असा सुदिन लवकर येवो...
    धन्यवाद!

    ReplyDelete
  4. tremendous pleasure reading it.Thank you sir!
    understanding Dharma(of which religion is subset) and our history may help us to build a positive self image for our nation,we need to get rid of colonial propogandist interpretations of history,(just stated all of which we learnt from you)

    ReplyDelete
  5. kya baat hai sir.. thank you so much मी हा लेख वाचला

    ReplyDelete