Friday, September 13, 2013

नरेंद्र दाभोळकर



...आणि आपण सगळेच
लेखांक ७९
 
 
सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य

नरेंद्र दाभोळकर
महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहेअसं गांधीजी म्हणाले होते.
     आज महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक जीवनावर काळजी वाटावी इतकी घनदाट काळोखी दाटून आलीय. रोज वाढत चाललेल्या आणि पद्धतशीरपणे वाढवल्या जाणार्‍या जातीय द्वेषानं महाराष्ट्राचं क्षितिजच नव्हे, आख्खं आकाशच काळवंडून गेलंय्‌ - हे काळोखलेलं आकाश निर्मितीच्या पावसाळी ढगांचं नाही, विध्वंसक, हिंसक वादळाचं आहे.
     तरी महाराष्ट्राचं कार्यकर्त्यांचं मोहोळअसणं अजूनही कायम आहे. समाजासाठी, देशासाठी समर्पणपूर्वक, निगर्वी, निरपेक्ष भावनेनं काम करणार्‍यांची फौजच्या फौज आजही महाराष्ट्रात आहे. भोवती सर्वत्र अनिर्बंध भोगवादाची आणि संवेदनाशून्य मध्यमवर्गीय आत्ममग्न आत्मतृप्त चंगळवादाची चलती असली तरी अजूनही साधी रहाणी उच्च विचारसरणी’, think global, act local असं करारीपणानं जगणार्‍यांची इरसाल सैन्यंसुद्धा महाराष्ट्रात अजूनही आहेत.
     नरेंद्र दाभोळकर अशा एका सैन्याचे सेनापती होते. २० ऑगस्टच्या सकाळी ७.१५ वा. ओंकारेश्वराच्या पुलावर मारेकर्‍यांनी त्यांची नियोजनपूर्वक हत्या केली. अशा हत्यांनी विचार आणि चळवळी संपत नसतात. उलट बलिदानानं उजळून निघालेल्या त्या विचार आणि चळवळींना आंतरिक बळ प्राप्त होत असतं.
     महाराष्ट्रात सामाजिक कार्याच्या क्षेत्रात एक घराणेशाही आहे. राजकारणातल्या, सत्तेचा भोग घेत, स्वत:ची तुंबडी भरून (ती दुबई, स्वित्झर्लंडमध्ये साठवून) देशाचं वाट्टोळं करणार्‍या घराणेशाहीपेक्षा ही त्यांची, सेवेची घराणेशाही कधीपण गौरवशाली आहे, अनुकरणीय आहे.
     उदाहरणार्थ आमटे घराणं. साधनाताई आणि बाबांनी या घराणेशाहीचा पाया रचला. त्यांची मुलं विकास आणि प्रकाश आपल्या पत्नीसहवर्तमान त्या पायावर सेवेची इमारत बांधताय्‌त. आता तर त्यांचीही मुलं, सुना अशी सलग तिसरी पिढी समर्थपणे समर्पणपूर्वक उभी रहाते आहे.
    तसे सगळे दाभोळकर बंधू. जसं स्वातंत्र्य लढ्यासंदर्भात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काव्य जगून दाखवलं होतं, ‘हे काय बंधु असतो जरी आम्ही सात’ - तर ते सर्वच्या सर्व स्वातंत्र्यासाठी मांडलेल्या यज्ञात समर्पण केले असते, तसे सर्व दाभोळकर बंधू स्वातंत्र्यानंतरच्या सामाजिक जडणघडणीसाठी समर्पित आहेत.
     ज्येष्ठ बंधू देवदत्त दाभोळकर. खरी गांधीवादी विचारसरणी जगलेले मूलगामी शिक्षणतज्ज्ञ, ज्यांच्या पुणे विद्यापीठाचे कुलगुरु असण्यानं विद्यापीठाचा सन्मान वाढतो असे खादीधारी कृतीशील विचारवंत. आता त्यांचे चिरंजीव प्रसन्न दाभोळकर ही घराणेशाही पुढे चालवू पहातात. मग कोल्हापूरला स्थायिक झाले होते असे थोर शेतीतज्ज्ञ श्री.अ. दाभोळकर. आम्ही त्यांना व्हेंचरानंदम्हणायचो. कारण ते शेती क्षेत्रातली एकाहून एक अजब साहसं सांगायचे पण आणि कृतीत आणायचे पण. बंगल्याच्या गच्चीवर शेती करण्यापासून ते गुंठे जिरायती कोरडवाहू जमिनीवर सुद्धा एका शेतकरी कुटुंबाचं पोट कसं भरू शकेल हे शास्त्रशुद्धरित्या सप्रयोग त्यांनी दाखवून दिलं. द्राक्ष आणि स्ट्रॉबेरीपासून फलोद्यान आणि फूलशेती (Horticulture and Floriculture) च्या विकासात
श्री. अ. दाभोळकरांचा वाटा फार मोलाचा, दिशादर्शक होता. त्यांच्या प्रयोग परिवारचं काम जवळून पाहून, समजावून घेतल्यावर मला वाटलं होतं की त्यांचं काम नोबेल पुरस्काराच्या योग्यतेचं होतं. पण गांधीजी आणि बाबा आमटेंप्रमाणेच श्री.अ. दाभोळकर सुद्धा भारतीयअसल्यानं आणि मदर तेरेसानसल्यामुळे त्यांचा विचार झाला नसावा. आता ते आपल्यात नाहीत त्याला काही काळ लोटला. पण दत्तप्रसाद दाभोळकर आहेत. त्यांची सगळी कारकीर्द एक उत्तम, जागतिक गुणवत्तेच्या शास्त्रज्ञाची. त्याच वेळी त्यांनी मराठीतून कसदार लेखन केलं, अजूनही करतात. ते निर्मितीक्षमपणे आपल्यात शंभर वर्षं असावेत.
     नरेंद्र दाभोळकर सुद्धा २० ऑगस्टच्या सकाळी वाजून १४ मिनिटांपर्यंत होते आपल्यात. यापुढेही असतील असं आपल्याला अपेक्षित होतं, गृहीत होतं. खूप पाणी घालून पातळ केलेलं मुळातलं अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक, अखेर जादूटोणा विरोधी विधेयकया नावानं का होईना पण संमत होऊन चळवळीचं अर्धं तरी पाऊल पडलेलं पहायला ते असतील असं आपण समजत होतो. नरेंद्र दाभोळकर हे सामाजिक चळवळीच्या गणितातले कॉन्स्टंटहोते. आता तूर्त तरी ते गणितच विस्कटलेलं आहे, त्याची नव्यानं पुनर्मांडणी करावी लागेल. अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकासाठी ते झगडले. संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवत, सर्वांना बरोबर घेत, त्यासाठी मूळ विधेयक बरंच सौम्य करतही त्यांनी विधेयकासाठी प्रयत्न केले. आज आणतो उद्या आणतो करत सत्ताधार्‍यांनी १५ वर्षं त्यांच्या तोंडाला पानं पुसली. आता त्यांच्या हत्येपासून २४ तासांच्या आत तेच विधेयक अध्यादेशाद्वारे आणलं. म्हणजे आणता आलं नं? मग आधी का नाही आणलं? यामध्ये सत्ताधार्‍यांची दुटप्पी वृत्ती दिसतेच. पण अंधश्रद्धांची पकड किती सखोल आणि सर्वदूर आहे हेही दिसतं.
     नरेंद्र दाभोळकरांचा आणि माझा परिचय १९७६ पासूनचा. माझ्या HSC नंतर जेव्हा जाणीवपूर्वक ठरलं की भारताच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर काम करणं हे आपलं करियर; त्यावेळी हे करियर मी ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून करत होतो; तेव्हा असं कार्य महाराष्ट्रभर आणखी कोण कोण करतं ते पाहू, समजावून घेऊ, त्यांच्यापासून शिकू आणि आपण हाती घेतलेलं काम समृद्ध करू या जाणीवेतून आम्ही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांना सातार्‍यात भेटलो. पुढे IAS होऊन मी प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यावर बाहेरून ते, आतून मी अशी आम्ही अनेक ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनाचीपावलं एकत्र टाकली.
     फलटणजवळच्या एका गावात वर्षातून एकदा एका देवपूजेची एक विशिष्ट पद्धत होती.
५०
फुटांवरून धावत येऊन खडकावर डोकं आपटण्याचा मानगावातल्या दलितांकडे होता. याचा जुन्या पिढीच्यांना एक प्रकारचा अभिमानही होता. मी तेव्हा फलटणचा साहाय्यक जिल्हाधिकारी होतो. दाभोळकरांच्या बरोबर आम्ही या गावातली प्रथा थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा या प्रथेचा अभिमान बाळगणारे आम्हाला म्हणाले की तुम्ही आमचा मानहिरावून घेत आहात. मी सांगितलं की हा मानगावातल्या सर्वांनाच लाभू द्या नं, दलितांनाच कशाला? तरुण पोरं आमच्या बाजूनं उभी राहिली. गावात खुलेपणानं घमासान चर्चा झाल्या, त्यातल्या एका टप्प्याला मी बिनधास्त कायद्याचा धाकही दाखवला. पण शेवटी गावातली प्रथा थांबली, सर्वानुमते आणि मनापासून. या गोष्टीला आता पाव शतक झालं. गावातली प्रथा थांबलेलीच आहे. परिवर्तन होतं. वेदनामय सावकाश गतीनं होतं. पण होतं.
     १९९६ मध्ये माझ्या अस्वस्थ दशकाची डायरीच्या इंग्लिश भाषांतराचं मुंबईत प्रकाशन झालं तेव्हा ते आवर्जून आले होते. त्या कार्यक्रमात मी एक मुद्दा असा मांडला होता की टॉलरन्स्‌’ (याला नेमका मराठी-भारतीय शब्द नाही, कारण टॉलरन्स्‌ही संकल्पना भारतीय विचारविश्वात नाही) - लिबरॅलिझम (उदारमतवाद) आणि सहिष्णुता (याला अचूक असा इंग्लिश शब्द नाही), कारण सहिष्णुताया संज्ञेत व्यक्त होणारी जाणीव इंग्लिश - पाश्चात्य विचारविश्वात नाही) - हे तीन क्रमाक्रमानं अधिकाधिक विकसित होत जाणारे जाणिवेचे तीन स्तर आहेत. टॉलरन्स्‌’ - फक्त विरुद्ध विचाराला टॉलरेट’ - सहन करतो. उदारमतवाद (लिबरॅलिझम) विरुद्ध विचाराचा सुद्धा व्यक्त होण्याचा हक्क मान्य करतो, तर सहिष्णुताम्हणजे सकृद्दर्शनी विरुद्ध वाटणार्‍या विचारातही सत्याचा अंश असू शकेल हे मान्य करतो. वेगळा विचार म्हणजे लगेच विरुद्ध विचार, मतभेद किंवा शत्रुत्व तर त्याहून नाही, ते वेगवेगळ्या जाणीवांना, आपापल्या परिभाषेत घडणारं एकाच सत्याचं दर्शन - वर्णन असू शकतं या समंजस जाणीवेचं नाव सहिष्णुता’. भारतीय जीवनदृष्टी अशी सहिष्णुता जोपासते, शिकवते.
     असं सगळं मी म्हणालो होतो.
     तर नरेंद्र दाभोळकरांनी आवर्जून भेटून सांगितलं होतं की या मुद्द्यांनी मलाही अंतर्मुख होऊन विचार करायला मिळालं. असं त्यांनी म्हणण्यातच सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता आहे. या भरवशावर मी त्यांच्याशी अशीही चर्चा केली होती की श्रद्धा आणि अंधश्रद्धा (आणि अश्रद्धा) असा काही आपण फरक करणार, की आहेत त्या सर्व अंधश्रद्धाच आहेत असं म्हणणार? चळवळीच्या प्रारंभीच्या काळात तरी श्रद्धा बिद्धा काही नसतेच, सगळ्या अंधश्रद्धाच आहेतअशी भूमिका असल्याचं म्हणता येईल. पण चळवळ जशी अधिकाधिक प्रगल्भ होत गेली तशा काही श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक असण्याच्या शक्यतांना तरी त्यांनी मान्यता दिली होती - (आणि हो, याला मी प्रगल्भता म्हणतो) - ज्याच्यात दुसर्‍याचा अपमान, शोषण नाही आणि हिंसाचार, रक्तपात नाही, अशा काही, फारतर प्लासिबो (Placebo) इफेक्टदेणार्‍या इनोसंटश्रद्धा असू शकतात.
     त्यांच्यावर आणि चळवळीवर असा एक आरोपहोता की ते फक्त हिंदू समाज, हिंदू धर्मातल्याच अंधश्रद्धांवर तुटून पडतात, मुस्लिम किंवा ख्रिश्चन अंधश्रद्धांबाबत बोलत नाहीत किंवा चळवळ करत नाहीत. हा आरोप खरा नव्हता. प्रमाणाचा फरक असेल, पण त्यांनी मुस्लिम अंधश्रद्धांविरुद्धही आवाज उठवला होता. त्यांच्या एका सहकार्‍यानं म्हटलं होतं की भारतात (महाराष्ट्रातही) हिंदू समाज बहुसंख्यांक असल्यामुळे त्याच्या धर्म, प्रथांबाबतच बोललं जाणं अगदी साहजिक आहे. वसंत व्याख्यानमालेत दाभोळकरही म्हणाले होते की आम्ही मुख्यत: हिंदू प्रथांविरुद्ध आवाज उठवतो आहोत, कारण आम्ही हिंदू आहोत. खरं तर अयोग्य, अशास्त्रीय, बुरसटलेल्या हिंदू प्रथांविरुद्ध कडक आवाज उठवला विवेकानंद आणि सावरकरांनी सुद्धा. पण त्यांच्यावर असे आरोपझाले नाहीत, कारण विवेकानंद, सावरकरांनी हिंदूधर्म किंवा विचारातल्या शाश्वत भागावर लक्ष देत बुरसटलेल्या गोष्टींवर टीकेची झोड उठवली. विवेकानंद, सावरकरांवर उलट हिंदूधर्म - समाजाला अनुकूल असल्याचा आरोपआहे. काही जणांच्या उथळ धर्मनिरपेक्षतेमध्ये हिंदू धर्मावर फक्त टीका करणं बसतं, त्यात काही चांगलं आहे म्हटलं की तुम्ही आरोपीठरता. अशाच जाणीवेतून दाभोळकरांच्या हत्येनंतर काही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात आपण अशी कडू, आक्रस्ताळी चर्चा ऐकली. अजून कशाचेच काहीच पुरावे, संकेत सुद्धा नसताना काही ठराविक घटकांवर आरोप करून, ‘मिडिया’ - खटला चालवून, गुन्हा शाबित ठरवून शिक्षा सुद्धा जाहीर करून अनेक जण मोकळे झाले. त्यातल्या काही जणांना तर दाभोळकरांच्या हत्येशीही काही घेणं-देणं नव्हतं, असतं तर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकयापूर्वीच संमत केलं असतं. पण त्यांना फक्त दाभोळकरांच्या हत्येचं निमित्तच करून राजकीय हिशोब मांडायचे होते.
     स्वत: दाभोळकर असे नव्हते, असं अर्थातच मला वाटतं - कारण माझा तसा अनुभव आहे. आपल्या विचाराला, तत्त्वांना पक्के, पण दुसर्‍याचं ऐकून घेणारे, ऐकताना समजून घेण्याचा प्रयत्न करणारे आणि त्यातलं काही पटलं तर तसं खुलेपणानं मान्य करण्याची ताकद असलेले होते ते. कोणाही कार्यकर्त्याची हाती घेतलेल्या कामावर, विचारावर श्रद्धा असावीच लागते. त्याशिवाय बळ येत नाही. पण त्या नादात अनेक कार्यकर्ते अनुदार, संकुचित, दुराग्रही आणि कडवट, तुसडे बनतात. नरेंद्र दाभोळकर याच्या अगदी विरुद्ध होते. चळवळ करत पुढे सरकले तसे दाभोळकर अधिक विशाल, सर्वसमावेशक आणि मधुर होत गेले.
     आता सर्व दु:ख पचवत - ते बळ त्यांच्यापाशी आहे - त्यांच्या डॉक्टर पत्नी शैलाताई, मुलगा हमीद आणि कन्या मुक्ता पुन्हा चळवळीसाठी उभे राहतीलच, सामाजिक कार्याची घराणेशाही चालवतील. पण नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येमध्ये एक प्रचंड ग्रीक किंवा शेक्स्पियरन्‌ ट्रॅजेडी घडली. सद्आणि असद्च्या संघर्षात ग्रीक-शेक्स्पियरन्‌ ट्रॅजेडीमध्ये सद्चा बळी जातो. असद्विजयी ठरल्यासारखं वाटतं. पण त्या धक्कयामुळेच सद्’-प्रवृत्ती जाग्या होतात. संघटित होतात.
     दाभोळकरांच्या बलिदानानंतर आता महाराष्ट्रात - भारतात अशा सद्’-प्रवृत्ती जाग्या आणि संघटित होतात का, हे पहायला हवं - पण मुख्य म्हणजे, त्यासाठी कामाला लागायला हवं.

No comments:

Post a Comment