आणि आपण सगळेच
लेखांक ६० |
सामान्य
नागरिकांच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य
महाकुंभ
एक आतली हाक असते.
आपल्याला ऐकू आली तर आपण ओ द्यायची असते. सारखंच कर्कश्शपणे का कशावरून कशासाठी
करत आणि पण परंतु करत बसण्यामध्ये एक समृद्ध भावनाकोष हरवून जातो. असा समृद्ध
भावनाकोषही आपल्या अस्तित्वाचा आधार असतो. म्हणून प्रश्नविरहित प्रतिसाद देण्यातही
मजा असते. गुरुदेव टागोरांनी म्हणलंय तसं : Mind all Reason is knife all edge, it
bleeds the hands that hold it. सततच तर्ककर्कश असणारं मन बुद्धी म्हणजे मूठ
नसलेलं सुर्याचं पातं, जे हात ते पातं पकडतील तेच रक्तबंबाळ होतील.
तीर्थराज प्रयागच्या त्रिवेणी संगमावर बारा
वर्षांतून एकदा भरणार्या कुंभमेळ्यासाठी अलाहाबादला येण्याची अशी आतली हाक मला
ऐकू आली. गेलो. मी त्या हाकेला प्रश्नविरहित प्रतिसाद दिला. तसा माझा कुठल्याच
कर्मकांडावर विश्वास नाही. आपलं कर्तव्य नीट करणं हीच ईश्वराची आराधना आहे, हे
ज्ञानोबा-तुकोबाच्या कृपेनं मला कळलंय. संत सावता माळींची ‘कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी’ ही शिकवण मनात तरी
उतरलेली आहेच पण ते ज्ञानोबा-तुकोबाही ‘पंढरीची आवडी’ लागून वेडेपिसे होतेच
की. पंढरपूरला पाठीशी हात बांधून विठोबा समोर उभं राहिल्यावर नानासाहेब गोरेंच्या
सेक्युलर समाजवादी निष्ठावंत मनात प्रश्न आला होता की ज्याच्यासमोर
ज्ञानोबा-तुकोबांनीही हात जोडले होते, तर आपण कोण; हे जाणवल्यावर विठोबा
समोर हात जोडण्यात नानासाहेबांच्या निष्ठा आडव्या आल्या नव्हत्या. त्यांचा नमस्कार
मुर्तीला नव्हता, विठोबाला नव्हता, ज्ञानोबा-तुकोबांना
होता. विज्ञाननिष्ठेवर विश्वास ठेवत देवाधर्माला भोळ्या माणसांचे उद्योग भवभयानं
भरलेल्या जीवनभीतांची मानसिक आधार शोधण्याची दुबळी धडपड किंवा खुनशी पुरोहितांनी गोरगरिबांना नाडून स्वत:ची तुंबडी
भरण्यासाठी शोधलेला गोरखधंदा. असं मानणार्या अनेकांना अचानक अध्यात्मविचारातली
विज्ञाननिष्ठा-आणि विज्ञाननिष्ठेतलं अध्यात्म दिसलंय. भाभा अॅटोमिक रिसर्च
सेंटरमधले विज्ञानवादी शास्त्रज्ञ डॉ. गुण्येंना अचानक ज्ञानेश्वरींच्या
ओव्यांमधलं विज्ञान जाणवू लागलं. त्यांनी अध्यात्म आणि विज्ञानाचं अद्वैत सांगायला
मराठीत चार अजरामर ग्रंथ लिहिले. तसेच व्यवसायानं डॉक्टर असलेले सुधीर मते.
त्यांना अचानक आतून ज्ञानेश्वरी जाणवू लागली. तर एकदा घरी काम करणार्या वारकरी
सुताराला ते म्हणाले ‘मलाही एकदा वारीला जायचंय, पण खूप कामांमुळे सवडच
होत नाही.’ तर सुतार म्हणाला, ‘तसं काय आतली हाक आली
की माणूस स्वस्थ बसतंच नाही.’
मला तशी आतली हाक ऐकू आली. महाकुंभसाठी
अलाहाबादला गेलो. सगळं दृश्य गावाकडल्या जत्रेसारखंच, फक्त एक लाख पट मोठं. लोकांची
खच्चून गर्दी. यावर्षी तीनदा तरी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या जागी -
रेल्वस्टेशन, त्रिवेणीचा किनारा इ....-चेंगराचेंगरी होऊन अनेकजणांना प्राण गमवावे लागले आहेत. तशी
सर्वत्र अस्वच्छता आणि वरवर पाहिलं तर अव्यवस्था सुद्धा. भारतीय समाजव्यवस्थेचं
प्रतिक. आत उतरायचा प्रयत्न केला तर एक आंतरिक संगती जाणवायला लागते.
महास्नानाच्या पाच मुहूर्तांमध्ये, एकूण चाळीस दिवस चालणार्या या
महाकुंभमेळ्यामध्ये एकूण दहा कोटींपेक्षा जास्त लोक स्नान करून गेले. ही
संपूर्ण भारताची क्रमांक एक ची जागतिक जत्रा आहे.
भारतातली टॉप डझनभर शहरांची लोकसंख्या यापेक्षा कमी भरेल. महास्नानाच्या पाच मुहूर्तांपैकी जो
जास्त पवित्र मुहूर्त मानला जातो, त्या मौनी अमावस्येच्या तर एका दिवसात
साडेतीन कोटींपेक्षा जास्त लोक स्नान करून गेले. ही भारताची चार महानगरं एकत्र केली -
मुंबई कलकत्ता दिल्ली चेन्नई - एका दिवसांत महास्नान. या सर्वांचा व्यवस्थापन
केवढं प्रचंड, केवढं नीट असावं लागेल. यावेळी झालेली चेंगराचेंगरी हे
दुख:द गालबोट आहे. त्याचं कोणत्याच प्रकारे समर्थन करता येणार नाही - पण याच
दिवसांमध्ये या चार महानगरांमध्ये अपघातांमध्ये यापेक्षा जास्त माणसं गेलीत.
(मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरचे मुत्यू मोजले नाहीत तरी.) मी २००१ च्या महाकुंभलाही आलो
होतो. तेव्हा तर असा औषधालासुद्धा अपप्रसंग घडला नव्हता. सांगण्याचा मुद्दा हा की
एरवी आपण भारतीय एवढे असंघटित, अव्यवस्थित, अनिश्चित, पण कुंभ आणि त्यासम
घटना म्हटल्या की सर्व व्यवस्थापन सर्वसाधारणपणे सुव्यवस्थित पार पडतं.
उत्तर प्रदेशमध्ये सरकार समाजवादी पक्षाच्या
मुलायमसिंग यादवांच्या सुपुत्र
अखिलेश यादवांचं आहे. कॉंग्रेस असो किंवा समाजवादी (किंवा ज्वलंत हिंदुत्ववादी!) घराणेशाही
अमर आहे. घराणेशाही आणि जातीव्यवस्था या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण
दोन्ही ठिकाणी माणसांचं समाजातलं स्थान आणि त्याला मिळणार्या किंवा नाकारल्या जाणार्या
संधी त्याच्या जन्मावरून निश्चित होतात. तर या समाजवादी सरकारमधले कित्येक मंत्री
लोकप्रतिनिधीसुद्धा महाकुंभला येऊन गंगास्नान आणि गंगापूजन करून गेले. जसे
बंगालमधले अनेक साम्यवादी दुर्गापूजा करतात किंवा बेलूर मठात जातात.
जिथे गर्दी आहे तिथे राजकीय पुढारी असावाच लागतो. ही तर लोकशाहीची जादू आहे. तो
गर्दीचा गहिवर असेल किंवा मतांची आराधना. बुद्धिवादाच्या गुर्मीत
गर्दीच्या या निष्ठांचा अपमान करणं फक्त मूठभर स्वयंघोषित पुरोगामी तोंडपाटलांना
परवडेल. खरं तर ज्या गोरगरीब, बहुजन, तळागाळातील
दीनदलितांविषयी हे आरामखुर्चीतले अज्ञानवादी ओष्ठ-सेवा पुरवत असतात, तो सारा गोरगरीब बहुजन, तळागाळातला, जातिपातींमध्ये
विभागला गेलेला अठरापगड समाज इथे असतो. महाकुंभमेळ्यात त्याच्या डोळ्यांमध्ये, चेहर्यांवर श्रद्धा
असते. ती श्रद्धा त्यांना जगण्याचं बळ देत असते. स्नानाच्या किंवा गंगापूजेच्या
क्षणांना तरी जातपात उच्चनीच सारं काही विसरलेलं असतं. तुकोबारायांच्या अभंगातल्या
‘वर्ण अभिमान विसरली
माती । एकमेका लागती । पायी रे’ हीच स्थिती त्रिवेणी संगमावरही अवतरलेली असते
- ओझरती, तात्पुरती तरी या क्षणांमध्ये समतापूर्ण भारताच्या शक्यताचं
दर्शन घडतं.
उत्तरप्रदेशच्या समाजवादी सरकारनं
महाकुंभच्या व्यवस्थेचे प्रमुख नेमले होते. श्री. आझमखान. काही जणांनी त्यावर टीका
केली,
ती मला
संकुचित वाटते. महाकुंभचे मुख्य व्यवस्थापक आझमखान असण्यात मला राष्ट्रीय एकात्मता
दिसते. महाकुंभसारख्या धार्मिक उत्सवामध्ये सरकारनं सहभागी होणं अयोग्य आहे, असं काही - अर्ध्या
हळकुंडानं पिवळ्या झालेल्या - सेक्युलरवाद्यांना वाटतं. ते विसरतात की ‘सेक्युलर’ चे दोन अर्थ होतात -
निधर्मी म्हणजेच सर्व धर्मांना समानपणे नाकारणे किंवा सर्वधर्मसमभाव :
म्हणजेच सर्वधर्मांना समानपणे स्वीकारणे, सन्मान करणे. भारतीय
संदर्भात हा दुसरा अर्थ लागू पडतो. बहुसंख्याकांच्या निष्ठांचा सतत अपमान करणे
(आणि अल्पसंख्याकांची कधीही चिकित्सा न करणे) म्हणजे सेक्युलरवाद असं काही जणांना
वाटतं, किंवा तसं ते वागतात
बोलतात. तरुण कार्यकर्ता असताना एकदा शरद पवारांनी वसंतदादा पाटलांना विचारलं होतं
की आषाढी किंवा कार्तिकीला विठोबाची महापूजा निधर्मी
सरकारच्या मुख्यमंत्र्यानं का करायची? दादांनी उत्तर दिलं
होतं,
‘मुख्यमंत्री
झालात की तुम्ही काय करायचं ते ठरवा’ मग मुख्यमंत्री पवार
साहेब नीट सपत्निक महापूजा बांधतात. मला तरी हे दृश्य आनंददायकच वाटतं. सर्व
सेक्युलर विचारांचे सर्वश्रेष्ठ मेरूमणि पंडित जवाहरलाल नेहरूंनाही
गंगामैय्यांच्या विशाल प्रवाहानं ओढ लावली होती. आपल्या कमालीच्या काव्यमय मृत्यूपत्रात
पंडितजी सांगतात, दहनानंतर (दहन? परत सेक्युलरवादाला
बाधा?)
माझी
राख हिमालयापासून गंगेच्या प्रवाहापर्यंत विखरून द्या. कैफी आझमींच्या
पंडितजींवरच्या ‘मेरी आवाज सुनो’ या गीतामध्ये
पंडितजींच्या या काव्यमय इच्छेला तितकंच काव्यमय रूप दिलंय.
‘‘क्यू सजाई है ये चंदन की चिता मेरे लिए
मैं कोई जिस्म नही हूँ के जलाओगे मुझे
राख के साथ बिखर जाऊँगा मैं दुनियामें
तुम जहॉं खाओगे ठोकर वहीं पाओगे मुझे’’
कठोर धर्मचिकित्सा केलीच पाहिजे पण ती सतत
बहुसंख्याकांच्या निष्ठांचा धिक्कार करत नाही, तर निष्ठांना समजावून
घेत नवे नवे आकार देत गंगेच्या प्रवाहाप्रमाणे. पण आपण आपली गंगामैय्याही मैली
करून ठेवलीय. दिल्लीजवळच्या जमुनेचं तर गटार झालंय. संस्कृतीच्या प्रतिकाभोवतीची
अस्वच्छता मात्र आपल्याला अस्वस्थ करते. विवेकानंदही असेच अस्वस्थ झाल्याचं आपण
वाचलेलं असतं. म्हणजेच सव्वाशे वर्षांत काही फरक पडला नाही का? मग आता केव्हा पडेल? राजीव गांधींनी
पंतप्रधान असताना गंगा शुद्धीकरण योजना हाती घेतली होती. पण राजीव गांधींच्या अनेक
चांगल्या गोष्टी एका बोफोर्सच्या भोवर्यात सापडून गटांगळ्या खात तळाशी गेल्या, तशीच ही सुद्धा एक. या
महाकुंभमध्ये म्हणे सोनिया गांधींना यायचं होतं. उत्तर प्रदेश सरकारनं सुरक्षेचं
कारण सांगून मना केलं. पण एकूण यावेळी अनेक अनुभवी भक्त सांगत होते की
यापूर्वीपेक्षा यावेळी गंगा जास्त शुद्ध, स्वच्छ आहे.
त्या गंगामैय्या मूळ शुद्ध प्रवाहात आपण
सामावून गेलं की भरून येतं. गंगामैय्याचं दर्शन करून परतल्यावर घरात गंगापूजनाचा
छोटा तांब्या ठेवतात. हे आपल्या सांस्कृतिक एकात्मतेचं प्रतिक आहे. प्रत्येक
संगमापाशी एक सुप्त सरस्वती असतेच. शेवटी सगळ्या संकल्पनाही सरस्वतीप्रमाणेच
आपल्या आत असतात. विनोबा म्हणतात तसं, जो म्हणेल मी पाण्यात डुबकी
मारतो,
तो
पाण्यात डुबकी मारतो, जो म्हणतो गंगा स्नान करून सचैल पवित्र झालो, तो तेवढ्यापुरता तरी
पवित्र झालेला असतो.
धर्मही मानवी अस्तित्वाची मूलभूत आवश्यकता
आहे. त्या धर्माचा शोषणासाठी ढोंगी गैरवापर हीही मानवी जीवनाची तितकीच अटळ
वस्तुस्थिती आहे. ‘मिथ्’ म्हणजे मिथ्यकथा नसतात. समाजाला एकत्र धरून
ठेवणार्या प्रतिकात्मक रूपककथा असतात. जगातला प्रत्येक लोकसमूह ‘आपणच देवाचे लाडके’ असल्याची ‘मिथ्’ सांगत असतो. एकप्रकारे
समाजधारणेसाठी ती आवश्यकही असते, जोपर्यंत त्यात दुसर्यांबद्दल द्वेष जोपासला
जात नाही. वासुकीनागाची दोरी मेरुपर्वताच्या दंडाभोवती धरून दोन्ही टोकांनी देव
आणि दानवांनी क्षीर-सागर घुसळून काढल्यावर जे अमृताचे थेंब चार ठिकाणी सांडले, तिथले दर चार वर्षांनी
कुंभमेळा भरतो. उज्जैन, हरिद्वार, नाशिक, तीर्थराज प्रयाग
असलेलं अलाहबाद. मग बारा वर्षांनी एकदा महाकुंभ, अलाहाबादला. ही प्रथा
सुरू केव्हा झाली? भारतीय संस्कृतीतल्या अनेक अनादी अनंत अनाकलनीय
अविष्कारांप्रमाणेच कुंभमेळ्याचा नेमका आदि-अंत सांगताच येत नाही. बरा वर्षांच्या
कालावधीला आपण ‘तप’ म्हणतो. तर विचारांच्या क्षीरसागराचं सतत
मंथन करून बदलत्या काळानुसार परिवर्तनाचं अमृत बाहेर काढण्याचं ‘सतत चालू ठेवायला हवं.’ १२१ कोटींचा भारतच एक सतत
भरलेला महाकुंभ आहे. त्याचं प्रतिक असलेला या पुढचा महाकुंभ बारा वर्षांनी म्हणजे २०२५ मध्ये भरेल. तेव्हा
लोकशाही, समतापूर्ण आधुनिक समृद्ध भारत असेल तर ‘तप’ सार्थकी लागलं म्हणायचं.
No comments:
Post a Comment