महाराष्ट्राचे ‘साहेब’ – भाग ३(एकूण ३)
यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दीनिमित्त मागच्या वर्षी लिहिलेली तीन लेखांची लेखमालिका ब्लॉगवरील मित्रांसाठी
आता ऐकायला गंमत
वाटेल. १९५६ च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीनं पेटलेल्या
कालखंडात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून कॉंग्रेसला एकमेव - अद्वितीय जागेवर विजय
मिळाला होता : कर्हाड विधानसभा मतदारसंघातून यशवंतराव चव्हाण बाकी सर्व उमेदवार
संयुक्त महाराष्ट्र समितीचे निवडून आले होते. नंतरच्या या ६५ वर्षात राजकारणाच्या
सर्व चढउतारातून आजही पश्चिम महाराष्ट्र हा कॉंग्रेसचा (राजकीय दृष्ट्या त्यातच
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आलाच : दोन्हींची मूळ राजकीय संस्कृती एकच आहे : पण तो
मुद्दा वेगळा, नंतर कधीतरी बोलू) बालेकिल्ला आहे. ‘साहेब’च १ मे १९६०ला मंगलकलश घेऊन
आल्यावर यशावकाश संयुक्त महाराष्ट्र समितीचं कॉंग्रेसला असलेलं राजकीय आव्हान
क्रमाक्रमानं संपत गेलं. एक तर संयुक्त महाराष्ट्र समितीचं जीवितकार्यही संपलेलं
होतं. संयुक्त महाराष्ट्र एवढ्या एका समान एककलमी कार्यक्रमाभोवती परस्परविरुद्ध
विचार - व्यक्तिमत्त्वाच्या चळवळी, संघटना एकत्र आल्या होत्या. त्यांच्या एककलमी
कार्यक्रमाची पूर्तता झाल्यावर ‘समिती’ क्रमाक्रमानं फुटत
तुटत विरत जाणं ‘नॅचरल’ होतं. आणिबाणीनंतर देशाच्या पातळीवर जे जनता
पक्षाचं झालं त्याचीच ही राज्याच्या पातळीची आधीची आवृत्ती होती. शिवाय स्वत:च
मंगलकलश आणून यशवंतरावांनी संयुक्त महाराष्ट्र समितीच्या शिडातली हवा काढून घेतली-
कॉंग्रेसच्या शिडात भरून घेतली (संयुक्त महाराष्ट्र समितीच्या शिडाच्या हवेतला एक
भाग पुढे १९६६ नंतर शिवसेनेच्या रूपात पुन्हा प्रकटला. पण
तोही विषय वेगळा, त्याहीविषयी पुढे कधीतरी बोलूच!) १९५६ च्या निवडणुकीत ज्या
पश्चिम महाराष्ट्रातून एकटे यशवंतराव निवडून आले तोच पश्चिम महाराष्ट्र कॉंग्रेसचा
बालेकिल्ला बनवण्यात यशवंतरावांचा सिंहाचा वाटा आहे. (आणि वसंतदादा पाटील, रत्नाप्पाण्णा कुंभार
इत्यादींचा) थेट गावपातळीपर्यंत सहकार चळवळ, पंचायत यंत्रणांचं
पक्क जाळं उभं करून यशवंतरावांनी ही पायाभरणी केली, भविष्यकाळातल्या
राजकीय नेतृत्वाच्या जडणघडणीची ‘शाळा’ उभी केली. ही व्यवस्था
इतकी नीट उभी राहिली की पुढे राज्यात कॉंग्रेसच्या सत्तेला उभं राहिलेलं कोणतंही
आव्हान पश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसला धक्का देऊ शकलं नाही : आधी शेतकरी कामगार
पक्ष,
नंतर १९७७ ची आणिबाणीनंतरची
निवडणूक, मग ८०’च्या दशकात शरद
जोशींच्या शेतकरी संघटनेनं उभं केलेलं आव्हान - आणि मग, अजून चालू असलेला सेना
- भाजपच्या आव्हानाचा अध्याय - यातली कुठली
म्हणता कुठलीही राजकीय
चळवळ पश्चिम महाराष्ट्रातल्या कॉंग्रेसच्या शक्तीला धक्का देऊ शकलेली नाही : याचे
मुख्य आर्किटेक्ट आहेत यशवंतराव. पश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या सत्तेला धक्के
देण्याचं काम राष्ट्रवादी कॉंग्रेस करतंय. - त्याचेही अप्रत्यक्ष आर्किटेक्ट ‘साहेब’च. शरद पवार यांना
त्यांनीच मानसपुत्र मानलं (केवढं भाग्य पवारसाहेबांचं! पण ‘राष्ट्रवादी’चं आव्हान हाही एक
वेगळा मुद्दा : त्याही विषयी पुढे कधीतरी बोलू. पुढे कधीतरी बोलण्याचेच मुद्दे
वाढत चाललेत.) इथे मुद्दा आहे यशवंतरावांनी केलेल्या टिकाऊ राजकीय बांधणीचा, सामाजिक संघटनेचा.
आता हेही ऐकायला गंमत वाटेल की तत्कालीन
मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई : त्यांच्या मंत्रीमंडळात यशवंतराव
उपमंत्री होते : ( ते मोरारजीभाई केंद्रीय मंत्रीमंडळात गेले तेंव्हा त्यांच्याच
सूचनेवरून) १९५६ च्या महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र असलेल्या
मुंबई राज्यात कॉंग्रेसचं बहुमत आणि सरकार मुख्यत: गुजराथमधून निवडून आलेल्या
जागांमुळे बनलं होतं : ते मोरारजीभाई... सूचनेवरून यशवंतरावांना मुंबई राज्याचे
मुख्यमंत्री करण्यात आलं होतं. काळाचा महिमा असा अगाध की पुढे १९७९ मधे मोरारजीभाई होते
पंतप्रधान : यशवंतराव विरोधी पक्ष नेता- त्या जनता पक्षाच्या मोरारजीभाई सरकार
विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडला यशवंतरावांनी - सरकार पडलं- Politics makes strange bedfellows
१९८३-८४ त यशवंतरावांच्या
राजकीय उदयाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याचा एक विशेष प्रकल्प हाती घेतला होता :
कॅनडातल्या क्वीन्स् विद्यापीठात महाराष्ट्र हा विषय शिकवणार्या (हो हो
अमेरिकेतलाच कॅनडा - कर्नाटक नाही, त्या कॅनडाच्या विद्यापीठात महाराष्ट्र विभाग
असतो,
कोण
म्हणतं मराठी माषा आणि माणसाचं स्थान धोक्यात आहे म्हणून!) डॉ. जयंत लेले यांनी
महाराष्ट्राच्या साठोत्तरी राजकारणाला त्यांनी ‘Elite Pluralism’ अशी अत्यंत अर्थपूर्ण संज्ञा वापरली होती. Elite Pluralism म्हणजे लोकशाहीचा
बाह्य ढांचा तर आहे - म्हणून Pluralism - पण खरी सत्ता
मूठभरांच्याच हातात एकवटली आहे - म्हणून Elite आजही हीच संज्ञा लागू पडेल असे महाराष्ट्राच्या आणि
देशाच्याही राजकारणाचं चित्र आहे. तर डॉ. जयंत लेलेंच्या या प्रकल्पात १९८३-८४ मधे-म्हणजे IAS होण्यापूर्वी काम करण्याची मला संधी मिळाली
होती,
डॉ.
लेलेंनी महाराष्ट्राच्या साठोत्तरी राजकीय-सामाजिक वाटचालीचा ‘पॅराडाईम’ मांडण्यासाठी सातारा
आणि नाशिक जिल्हे अभ्यासाला घेतले होते- कारण त्यावेळी महाराष्ट्राच्या
नेतृत्वासाठी मुख्य राजकीय स्पर्धा झाली होती. भाऊसाहेब हिरे (नाशिक) आणि यशवंतराव
(सातारा) यांच्यात. माझ्याकडे नाशिक जिल्हा होता- नाशिक आणि भाऊसाहेब हिरेंचा
अभ्यास करताना मला यशवंतराव दिसले- ते घडलेलं दर्शन लोभस होतं- खालिस्तान
चळवळीबाबत पंजाबमधे आम्ही केलेल्या पदयात्रा- आणि दिल्लीत त्या पदयात्रांचं
यशतंतरावांना केलेलं निवेदनही त्याच काळातलं. तर नाशिक जिल्ह्यातल्या अभ्यासातून
दिसलेली यशवंतरावांची प्रतिमा प्रत्यक्ष भेटीतही तितकीच खरी वाटत होती :
राजकीय सत्ता स्पर्धेतही शालीनता, संयम (भिडस्त
पणासुद्धा) न सोडणारा, सर्वांना सोबत घेऊन जाऊ म्हणत समाजाला जोडणारा नेता.
ही सत्याशी सुसंगत असलेली प्रतिमा.
आधी मुंबई आणि नंतर महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री या नात्यानं त्यांनी अधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केली. (सध्या तो
पाया उखडण्याचे उद्योग इमानेइतबारे चालू आहेत.) महाराष्ट्राच्या विकासाचा
मध्यिंबदु शेती असावा की औद्योगिक विकास या मुद्द्यांवरून यशवतंरावांचे -
त्यांच्या इतक्याच शालीन सत्वशील विचारवंत नेत्यांशी मतभेद होते.- ते म्हणजे आण्णासाहेब
िंशदे : त्यांचं म्हणणं होतं महाराष्ट्राचा आधुनिक विकास शेतीकेंद्रित असायला हवा, यशवंतरावांचं म्हणणं
होतं की महाराष्ट्राची जमीन गंगा-यमुनेच्या खोर्यातल्या काळ्याशार जमिनीइतकी
सुपीक नाही आणि सिंचनाच्या सर्व सुविधा नीट कामी लावल्या तरी
शेतीयोग्य जमिनीच्या जास्तीत जास्त 30% भागाला सिंचन क्षमता निर्माण करता येईल, म्हणून शेतीकेंद्रित
विकासाचा मार्ग स्वीकारला तर महाराष्ट्राच्या विकासावर मर्यादा पडतील- तर शेतीकडे
दुर्लक्ष न करता, पण महाराष्ट्राचा भविष्यकाळ औद्योगिक विकासात आहे- असं
सूत्र धरून निर्माण करायला हवं.
या मतभिन्नतेमधे मला सोव्हिएत रशियातल्या
स्टॅलिन-ट्रॉट्स्की वादाचे पडसाद ऐकू येतात. रशियात साम्यवादी क्रांतीनंतर-
लेनिनच्या मृत्यूनंतर नेतृत्वासाठी स्टॅलिन आणि ट्रॉट्स्की यांच्यात संघर्ष झाला.
ट्रॉट्स्की औद्योगिक-विकासवादी होता तर ग्रामीण (आणि ग्राम्य!) पार्श्वभूमी
असलेला स्टॅलिन कृषिवादी. राजकीय नेतृत्वस्पर्धेत स्टॅलिन विजयी झाला, ट्रॉट्स्कीला
सोव्हिएत रशियातून जिवानिशी पळून जावं लागलं, तरी स्टॅलिनने त्याला
सुखात जगू दिलं नाही, वीस वर्षं पाठलाग करून मेक्सिकोमधे शेवटी हातोड्याचे घाव घालून स्टॅलिनने ट्रॉट्स्कीचा
मुडदा पाडून घेतला. पण त्यापूर्वी त्यानं
आपल्या कृषिवादी धोरणांचा मुडदा पाडून, सत्ता ताब्यात
घेतल्यावर ट्रॉट्स्की बोलत होता तीच औद्योगिक, विकास-वादी धोरणं
स्वीकारली. इतकी की त्यानं शेती आणि शेतकरी दोघांनाही चिरडून त्यांच्या थडग्यावर
सोव्हिएत रशियाच्या औद्योगिक विकासाची इमारत उभी केली.
यशवंतराव आणिआण्णा साहेब शिंदेमधली मूळ
मतभिन्नता ट्रॉटस्की विरुद्ध स्टलिनमधल्या मतभिन्नतेसारखीच आहे. पण तिचा अविष्कार
मात्र किती वेगळा, अहिंसक, ‘भारतीय’ आहे. तसा तर आण्णा
साहेब शिंदेचा वैचारिक पाया मार्क्सवादी विचारधरित
होता. पण त्यांच्या मार्क्सवादावर स्वातंत्र्य चळवळीचे, गांधीजींचे संस्कार
होते. यशवंतरावानाही रूढार्थानं डावे किंवा मार्क्सवादी म्हणता
येणार नाही - ते मानवेंद्रनाथ ‘रॉयवादी’ - म्हणजे सुधारित (!)
मार्क्सवादी होते- पण त्यांच्याही रॉयवादावर स्वातंत्र्यचळवळीचे, गांधीजींचे संस्कार
होते. म्हणून वादाचा विजय स्टॅलिन - ट्रॉट्स्की वादासारखाच असला तरी त्याची
अभिव्यक्ती मात्र संपूर्णपणे वेगळी दिसते. सोव्हिएत सत्ता सर्वंकषवादी होती.
भारतीय रचना आणि सहिष्णु मनोवृत्तीसुद्धा लोकशाही समन्वयवादी आहे. म्हणून मतभेद
असले तरी यशवंतराव आणि आण्णासाहेब शेवटपर्यंत एकमेकांचे जिवलग सहकारी होते.
आत्ताच्या अधिकाधिक असहिष्णु आणि हिंसक बनत चाललेल्या
राजकीय - सामाजिक वातावरणानं यातून खूप काही शिकायला हवं.
१९६२ मधे आपल्याच बेसावधपणामुळे चीनकडून
विश्वासघाताचा वर्मी फटका बसल्यावर पंडित नेहरुंनी देशाचं-सैन्याचं नीतीधैर्य
सावरायला यशवंतरावांना केंद्रीय मंत्रीमंडळात संरक्षण मंत्री म्हणून बोलवलं. स्वत:
पंडितजींनी फोन लावला होता. तर त्या फोनवर यशवंतरावांनी आनंदपूर्वक धन्यवाद देत
नेहरूंना निर्णयासाठी वेळ मागितला. विचार करा. पंतप्रधान स्वत: म्हणतात, केंद्रीय मंत्रीमंडळात
या,
त्यावर
आनंदानं उड्या मारायच्या ऐवजी हे म्हणतात मला निर्णयासाठी जरा मुदत द्या. मला जरा
विचारायला हवंय. चटकन चिडणारे आणि तितक्याच चटकन हसणार्या नेहरूंनी जरा निडूनच
विचारलं - आता मीच तुम्हाला सांगतोय, तर आणखी कोणाला
विचारायचंय. ‘साहेब’ म्हणाले, पत्नी : सौ.
वेणुताईंशी विचारविनिमय करून मी निर्णय घेतो. ते महिला विकासाची भाषणं देत नव्हते, मतांचे जोगवे
मागण्यासाठी बुरखे धारण करत नव्हते, जी मानवी मूल्यं बोलत होते, ती प्रत्यक्ष जगत
होते. वेणुताई सर्वार्थानं त्यांच्या सहचारिणी होत्या. केंद्रीय
मंत्रीमंडळात जाण्यापासून ते पुढे ‘स्वगृही’ परतण्यापर्यंतचे
निर्णय ते पत्नीशी विचारविनिमय करून घेत असत. विविध मोठ्यामोठ्या जबाबदार्या
सांभाळत जगभर प्रवास करताना ते पत्नीशी सतत संवाद पत्रव्यवहार ठेवत. आयुष्याच्या
अत्यंत अवघड क्षणाला डॉक्टरनं जेव्हा विचारलं की आत्ता पत्नी वाचायची असेल तर नंतर
कधीही तुम्हाला अपत्य होऊ शकणार नाही. आयुष्यातली केवढी कठोर सत्त्वपरीक्षा आजच्या
काळातही मला शंका आहे की बाळ किंवा बाळंतीण यातलं
काहीतरी एकच जगणार आहे असा पेच उभा राहिला तर बहुसंख्य निर्णय होतील बाळंतीणीला
मरू द्या, बाळ जगू द्या : किंवा नंतर कधी बाळ
होणारच नसेल, तर बाळंतिणी तरी जगून तरी काय करायचंय (शेवटी बाळंतिणीला
स्वतंत्र अस्तित्व कुठंय, ती फक्त बाळ आणण्याचं साधन!). यशवंतरावांनी
निर्णय दिला पत्नीकरता. त्यांच्या एवढ्या एका जगण्याकरता त्यांना करावेत तेवढे
सलाम कमीच आहेत. त्यात जर भर घातली, की एवढ्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात
त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे साधे आरोपसुद्धा नाहीत, तर लक्षात येईल की
कितीही पुतळे उभे केले, सभागृहांना किंवा भवनांना कितीही
नावं दिली तरी ते कमीच आहे. त्यांच्या जगण्यावाचण्याचा एक अंश तरी आपल्या जीवनातून
प्रकटणार असेल तर खरं, नाहीतर सारं ढोंग आहे.
यशवंतरावांच्या सार्या शालीनता, संयमाचा अविष्कार कधी
कधी भिडस्तपणात सुद्धा दिसतो. नेहरूंच्या निमंत्रणावरून केंद्रातली जबाबदारी
स्वीकारायला ते दिल्लीत पोचले. पंडितजींना त्यांनी वाकून नमस्कार करून आशीर्वाद
मागितले. तर नेहरू तुसडेपणानं म्हटले, माझे आशीर्वाद असे
सहजासहजी मिळत नसतात. त्यानंतरच्या काळात यशवंतराव आपल्या डायरीत नोंदवतात की
नेहरूंच्या मनात महाराष्ट्राविरुद्ध आकस आहे. ‘साहेबां’ च्या अत्यंत जवळचे, तरीही विकले गेलेले नव्हते
असे जेष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी (ते आता ९३ वर्षाचे आहेत, त्यांना शतायुषाहून
अधिक आयुष्य लाभो) यांनी यशवंतरावांच्या डायरीची संपादित आवृत्ती प्रकाशित केलीय.
त्यात हा काही अर्थपूर्ण मजकूर आपल्याला कळतो. उदाहरणार्थ साठीच्या दशकातच ते
डायरीत अस्वस्थपणे नोंदवतात की ज्या पक्षाच्या माध्यमातून आपण स्वातंत्र्यासाठी
लढलो,
ज्या
पक्ष संघटनेसाठी आपण स्वत: खस्ता खाल्ल्या - हाच का तो कॉंग्रेस पक्ष आणि याचसाठी
केला का अट्टाहास असा प्रश्न पडतो.
त्यांच्या मनाचा हा नितळ प्रामाणिकपणा भावतो
आपल्याला. तरी एक रुखरुख वाटत रहाते की काही वेळा तरी जिथं जे सार्वजनिकरीत्या
बोलायला हवं, ते न करता, यशवंतराव डायरीत स्वत:ला का व्यक्त करत होते.
लालबहादुर शास्त्रीजींच्या अकाली मृत्यूनंतर ते पंतप्रधान पदासाठी दावा करूशकत
होते,
ते न
करता त्यांनी आपले वजन इंदिराजींच्या पारड्यात टाकलं. त्यांना कदाचित
शास्त्रीजींना नेहरूंच्या बाबत केललं विधान ‘उनके मन में तो सिर्फ
अपनी बेटीही है’- माहिती असावं. पण म्हणून इंदिराजींनी यशवंतरावांवर कधी
पूर्ण विश्वास टाकला, असं झालेलं नाही. केंद्रातल्या सत्तेत येण्याची
महाराष्ट्राकडे ताकद आहे (तसा महाराष्ट्राचा इतिहासही आहे) आणि केंद्रातल्या
आपल्या सत्तेला आव्हान देण्याएवढा ‘मासबेस’ यशवंतरावांकडे आहे, ते पाठीशी महाराष्ट्र
घेऊन दिल्लीवर प्रभाव टाकू शकतात आणि दिल्लीतून महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रं
हलवू शकतात.., म्हणून कॉंग्रेस हायकमांडकडून त्यांना सतत संयमाची, दुजाभावाची वागणूक
मिळत राहिली.
हे कळत असून कॉंग्रेसला आपलं घर मानलेले
यशवंतराव ‘मासबेस’ नसलेल्या पक्षश्रेष्ठींना आपल्या निष्ठा वहात
राहिले. इंदिराजींनी २५ मे १९७५ रोत्री आणिबाणी जाहीर केली, यशवंतराव डायरीत नोंद
करतात की कॅबिनेटच्या बैठकीत मर्तिकाला आल्यासारखी अवकळा होती, आणिबाणीचा निर्णय
आम्हाला पसंत नव्हता, पण आम्ही गप्प बसलो. (का बसलो?) राजकारणात
(जीवनातसुद्धा) मनातलं सगळं बोलता येत नाही. बोलायचंसुद्धा नसतं. पण आणिबाणी
लादण्याएवढा मोठा निर्णय? बरं २५ जून ७५ ला नाही बोलले. पुढे
बहुधा निवडणुकीत विजय मिळण्याची खात्री वाटल्यावर - किंवा तसा अहवाल
गुप्तवार्ताविभागानं दिल्यावर (आणि निवडणुका घेण्याचा विनोबांनी आग्रह धरल्यावर) १६ जानेवारी ७७ ला इंदिराजींनी
निवडणुका जाहीर केल्या. ४ दिवसात त्यांच्या मंत्री मंडळातले ज्येष्ठ
मंत्री जगजीवनराम २० कॉंग्रेस खासदारांना घेऊन बाहेर पडले, आणिबाणीचा निषेध
म्हणून - त्यांनी Congress for
Democracy (CFD) असा पक्ष स्थापन केला. हे कृत्य धैर्याचं आणि राजकीय
दूरदृष्टीचं होतं. तेंव्हा यशवंतराव गप्प का थांबले? शेवटी कॉंग्रेसच्या
बाहेरही पडले केंव्हा, तर मार्च ७७ मधल्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाल्यावर
- आपल्या आदरयुक्त मनाला रुखरुख वाटत रहाते. कदाचित योग्य वेळी पंतप्रधान पदावर
दावा सांगण्याचा (अशी संधी त्यांना ३ दा होती) किंवा इंदिराजींच्या
नेतृत्वाविरुद्ध बंड करण्याचा आक्रमकपणा त्यांच्या स्वभावात नसावा. (तो त्यांनी
दाखवला, त्यांचीही सगळी गणितं चुकलीच की, पण तो मुद्दा वेगळा
आहे,
त्याविषयी...!
बोलू पुढे कधीतरी, संबंधितांच्या शताब्दी वर्षापूर्वी!) त्या स्वभावामुळेच
कॉंग्रेस बाहेरची वर्ष त्यांनी अस्वस्थपणे तळमळत काढली, परत गेलो तर आपली
स्थिती शरपंजरी पडलेल्या इच्छामरणी भीष्माचार्यासारखी होईल, हे कळत असून - ते
पत्नीशी विचारविनिमय करून ‘स्वगृही’ परतले.
अपेक्षेप्रमाणेच त्यांची शेवटची वर्ष शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यासारखीच गेली.
एका ज्येष्ठ नेत्याचं म्हणणं आहे की पक्षासाठी निधी उभा करण्याची कला यशवंतरावांना
साधली नाही, म्हणून राजकारणात ते योग्यता असूनही सर्वोच्च पदावर पोचू
शकले नाहीत. आता जेंव्हा राजकारणाचा संबंध तत्त्व, नीतीमत्ता यांच्याशी
राहिलेला नाही, सगळं काही पाकिटं-खोकी-पेट्यांचं झालंय, तेंव्हा यशवंतरावाचे
सर्वच अनुकरणीय सद्गुण काहीजणांना टीकेचे विषय वाटतात. अशा सर्वांनी यशवंतरावांचे
जीवन आणि विचार नीट वाचायला हवेत, त्यांचं मनन करायला हवं आणि त्यावर आपल्या
स्वतंत्र बुद्धीनं संस्करण करून आजही आचरण करायला हवं. राजकारणाले बनचुके असं काही
करतील अशी अपेक्षा बाळगणंही चूक आहे. पण आपण सगळे...? काय हरकत आहे ...
always we do......
ReplyDeletelehro se dar kar kabhi naiyya par nahi hoti,
koshish karne walo ki kabhi haar nahi hoti.