डॉ. वसंतराव गोवारीकर
डॉ. वसंतराव गोवारीकर आता आपल्यात नाहीत.
एकेका घराण्याला प्रतिभेचं वरदान लाभलेलं असतं. आपल्या प्रतिभेनं देशाचं, विश्वाचं भलं करण्याचं वरदान लाभलेलं असतं.
दाभोळकर घराणं - नरेंद्र दाभोळकरांसहित सर्व दाभोळकर बंधू - देवदत्त, दत्तप्रसाद, श्री.अ....
आमटे घराणं - बाबा, साधनाताई - त्यांची दोन मुलं, सुना, आता नातवंडं...
जाधव घराणं - अर्थशास्त्रज्ञ ‘आमचा बाप’कार नरेंद्र जाधव, IAS अधिकारी जनार्दन जाधव आणि बंधू...
देशसेवेची, समाजसेवेची, प्रतिभासंपन्नतेची अशी घराणेशाही महाराष्ट्रात, भारतवर्षात बहरली पाहिजे. गांधीजी महाराष्ट्राला‘कार्यकर्त्यांचं मोहोळ’ म्हणत असत. अशी परंपरा पुढे चालवणारं, स्वतंत्र प्रतिभेनं त्या परंपरेत भर घालणारं असं आणखी एक घराणं -
गोवारीकर घराणं.
डॉ. वसंतराव गोवारीकरांचे बंधू डॉ. शंकरराव गोवारीकर स्वत: एक शास्त्रज्ञ आणि विचारवंत, वहिनी दीपा गोवारीकर - मराठीत मोजकंच, पण नेमकं, बांधेसूद साहित्य सादर केलेल्या लेखिका, पुतण्या आशुतोष - कसलेला उत्तम दिग्दर्शक - ‘लगान’चा...
असे सगळे आहेत आपल्यात.
असावेतही, आपापलं आरोग्यपूर्ण, प्रतिभावंत शतायुषी योगदान देण्यासाठी.
पण आता डॉ. वसंतराव नाहीत. त्यांची उणीव जाणवत राहणार.
विक्रम साराभाईंच्या दूरदर्शी वैज्ञानिक ‘स्कूल’मध्ये ते विकसित झाले. ‘पॉलिमर सायन्स’ या गुंतागुंतीच्या विषयात त्यांनी Ph.D.आणि जागतिक पातळी गाठली. विक्रम साराभाईंच्या नेतृत्वाखाली भारताची - एकूणच विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राची, त्यात विशेषत:अवकाश-विज्ञानाची ‘व्हिजन’ प्रत्यक्षात आणायला ते सहभागी झाले. पुढे तर त्यांनी भारताच्या अवकाश-विज्ञानातल्या प्रगतीचं नेतृत्व केलं. केरळमध्ये - तिरुवनंतपुरम्जवळच्या थुंबा इथल्या VSSC विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे ते प्रमुख होते. त्यावेळी ते दहा हजारपेक्षा जास्त शास्त्रज्ञांचं नेतृत्व करत होते. ते नेतृत्व नंतर त्यांनी भारत सरकारच्या संपूर्ण विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचं केलं(DST - Department of Science & Technology, Govt. of India) पुढे पंतप्रधान राजीव गांधींनी त्यांना पंतप्रधानांचे विज्ञान-तंत्रज्ञान विषयक सल्लागार म्हणून नेमलं. शासकीय व्यवस्थेतल्या नियमांनुसार होणार्या निवृत्तीनंतर त्यांना पुणे विद्यापीठाचा कुलगुरु म्हणून नेमण्याचं महाराष्ट्र शासनाला सुचलं ही विशेष आनंदाची बाब होती. त्यामुळे कुलगुरु पदाची सुद्धा शान वाढली.अगदी अलिकडची - अगदीच शरीर थकलेली काही थोडी वर्षं सोडली तर तसे ते निवृत्त कधीच झाले नाहीत. औपचारिक निवृत्तीनंतरही - शेती - खतं विषयक कोश तयार करणं - भारत 100 कोटी लोकसंख्या पार करेल हे आधी लक्षात घेऊन समायोजन कसं करायचं - यावरचा ग्रंथ त्यांनी संपादित करून सिद्ध केला होता. शिवाय शेवटपर्यंत ते पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष या नात्यानं शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते.
IAS होण्यापूर्वी दहा वर्षं मी ज्ञान प्रबोधिनीचा कार्यकर्ता होतो. त्या वर्षांमध्ये त्यांना 1981 पासून जवळून पाहण्याची मला संधी मिळाली होती. 1981 मध्ये ज्ञान प्रबोधिनीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला होता - तो कार्य्रक्रम फर्ग्युसन कॉलेजच्या अँफी थिएटरमध्ये काल झाल्यासारखा लक्षात आहे.
सगळ्याच आठवणी अशा कालच काय, आता वर्तमानाच्या एका क्षणामध्ये सामावलेल्या असतातच.
विज्ञान क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली म्हणून केलेल्या सत्काराला उत्तर देताना सहज हसतहसत त्यांनी VSSC ची माहिती दिली,पुढच्या योजना सांगून ते म्हणाले, ‘जरूर VSSC पाहायला या - आणि आमचं काही चुकत असेल तर कान पकडा!’ माणसं काही वेळा काहीतरी एवढंसं करतात पण मानवतेमध्ये मोठी क्रांती केल्याची ‘पोज’ घेतात. हे म्हणतायत, ‘आमचं काही चुकत असेल तर कान पकडा...’ त्यांचा आणखी जवळून सहवास लाभल्यावर लक्षात आलं की ती त्यांनी सत्कारापुरती धारण केलेली सार्वजनिक भूमिका नव्हती, ते तटस्थपणे स्वत:कडे पाहण्याच्या शास्त्रीय भूमिकेतूनच वृत्तीच्या नम्रतेचा आविष्कार घडवत होते.
1985 मध्ये ते VSSC चे प्रमुख असताना मला त्यांनी स्वत: तडडउ दाखवलं, समजावून सांगितलं. थुंबाच्या TERLS (Thumba Equatorial Rocket Launching Station) ची सुरुवात एका पडक्या चर्चपासून झाली. रॉकेट अवकाशात सोडायला शास्त्रीय दृष्ट्या अचूक असलेली जागा - म्हणजे तिरुवनंतपुरम्जवळचं थुंबा - त्या जागेवर चर्च होतं. विक्रम साराभाईंनी ‘फादर’कडे त्या चर्चची मागणी केली. त्या ‘फादर’नं ते चर्च आनंदानं सुपूर्द केलं भारताच्या अवकाश कार्यक्रमासाठी - तिथे उभं राहिलं तेही भारताचं,जगाचं भव्य विज्ञानमंदीरच. तिथे एका बुधवारी सोडलेल्या पेन्सिल रॉकेटपासून पुढे SLV, ASLV, PSLV, GSLV... 1986 नंतर ही प्रगती त्यांनी मला समजावून सांगितली. ते सर्व पाहतानाचं भारावून जाणं अजून लक्षात आहे. त्यापेक्षा प्रेरित होणं जास्त लक्षात आहे. आणि त्याहीपलिकडे जाऊन - भारताकडे ही क्षमता आहे, या जाणीवेनं दिलेला राष्ट्रीय आत्मविश्वास तर माझ्या अस्तित्वाचाच भाग बनून गेलाय.
त्यांच्याशी ‘बाबा’ म्हणण्याएवढं वडीलधारं नातं तयार झालं, ते त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे. ते DST चे सचिव, पंतप्रधानांचे सल्लागार होते तेव्हा माझा दिल्लीत कार्यकर्ता-पत्रकार म्हणून वावर होता. किंवा पंजाब, काश्मिरमध्ये राष्ट्रीय एकात्मतेच्या काही उचापत्या करायला जायचं तर दिल्ली माझा बेस असायचा. तेव्हा अनेक वेळा माझा मुक्काम त्यांच्या घरी असायचा. दिवसभर पंतप्रधानांबरोबर (किंवा सरकारी यंत्रणेबरोबर!) काम करून घरी आल्यावर ते पित्याच्या प्रेमळपणे चौकशी करायचे, पण त्याच वेळी त्यांचं ‘क्वेश्चनिंग’ सुद्धा धारदार ‘नो नॉन्सेन्स्’ प्रकारातलं असायचं. ते आपल्याला न दुखावता, विचार करायला भाग पाडायचे. आपल्या विचारांना, स्पष्टता यायला मदत व्हायची.
मार्च 1986 मध्ये मी UPSC ची मुख्य परीक्षा पार झालो, तेव्हा माहीतच नव्हतं की दिल्लीत मुलाखत म्हणजे काय असतं. तर मी फोन करून दिल्लीत पंतप्रधानांच्या सल्लागारांकडेच सल्ला मागितला. त्यांनीही तो न रागावता दिला.
IAS झाल्यावर मसुरीत ‘जॉईन’ होताना आपल्या वतीनं, एक प्रकारे ‘गॅरेंटर’ - हमी देणारी - दोन नावं द्यायची असतात. त्यातलं माझं गॅरेंटर असलेलं एक नाव होतं - डॉ. वसंतराव गोवारीकर.
1995 मध्ये मी पुण्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी असण्याच्या काळात काही दिवस सुट्टी घेऊन ‘विजयपथ’ लिहून पूर्ण केलं होतं.त्याचं प्रकाशन त्यांच्या आणि सर्वार्थानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ IAS अधिकारी असलेल्या बी. जी. देशमुख सर - यांच्या हस्ते झालं होतं. (आता दोघंही दिग्गज आपल्यात नाहीत.)
पुढे 1995-96 मध्ये मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा उपसचिव होतो. तेव्हा त्यांनी कचर्यापासून खत आणि ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलेला होता - देवनारमध्ये. त्या प्रकल्पाच्या कामात मला थोडासा वाटा उचलता आला होता.
चाणक्य मंडल परिवारच्या स्थापनेनंतर शक्य होतं त्या वेळा त्यांनी येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं होतं.
आता ते आपल्यात नाहीत. जीवन चालू राहतंच, पण त्यांची उणीव भासत राहणार. रुखरुख राहणार.
इतक्या थोरामोठ्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्याला लाभलंय - पण आपल्याच हातून अजून तरी फारसं काही काम झालेलं नाही - अशी तर माझी वैयक्तिक रुखरुख असतेच.
काम करत राहणं, प्रतिभा जागी करत, जागी ठेवत नव्या नव्या दिशा शोधणं हेच त्याला उत्तर आहे.
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सर्व क्षेत्रांमध्ये भारत - केवळ जगाबरोबरच नाही तर जगाच्या पुढे जाणं - भारत केवळ अनुकरण करणारा नाही तर नवं संशोधन करणारा देश होणं -
ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
No comments:
Post a Comment