Monday, June 10, 2013

मदर इंडिया आणि नक्सलवाद


आणि आपण सगळेच

लेखांक ७०
 

सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य

मदर इंडिया आणि नक्सलवाद
    महबूब खानचा मदर इंडियाहा चित्रपट हिन्दीमधल्या सार्वकालिक श्रेष्ठ कलाकृतींपैकी एक आहे. प्रत्येक मराठी अभिनेत्याचं जसं स्वप्न असतं की आयुष्यात एकदा तरी स्टेजवर नटसम्राटकरता आलं पाहिजे, तसं अभिनय कलेकडे गांभीर्यानं पहाणार्‍या प्रत्येक अभिनेत्रीचं (होय, अभिनेत्रीचं, बाहुलीचं नाही) स्वप्न असतं की आयुष्यात एकदा तरी मदर इंडियाचा रोल करता आला पाहिजे.
    नर्गिसनं मदर इंडियाची अजरामर भूमिका अदा करून आयुष्य सार्थकी लावलं. नर्गिस राजकपूरचं फाइंड(डिंपलप्रमाणे). नर्गिस -राजकपूरच्या रम्य चर्चा आजही चालतात. पण मदर इंडियाच्या शूटिंगच्या वेळी आगीच्या दृश्याच्या चित्रीकरणात सेटला आग लागली. चित्रपटात मदर इंडियाच्या मुलाचं काम करणार्‍या सुनील दत्तनं आगीत घुसून नर्गिसला वाचवलं. सुनील दत्त अभिनेता म्हणून सुमार होता (पोरानं बापाकडून तेवढंच उचललं), पण एक माणूस सुनील दत्त खरोखरच सहृदय, महान, दिलदार होता (ते मात्र पोरानं उचललं नाही). धोका पत्करून जीव वाचवल्याप्रीत्यर्थ नर्गिसनं सुनील दत्तला बक्षिस मागायला सांगितलं. सुनील दत्तनं नर्गिसलाच मागितलं. तिनंही शब्द पाळला आणि आयुष्यभर निभावलं. मदर इंडियाचा मुलगा आता तुरुंगामध्ये आई-वडिलांचे पांग फेडतोय.
    मदर इंडियापहिल्यांदा पाहिला, तेंव्हापासून आजपर्यंत - पुण्यातलं जुनं नाव हिंदविजय’, नूतनीकरणानंतर नटराजनाव असलेल्या - आणि जागतिकीकरणानंतर आता अस्तित्वात नसलेल्या थिएटरपासून छत्तिसगडमधल्या दंतेवाडा, आता जगदलपूरच्या वास्तववादी थिएटरपर्यंत,
    मदर इंडियापहाताना मला नक्सलवादाची आठवण झालीय. नक्सलवादी घटना पहाताना सर्वार्थानं मदर इंडियाची आठवण होते.
    चित्रपट सुरू होतो स्वतंत्र भारतातल्याप्रमाणे प्रसन्न वातावरणात. फाळणीच्या भयानक रक्तपातानंतर देशातलं वातावरण प्रसन्न, उमेदीचं, भोळसट, पण आदर्शवादी होतं हेच एक आश्चर्य आहे. चंबळमधल्या दरोडेखोरांवरचे चित्रपटही अब कोई गुलशन न उजडे । अब वतन आजाद है ।।च्या सुरात सुरू होत होते. आता चंबळमधले दरोडेखोर राजकारणापासून क्रिकेटपर्यंत सर्वत्र मोक्याच्या जागांवर बसलेत. इन्‌ फॅक्ट, पूर्वीच्या चंबळमधल्या दरोडेखोरांना संत म्हणावं असे आधुनिक दरोडेखोर आय.पी.एल्‌.पासून दुबई-कराची मार्गे स्वित्झर्लंडपर्यंत पसरलेत. चित्रपटांकरता कवी गीतं लिहीत होते ती साहित्यिक गुणवत्तेनं भरलेली होती. अपनी आजादी को हम हरगिज मिटा सकते नहींला संगीतकारही स्वर्गीय सुरात सजवत होते. बांधलं जाणारं धरण म्हणजे आधुनिक तीर्थक्षेत्र आहे हा पैगामदेणारा भारत राष्ट्रविचार गात होता. इन्सान का इन्सान से हो भाईचारा । यहीं पैगाम हमारा ।।
    अशा वातावरणात मदर इंडियासुरू होतो. शेतं पिकलीत. सुगीचे दिवस आलेत. धनधान्यांचे ढिगारे पसरलेत आणि शेतकरी, त्याची कारभारीण आणि दोन गोड मुलं मिळून गाताय्‌त दुख भरे दिन बीते रे भैया । अब सुख आयो रे...
    अभिजात भारतीय कलाकृतीच्या निकषाप्रमाणे कलाकृती अत्यंत प्रसन्न, सुखद वातावरणात सुरू होते. भारतीय संकल्पनेनुसार अस्तित्वाचं मूळ सत्‌-चित्‌-आनंद आहे, तशी कलाकृतीची सुरुवात.
    पण जीवन असं सरळ रेषेत सरकत नसतं. दु:खाशिवाय सुखाला अर्थ नसतो. द्वंद्वांमधून विकासाची वाट सरकत जाते. हे सजण्यासाठी मार्क्सवादी द्वंद्वात्मक भौतिक विकासवादअपुरा, एकांगीच आहे. द्वंद्वातून जीवनात अर्थपूर्णता येण्यासाठी पुन्हा, अभिजात भारतीय कलाकृतीच्या निकषाप्रमाणे दु:ख, समस्या प्रकट होतात, लंगड्या सावकाराच्या रूपात. खोट्या हिशोबाच्या चोपड्या दाखवून सावकार सांगतो, तुम्ही कर्जाच्या बदल्यात माझ्याकडे जमीन गहाण टाकली होती, अजून कर्ज फिटलेलं नाही, तर या सर्व पिकावर माझा अधिकार आहे. शेतकरी कुटुंब निरक्षर आहे. त्यांना कागदपत्र, हिशोब काही समजत नाही. मदर इंडियातला लंगडा सावकार मला समकालीन भारताच्या राजकारणासारखा वाटत आलाय. शेतकर्‍याचं पीक आणि जमीन बळकावायला सावकाराच्या वतीनं पुढे सरसावणारे तोंडपुजे म्हणजे भ्रष्ट, अकार्यक्षम, हुजरेगिरी करत सामान्य जनतेला नाडणारी सरकारी यंत्रणा.
    पीक गेलं, शेतही गेलं, हातातोंडाशी आलेलं सर्व सुखही गेलं. शेतकर्‍याचं (राजकुमार) सर्व अवसानही गळून गेलं. त्याला अर्धांगवायूचा झटका येतो. आता भूमीहीन शेतमजूर झालेली मदर इंडियाआपल्या दोन कच्च्याबच्च्यांना सन्मानासहित जीवन देण्याचा प्रयत्न करत धडपडतेय. थोरला (राजेंद्रकुमार) - नेहमीप्रमाणे साधा, सरळ, आज्ञाधारक मूळ गांधीवाद्याप्रमाणे. आईच्या आज्ञेत रहाणारा साने गुरुजींचा शाम. धाकटा - ही भूमिका सुनील दत्तनं केलीय - नेहमीप्रमाणे खोडकर, बंडखोर. तोही निरक्षर, पण त्याच्या बंडखोरीला कळत रहातं की सावकार गंडवतोय. मजबूर आईकडे सावकार कर्जाच्या बदल्यात अब्रूचीच मागणी करतो. आधी संतापलेली मदर इंडियापोराबाळांना भवितव्य द्यायला तेही करायला तयार होते.
    या सगळ्यात घोर अन्याय आहे हे कळलेला बुद्धिमान धाकटा मुलगा शस्त्र उचलतो, दरोडेखोर बनतो. मार्क्सवाद-लेनिनवाद उर्फ नक्सलवाद. आहे रेवर्ग नाही रेवर्गाचं शोषणच करणार आहे. उत्पादन आणि उत्पादनाच्या साधनांवरच्या मालकीमुळे आहे रेवर्ग हातातली सत्ता आपणहून सुखासुखी कधी सोडणार नाही, त्याच्याकडून ती हिसकावूनच घ्यावी लागेल. त्यासाठी हिंसा केवळ अटळच नाही, आवश्यक आहे. आहे रेवर्गाची मुंडकीच उडवावी लागतील. बूर्झ्वा सनदशीर, घटनात्मक लोकशाही मार्गानं सर्वहारा वर्गाला न्याय देणारी क्रांती घडणारच नाही.
    भोवती सर्वत्र अन्याय, भ्रष्टाचार, शोषण दिसत असताना भडकून उठणार्‍या माझ्या मनालाही वाटतं उचलावी मशीनगन आणि सर्व भ्रष्टाचार्‍यांना गोळ्या घालून मारून टाकावं. गप्प बसून अन्याय सहन करण्यापेक्षा हिंसा परवडली, कारण अन्याय हीच सर्वांत मोठी हिंसा आहेअसं गांधीजींचं विधानच शोषण-भ्रष्टाचारात बुडत्याला काडीचा आधार ठरतं. माझ्या या वाटण्याला लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, राज्यघटना, कायदा या संकल्पनांनी अहिंसक आकार दिलेला असतो. व्यावहारिक दृष्ट्या माहिती असतं की मशीनगन्स उचलून गोळ्या घालण्याची साधनसंपत्तीसुद्धा भ्रष्ट-शोषक शक्तींकडेच जास्त आहे-अन्यायाविरुद्धच्या लढ्यात कायदा, सुव्यवस्थेसमोर आव्हान उभं केलं तर ते चिरडता येईल. या सर्व वाटण्याला मार्क्सवादी-लेनिनवादी शिव्यांच्या शब्दकोषातली शिवी आहे - बूर्झ्वा’. आणि व्यवस्थेवर ऑक्टोपससारखी घट्ट पकड असलेल्या भ्रष्ट शक्ती कुठल्याच राज्यघटना-कायदा-नीतिमत्तेला जुमानत नसतील, निवडणूक प्रक्रिया, प्रशासन, न्यायव्यवस्था खिशात घालत असतील तर काय करायचं?
    म्हणून मार्ग आणि सिद्धांत पटत नसला तरी १९६६ मध्ये बंगालमधल्या नक्सलबारी गावापासून सुरू झालेल्या चळवळीबद्दल आधी आदर, सहानुभूती वाटत रहाते. चारू मुजुमदार, कनू सन्यालच्या नेतृत्वाखाली एक दिवशी गावच्या सावकाराच्या घरावर हल्ला झाला, कर्जाची कागदपत्रं जाळून टाकली, सावकाराच्या कुटुंबासकट सावकाराला मारून टाकलं. नक्सलवादी चळवळ सुरू झाली. सुखासीन आयुष्य जगू शकले असते असे अनेक मध्यमवर्गीय युवकसुद्धा क्रांतीच्या स्वप्नानं भारावले जाऊन नक्सलवादी चळवळीत सामील झाले.
    दक्षिण अमेरिकेतल्याही अत्याचारी हुकुमशाही राजवटींविरुद्ध तिथल्या ख्रिश्चन धर्मगुरुंनी हातात शस्त्र घेतलं. ख्रिश्चॅनिटी आणि मार्क्सवाद या थिसिस्‌’, ‘अँटीथिसिस्‌च्या डायलेक्टिकल’ (द्वंद्वात्मक विरोधविकासवादी) गतिशीलतेमधून लिबरेशन थिऑलॉजीचं सिंथेसिस्‌बाहेर पडलं १९७०-८० च्या दशकात. तशी मार्क्सवादाची सैद्धांतिक पाळंमुळं ख्रिश्चॅनिटी-बायबलमध्ये दाखवता येतील. मुद्दा आहे की लव्ह अँड कम्पॅशनचा प्रचार करणार्‍यांनीसुद्धा अन्यायासमोर शेवटी शस्त्र उचललंच.
    इथपर्यंत आपण मदर इंडियातल्या सुनील दत्तबरोबर असतो. मग सावकाराच्या घरात लग्न निघतं. आईच्या अब्रूकडे वाकड्या नजरेनं बघणार्‍या सावकाराला धडा शिकवायला सुनील दत्त तरुण नववधूला उचलून पळवून नेतो. मदर इंडियासांगतेय की ती गावची लक्ष्मी आहे, तिच्यावर हात टाकायचा नाही. आईच्या अब्रूवर उठलेल्या सावकाराला फक्त धाक दाखवायचा आहे, दरोडेखोराला. त्याच्याही मनात या नववधूबद्दल वाकडे विचार नाहीत. त्याला फक्त सावकाराला दाखवून द्यायचेत त्याच्या करणीचे परिणाम. म्हणून तो सावकाराच्या घरच्या तरुण गृहलक्ष्मीला उचलून जायला लागतो.
    मदर इंडियाबंदूक उचलून स्वत:च्या मुलाला गोळी घालते.
    मला तर काही वेळा वाटत आलंय की देशिल ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार, आई वेड्यांना आधारअसं म्हणत पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती । होउनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती ।।असं एकच तारा समोर आणिक पायतळी अंगारघेत गरजणार्‍या क्रांतिकारकांनाच आमची मदर इंडियागोळ्या घालते.
    पण एका अन्यायाला दुसर्‍या अन्यायानं उत्तर देता येत नसतं. तुझ्या आईच्या अब्रूवर सावकाराचा डोळा होता, तर तुला जे करायचं ते त्या सावकाराला कर एक वेळ, त्याच्या घरच्या नववधूला, गृहलक्ष्मीला का शिक्षा देणार तू? मग जास्त सखोल शाश्वत मूल्यांच्या रक्षणासाठी मदर इंडियातिच्या सुपुत्राला गोळ्या घालणार.
    खरंतर नक्सलवादी विचार, चळवळीचा प्रभाव एकेकाळी साहित्य, चित्रपट, कला सृष्टीतही दिसून आला. विजय तेंडुलकरांच्या स्क्रिप्ट्‌स्‌ (पार्टी, अर्धसत्य)पासून शाम बेनेगल, गोविंद निहलानींच्या अंकुर, निशांत, आक्रोश मध्ये मनाला पटणार्‍या, सहानुभूती वाटणार्‍या, डाव्या, मार्क्सवादी-लेनिनवादी, नक्सलवादी विचारांचंच कलात्मक आविष्करण आहे. समांतर सिनेमाची चळवळ, मुख्यत: डाव्या विचारांवर उभी होती.
    पण पुढे मदर इंडियाचा नक्सलवादी सुपुत्र गृहलक्ष्मीच्या अब्रूवर उठायला लागला. माओ आमादेर च्यारमानम्हणत देशद्रोहाच्या उंबरठ्यापार पोचला. खंडण्या गोळा करणारा दरोडेखोर बनला. गावात घरांकडे क्रांतिकारकांची सेवाकरायला पोरीबाळी पाठवण्याचे आदेश यायला लागले (पंजाबमधल्या खालिस्तानी फुटीरतावादी चळवळीत हेच घडलं होतं. काश्मीरमधल्या मुजाहिदीनांच्या अशाच कहाण्या आहेत. धर्म, परिवर्तन, क्रांती कोणत्याही नावाखाली असो, सगळे जाहीरनामे स्त्रीच्या अब्रूवर का उठतात?) तरुण पोरंही चळवळीत पाठवण्याचे हुकूम यायला लागले.
   
आता पंतप्रधान म्हणाले तसा नक्सलवाद-माओवाद हा भारतासमोरचा सर्वांत मोठा धोका आहे. देशाच्या २५० जिल्ह्यांमध्ये नक्सलवादाचा प्रभाव आहे आणि १५० जिल्ह्यांवर तर नक्सलवाद्यांचंच राज्य आहे, असं म्हणणं फारसं चुकीचं ठरणार नाही. नेपाळ माओवाद्यांच्या ताब्यात गेल्यापासून नेपाळ ते आंध्र प्रदेश असा भारताच्या पूर्व भागात अर्धवर्तुळाकार रेड कॉरिडॉरतयार झालाय. नक्सलवाद्यांकडे चिनी बनावटीची शस्त्रास्त्रं, दारूगोळा, दळणवळणाची साधनं आणि अद्ययावत स्फोटकं आहेत. त्यांना चीनमध्ये प्रशिक्षण, साधनसामुग्री, फंडिंग मिळतंय. नक्सलवाद्यांनी समांतर स्टेटउभं केलंय असं म्हणण्याजोगी परिस्थिती आहे. आता त्यांचं उद्दिष्ट आहे भारतच तोडणं, भारताची लोकशाही खतम करणं. नक्सलवाद हे आता भारतातल्या चिनी परराष्ट्रनीतीची (अनीतीची) पावलं आहेत. नक्सलवाद, खालिस्तानवाद, काश्मीरमधला फुटीरतावाद, आसाम आणि पूर्वांचलमधल्या विभाजनवादी शक्ती आणि इस्लामिक दहशतवाद यांची आता मिलीभगत असल्याच्या वार्ता आहेत. नक्सलवादाची तंत्रं आणि धोरणं, कार्यपद्धती सुद्धा माओनं चीनमध्ये घडवलेल्या क्रांतीप्रमाणे आहेत. प्रथम ग्रामीण भाग ताब्यात घ्यायचा, शहरांचा पुरवठा तोडून प्राण कंठाशी आणायचे, मग शहरं आपोआप पडतीलच. शिवाय बौद्धिक सॅबोटॅजसाठी शहरी क्षेत्रात बुद्धिवादी शक्ती पंचमस्तंभीय काम करतातच. त्याचे लोण पुण्या-मुंबईच्या महाविद्यालयीन युवकांपर्यंत पोचलेत. जगदलपूर (छत्तीसगड)ला कॉंग्रेसच्या मिरवणुकीवर नक्सलवाद्यांनी केलेला क्रूर हल्ला आपण कोण्या एका पक्षावरचा हल्ला समजता कामा नये. इथे पक्षीय राजकारण न व्हावं. हा भारतीय लोकशाहीवरचा हल्ला आहे.
    मदर इंडियानं बंदूक उचलण्याची वेळ आलीय.
    फक्त मदर इंडिया २०१३मध्ये हिंसक सुपुत्रांना गोळ्या घालणं हा मुख्य उपाय नाही, प्राथमिकही नाही. आपण नक्सलवादाकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून बघता कामा नये, मुख्यत: विकासाचा प्रश्न म्हणून पाहिलं पाहिजे. आदिवासी समाजाचं शिक्षण, आहार, रोजगार या समस्या सोडवल्या पाहिजेत. जमीन, पाणी, जंगलावरचा आदिवासींचा अधिकार मान्य करून सबलीकरण साधलं पाहिजे. विकासाची फळं आणि संधी आदिवासींसह समाजाच्या सर्व घटकांकडे समतापूर्णपणे पोचतील अशी धोरणं आणि कार्यक्रम आखले जायला हवेत. पाकिस्तान आणि चीनपेक्षा देशांतर्गत राजकारण आणि सरकारी यंत्रणेतला भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, संवेदनशून्यता हा जास्त मोठा धोका आहे.
    आमचा फौजदार रविंद्र मांजरे गोंदिया जिल्ह्याच्या नक्सलवाद प्रभावित आदिवासी
PSI रवींद्र मांजरे
भागात पदरमोड करून आ
दिवासी मुलामुलींसाठी स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन वर्ग चालवतो. आणि आंध्र प्रदेशमधला IPS अधिकारी नक्सलवादग्रस्त आदिलाबाद जिल्ह्याचा SP - पोलिस अधीक्षक असताना, जिल्ह्यात नि:शस्त्र फिरतो, आदीवासींशी संवाद साधतो. असाच आमचा सचिन जाधव ओरिसाच्या नक्सलवाद प्रभावित कोरापूर जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून सर्व भिंती पार करत सर्वसामान्य आदिवासी माणसाशी संपर्क करतो, सरकारी यंत्रणा, विकासाच्या योजनांबद्दल त्यांच्या मनात विश्वास निर्माण करतो, तेव्हा हे सर्वजण धोके पत्करत असतात.
    पण उत्तराच्या दिशा सुद्धा यातूनच दिसतात.

4 comments:

 1. खूप सावध आणि संतुलित विश्लेषण! नक्षलवाद प्रभावित आदिवासींच्या मनात विश्वास निर्माण करणं खूप अवघड पण तितकंच आवश्यक आहे. दुर्दैवानं, व्यक्तिगत प्रगती आणि संपन्नतेबरोबर सर्वसामान्यांच्या मनातला सरकारी यंत्रणेवरचा अविश्वास वाढतोय - फक्त नक्षलवाद प्रभावित क्षेत्रातच नव्हे तर पुण्या-मुंबईसारख्या महानगरांतही! नक्षलवादावर तोडगा काढत असतानाच, देशाच्या इतर 'सुरक्षित' वाटणार्‍या भागांमधेही अशी एखादी 'समांतर' व्यवस्था उभारली जात नाही ना, यासाठीदेखील सतर्क राहणं आवश्यक वाटतंय.

  ReplyDelete
 2. मदर इंडीयाने बंदूक सावकाराच्या दिशेनेही रोखणे आवश्यक आहे. किंबहुना सावकारांना आवरणे जास्त आवश्यक आहे. कारण एक साधा नगरसेवक एका टर्ममध्ये कसा गब्बर होतो ही गोष्ट आता सर्वसामान्यापासून लपून राहिलेले नाही. आमदार आणि मंत्र्यांचा तर विषयच नको. मदर इंडियात तर केवळ एकच सावकार होता. मदर इंडीया २०१३ मध्ये राजकारण्यांच्या जोडीला भांडवलदार आणि नोकरशहा देखील आहेत.

  ReplyDelete
 3. Mother india nehamich pistul rokhun ubhi aahe fakt trigger dabaychi yogy sandhi milayala havi.....
  .

  ReplyDelete
 4. naksalvadi & atankvadi yatala farak sampat chalala hech khar!

  ReplyDelete