Thursday, June 6, 2013

मुंबईचे ‘मिस्‌फायर’ ‘न्यूरॉन्स’!... आणि आपण सगळेच
लेखांक ६९

सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य

मुंबईचे मिसफायर न्यूरॉन्स!
    वयाच्या १६ ते १९ च्या काळात सुद्धा मला ज्या मानवी अवयवाचं सर्वांत जास्त आकर्षण वाटलेलं आहे तो अवयव म्हणजे
    मेंदू!
    उत्क्रांतीनं मानवाला प्रदान केलेलं अद्भुत वरदान आहे मेंदू.  तो असा एक सुपर सुपर सुपर संगणक आहे की ज्याच्या मूळ क्षमतेच्या फारतर फार ते १० टक्के भाग आपण वापरतो असा अंदाज मेंदूचे शास्त्रज्ञ सांगतात. अगदी ज्ञानेश्वरापासून आईनस्टाइनपर्यंत अफाट बुद्धिमान समजली जाणारी माणसं मेंदूच्या क्षमतेच्या
१०% च भाग वापरतात असं समजलं जातं.
    मेंदूवरच्या संशोधनाला आत्ता आत्ता थोडी गती येतेय. आत्तापर्यंतच्या अभ्यास संशोधनात माणसाला एवढंच कळलंय की मेंदूविषयी माणसाला फारसं काही कळलेलं नाही.
    जेवढं कळलंय त्यात एवढं तर कळलंय की मानवाच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचं सर्व सूत्रसंचालन मेंदू करतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या सर्व संवेदना गोळा करणारी ज्ञानेंद्रियं अनुक्रमे कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक ही मेंदूची फक्त डेटा गॅदरिंग इन्स्ट्रुमेंट्‌स्‌आहेत. ते फक्त डेटामेंदूकडे पोचता करतात. आलेल्या डेटाचं संस्करण करून अन्वयार्थ लावण्याचं काम मेंदू करतो आणि त्यावर कृती काय करायची ते मेंदू ठरवतो, त्यानुसार आदेश देतो’. ते आदेश अंमलात आणणारी यंत्रणा म्हणजे मानवाची कर्मेंद्रियं. ज्ञानेंद्रियं मेंदूकडे डेटाघेऊन जातात, किंवा मेंदूचे आदेश कर्मेंद्रियांकडे पोचते केले जातात इलेक्ट्रो-केमिकल इम्पल्सद्वारा. या इलेक्ट्रो-केमिकल इम्पल्सची ये-जा, ज्या सूक्ष्म घटकांद्वारा केली जाते त्याचं नाव न्यूरॉन्स’. माहितीचं संकलन, अर्थान्वेषण आणि कार्यवाही न्यूरॉन्सच्या माध्यमातून होते. त्याचं इंग्लिशमधलं वर्णन आहे : न्यूरॉन्स फायरहोतात. माणूस एखाद्या विशिष्ट तर्‍हेनं
विचार करतो किंवा वागतो, म्हणजे न्यूरॉन्स त्या विशिष्ट तर्‍हेनं फायरहोतात आणि पुन्हा पुन्हा त्याच विशिष्ट तर्‍हेनं फायरहोत राहिल्यामुळे न्यूरॉन्सची मेंदूमध्ये एक वाट तयार होते, जास्त योग्य वर्णन आहे न्यूरॉन्सचं सर्किट तयार होतं. माणसाच्या सवयी, वर्तणुकीच्या मुळाशी हे न्यारॉन्सचं सर्किटच आहे. मेंदूचं हे शास्त्र मोडून माणसाच्या वर्तणुकीचं फारच अचूक वर्णन मांडण्यात आलंय - न्यूरॉन्सदॅट फायरटुगेदर वायरटुगेदर! जे न्यूरॉन्स बरोबरीनं फायरहोतात ते न्यूरॉन्स बरोबरीनंच वायरहोतात. माणूस भाषा शिकतो, आणखी काहीही शिकतो ते असतं मेंदूत तयार झालेलं न्यूरॉन्सच्या वायरिंगमुळे काम करणारं सर्किट’. तेव्हा एखादी सवय घडवायची, बदलायची म्हणजे आधीचं वायरिंगबदलून नवं जुळवायचं. सर्व सवयींचं, व्यसनांचं वर्तणुकीचं मूळ या न्यूरॉन्सच्या फायरिंगमधून तयार होणार्‍या वायरिंगमध्ये आहे.
    असं सर्व आधी वेळोवेळी समजावून घेतल्यावर मेंदूवरच्या अद्ययावत संशोधनावरचा एक ग्रंथ वाचताना तो लेखक-शास्त्रज्ञ सांगतो की सतत आवाज (नॉईज) ध्वनीप्रदूषणाच्या सान्निध्यात माणूस राहिला तर मेंदूचे न्यूरॉन्स’ ‘मिसफायरहोतात. मेंदूकडे काहीतरी चुकीचाच संदेश नेतात किंवा मेंदूचा आदेश काहीतरी चुकीच्याच पद्धतीनं कर्मेंद्रियांकडे नेतात किंवा आलेल्या डेटाचा अन्वयार्थ काहीतरी चुकीचाच लावतात. न्यूरॉन्स’ ‘मिस्‌फायरहोतात - माणूस सतत ध्वनीप्रदूषणाच्या सान्निध्यात राहिला तर.
    ग्रंथ वाचताना माझ्या मेंदूचे न्यूरॉन्सनीट फायरझाले का मिस्‌फायरझाले माहीत नाही मला.
    पण मला अचानक आठवला सर्वसामान्य मुंबईकर.
    सर्वसामान्य मुंबईकर सतत ध्वनी (आणि सर्वच) प्रदूषणाच्या सान्निध्यात आहे.
    काही थोड्या बड्या धेंडांबद्दल बोलत नाहीयोत आपण. त्यांची घरं वातानुकूलित, त्यांच्या आलिशान कार्स वातानुकूलित, पंचतारांकित कार्यालयं वातानुकूलित. त्यांच्याकडे कल्पनाही करता येणार नाही, केली तर आपले डोळे फाटतील एवढा प्रचंड पैसा आहे - पण तो समाजाच्या कल्याणासाठी कामी लावावा अशी बुद्धी मात्र त्यांच्याकडे नाही. पाचशे रुपयांच्या नोटेत तंबाखू भरून ते सिगार ओढू शकतात, त्यांची ३१ डिसेंबरच्या रात्री जेवढी दारू वहाते तेवढं पलिकडच्या पाड्यावरच्या आदिवासी माणसाला वर्षभरात पाणी नाही मिळत.
    त्यांच्याबद्दल बोलत नाहीयोत.
    सर्वसामान्य मुंबईकर.
    त्यांच्या घरात दर ३० सेकंदाला धडधडत जाणार्‍या लोकलचा खडखडाट सतत घुसत असतो. त्याच लोकलच्या डब्यामधून जनावरांची उपमा सुद्धा फिकी पडेल अशा खच्चून गर्दीतून तो कामाला जा-ये करत असतो. लोकलमधून उतरल्यावरही तो खच्चून गर्दीच्या, गोंगाटानं भरलेल्या गर्दीतून ऑफिसमध्ये वहात जातो. त्याचं घरदार, ऑफिस काही वातानुकूलित नसतं. मुंबईच्या आर्द्र, उष्ण, धूळ भरलेल्या हवेत त्याला डोक्यावरचा भरारा पंखा सतत चालू ठेवावा लागतो.
  
  रेल्वेचे रूळ म्हणजे झालीय खुली हगणदारी आणि शहर झालंय एक अजस्त्र कचरापेटी. या अविरत गोंगाटात एकमेकाला ऐकू जाण्याएवढ्या आवाजात बोलायचं तरी कायम वरच्या पट्टीत सूर लागतो. माणसाचं साधं बोलणं भांडकुदळपणासारखं वाटायला लागतं. लक्षावधी वर्षांच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेनं माणसाला सुरक्षित वाटण्यासाठी स्वत:भोवती एका किमान परीघाची - प्रायव्हेट स्पेसची - जीवशास्त्रीय सवय लागलीय. मुंबईच्या मर्यादित जागेत माणसांचे तर रोजच्या रोज नवे नवे लोंढे येऊन ओतले जाताय्‌त. गर्दीमध्ये माणसाला प्रायव्हेट स्पेसमिळत नाही, ‘प्रायव्हेट टाईमही नाही. सर्व संवेदना ओरबाडल्या जातात आणि कुणाचं तरी दुसर्‍याचं काही ओरबाडून घेतल्याशिवाय काही मिळणारच नाही असं वाटायला लागतं, माणसं असं वागायला लागतात. चिडचिडी होतात, एवढ्यातेवढ्यावरून हिंसेवर उतरतात. सर्व वातावरणात अनिश्चितता, असुरक्षितता, एक सुप्त हिंसकता, परस्परांबद्दल अविश्वास खदखदत असतो.
    प्रतिभावंत हिन्दी-उर्दू कवी शहरियार आपल्यामधून नुकताच गेला. जाण्यापूर्वी त्याला साहित्याचा सर्वोच्च असा ज्ञानपीठपुरस्कार मिळाला ही आनंदाची बाब आहे. त्यानं गमनचित्रपटात फारुख शेखवर चित्रित केलेल्या गझलच्या दोन ओळींत हा मुंबईचा अस्वस्थ आकांत सांगून ठेवलाय -
    सीने में जलन आँखों में तूफान सा क्यूँ है
    इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूँ है ।
    निदा फाजली नंही मुंबईच्या एकाकी हताशपणाला शब्द दिले : सजदा’ - संगीतकार जगजीतिंसग - गायक स्वत: जगजीत (तोही आता शरीरानं आपल्यात नाही) आणि लताबाई (त्या आणखी किमान शंभर वर्षं तरी आपल्यात असाव्यात, त्यांच्या बहिणींसहित)
    हर तरफ हर जगह बेशुमार आदमी
    फिर भी तनहाइयों का शिकार आदमी
    मिस्‌फायरहोणारे न्यूरॉन्स’?
    मुंबई असंख्य दारूगोळ्यांच्या कोठारांवर वसलीय
    किंवा अनेक ज्वालामुखींच्या तोंडावर.
    कोणती तरी एवढीशी ठिणगी भडका उडवायला बास आहे.
    किंवा अनिश्चित ज्वालामुखीचा स्फोट केव्हा घडेल काही सांगता येत नाही.
    प्रचंड गर्दी-गोंगाटातल्या ट्रॅफिकमधलं एक जरी वहान मध्येच बंद पडलं तर पुढच्या क्षणार्धात हजारो वहानं खोळंबून पडतात. मग वहातुकीची शिस्त कोलमडून पडते. परवापरवापर्यंत मुंबईच्या ट्रॅफिकला एक शिस्त होती, आता ती रोज ढासळताना दिसते. लोकलच्या अमानुष गर्दीला कंटाळलेले अनेक जण आता ५०-५० कि.मी. टू-व्हीलरवरनं जाणं पसंत करताय्‌त. कालबाह्य झालेल्या वहानांच्या प्रदूषणानं मुंबईचा, माणसाचा श्वास घुसमटतोय. म्हणून काळा धूर ओकणारी कालबाह्य झालेली वहानं काढून टाकावीत असा कोणा ट्रान्स्पोर्ट कमिशनरनं निर्णय केला तर ट्रक-टॅक्सी संपावर जातात. त्या दिवशी बेस्टबसेसमधली आधीच अमानुष असलेली गर्दी आणखी असह्य होते. उपनगरामधले रिक्शांचे भाव गगनाला भिडतात, तरी ट्रक-टॅक्सी दोन दिवस रस्त्यांवरून दूर राहिल्या तर मुंबईची हवा स्वच्छ झाल्यासारखी वाटते. पण परिवर्तन घडवू पहाणार्‍या अधिकार्‍यांचीच बदली होते. धूळ, धूर, हॉर्न्स सगळं परत पूर्ववत.
    तिकडे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर का होईना पण दिल्लीनं CNG चा स्वीकार केला. आता दरवेळी दिल्लीतलं प्रदूषण कमी कमी होताना जाणवतं. मुंबई मात्र काळवंडतच चाललीय.
    मुंबईचं पोलीस-लोकसंख्या गुणोत्तर अत्यंत विषम आहे. प्रशासकीय संकेतानुसार मुंबईची सार्वजनिक शांतता, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायला जेवढे किमान पोलीस मनुष्यबळ हवं त्याच्या कुठे जवळपास सुद्धा नाही. मग असलेल्या मनुष्यबळावर अती ताण येतोय. सर्वसामान्य मुंबईकरापेक्षा पोलीस ध्वनीप्रदूषणाचा जास्तच बळी ठरतो (त्याच्या मेंदूचे न्यूरॉन्स’ ‘मिस्‌फायरझाले तर काय होईल) मुळात जगात सर्वोत्तम असलेल्या मुंबई पोलीसचा विचका होत चाललाय. वर्दीचा अभिमान आणि नीतीधैर्य ढासळत चाललंय. गुंडांना वर्दीचा आता धाक वाटत नाही, पण चांगलं काम करून लोकांची दुवा घेणार्‍या अधिकार्‍यांची मात्र कुठेतरी खबदाडीत बदली होतेय. माझ्या नजरेसमोरनं दोन दृष्यं हलत नाहीत. ११ ऑगस्ट, रझा अॅकॅडमीचा आझाद मैदानावरचा मेळावा. तो नियोजनपूर्वक हिंसक झाला. वर्दीतल्या पोलीस - महिलांसकट - च्या अंगावर हात टाकण्याएवढा धीट, संघटित, हिंसक झाला.

दृष्य क्र.: दोन गुंड बेमुर्वतखोरपणे अमर जवान ज्योतीची नासधूस करताय्‌त. दृष्य क्र.: गुंडांची झुंड दगडफेक करत पोलीसांच्या मागे लागलीय, हातात स्टेनगन असलेला पोलीस झुंडीकडे पाठ फिरवून चालतोय, त्याच्या कंबरेत हात घालून गुंड त्याला धरताय्‌त आणि हातातली स्टेनगन गळून पडतेय फोटोत, अर्ध्यावरच. चालू सप्ताहात त्या ११ ऑगस्टला गुंडांच्या मारहाणीत जखमी झालेले संतोष सोनाप्पा हांडे शेवटी मृत्युमुखी पडले. इस्लामपूरमध्ये गावी त्यांचे अंत्यसंस्कार झाले.
संतोष सोनाप्पा हांडे

    दहशतवाद्यांना जेव्हा एखादी मोठी गेम करायची असते तेव्हा आधी ते रंगीत तालीम करतात. त्याला ड्राय रन्‌म्हणतात. ११ ऑगस्टची ती भीषण ४० मिनिटं मला ड्राय रन्‌सारखी वाटतात.
    मुंबईच्या पोटी विध्वंसासाठी आतूर असलेल्या अनेक शक्ती, असंख्य शक्यता दबा धरून बसल्याय्‌त. योग्य संधीची किंवा सीमेपलिकडून येणार्‍या इशार्‍याची वाट बघताय्‌त.
    भ्रष्टाचार तर एवढा भयानक वाढलाय की उदा. बांधकामामध्ये दर चौ.फुटामागे सरासरी ६०० ते ८०० रुपये हे भ्रष्टाचारामुळेच वाढलेले असतात.
    कामाठीपुरा आता नागपाड्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. किंबहुना कामाठीपुराच बेरोगजगार होत चाललाय कारण गल्लोगल्ली उच्चभ्रू म्हणवल्या जाणार्‍या सोसायट्यांमध्ये, पंचतारांकित हॉटेलांमध्ये, मोबाइल्सवर कामाठीपुर्‍याच्या शाखा उघडल्याय्‌त.
    अतीवृष्टी, भरती, अव्यवस्था आणि बेशिस्त या सर्वांचं परफेक्ट स्टॉर्मपुन्हा जुळून येऊन परत २६ जुलै घडेल, काही सांगता येत नाही.
    पुन्हा केंव्हाही समुद्रमार्गे हल्ला येऊ शकतो.
    आणि भारत-पाक युद्ध भडकलं तर अणुयुद्धाच्या अत्यंत व्यावहारिक शक्यता सर्व तज्ज्ञ सांगतात. अशा वेळी मुंबईवर संरक्षक कवच असल्याचं मला तरी माहीत नाही. मुंबईचं सिंगापूर किंवा शांघाय करता करता कुठे येऊन पोचलो, आपण सगळेच.
    गिरणगावचा कामगार देशोधडीला लागला. बंद पडलेल्या गिरण्यांमध्ये बॉलिंअॅलीज्‌तयार झाल्या. बेरोजगार कामगारांच्या पोरीबाळींसाठी लेडीज्‌ बारची रोजगार हमी योजना सुरू झाली. लोअर परेलची अप्पर वरळी होत टोलेजंग टॉवर्स उभे राहिले. त्याच्या FSI आणि TDR घोटाळ्यांमध्ये माणूसच गाडला गेला.
    मिस्‌फायरहोणारे न्यूरॉन्सघेऊन आम्ही कुठे आणि कुठवर जाणार आहोत मुंबई आणि आपण सगळेच.

No comments:

Post a Comment