Thursday, July 24, 2014

दहशतवादाचा केंद्रबिंदू पाकिस्तान

...आणि आपण सगळेच
                 लेखांक १२०


       दहशतवादाचा केंद्रबिंदू पाकिस्तान 


        सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य

         
पाकिस्तानी पत्रकार सलीम शहजाद यांचं पुस्तक ‘अल् काईदा ते तालिबान’. प्रत्येक भारतीयानं, प्रत्येक माणसानं हे काळजीपूर्वक वाचून सलीम शहजादला श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे. २ मे २०११ ला अमेरिकन मरीन्‍सीनी इस्लामाबादजवळच्या अबोटाबाद इथल्या घरावर हल्ला चढवून बिन लादेनचा खातमा केला. नंतर ISI नं सलीम शहजादला भेटायचा निरोप दिला होता. ४ मे ला त्याचं प्रेतच सापडलं.


स्वत: पाकिस्तानी पत्रकार असूनही पाकिस्तानी सैन्य, ISI, सत्ताधारी, इस्लामिक मूलतत्त्ववादी – लष्कर-ए-तैयबा, जमियत-उद्-दावा यांचा विरोध करायचा, तथाकथित ‘स्टेट’ अ‍ॅक्टर्स आणि‘नॉन-स्टेट’ अ‍ॅक्टर्स यांची मिलीभगत असल्याचं दाखवून द्यायचं, हे प्रचंड धैर्याचं कृत्य आहे. सलीम शहजादला तर प्राणांची किंमत मोजावी लागली. त्याला सलाम करावेत तेवढे कमी आहेत.पाकिस्तानच्या खाजगी क्षेत्रातला सर्वांत मोठा टीव्ही चॅनल म्हणजे ‘जीओ’– त्याचाही झुंजार पत्रकार हमीद मीर वर कराचीत जीवघेणा हल्ला झाला. त्याच्यामागे ISI असल्याचा अंदाज‘जीओ’नं व्यक्त केला. तर चॅनलला प्रचंड दंड झाला, चॅनल बंद पडायची वेळ आली, ‘जीओ’ला ISI वर पुराव्याअभावी आरोप केल्याबद्दल बिनशर्त क्षमा मागावी लागली. पाकिस्तानात प्रथमच लोकशाही मार्गानं निवडून आलेल्या सरकारनं ५ वर्षं पूर्ण करून, वेळेत निवडणुका झाल्या – याचा अर्थ पाकिस्तानात लोकशाही स्थिरावू लागली – (तसं खरंच झालं तर ते चांगलंच ठरेल) आणि राजकीय व्यवस्थेवरची सैन्य, ISI, इस्लामिक मूलतत्त्ववादी यांची पकड कमी झाली – असं बोललं जायला लागलं. ते किती वरवरचं आहे हे हमीद मीर-जिओ प्रकरणांत दिसून येतं.असाच दुसरा पाकिस्तानी धाडसी पत्रकार म्हणजे अहमद रशीद. अहमद रशीद सौ साल जिओ, कारण तो अजून जिवंत कसा – याचं आश्चर्य वाटावं इतकं पाकिस्तानातलं वातावरण धोकादायक आहे. अहमद रशीदचं इस्लामिक दहशतवाद उघडा पाडणं परखड आहे. त्यानं आपल्या ‘तालिबान’, ‘जिहाद’, ‘पाकिस्तान : डीसेंट इन् टु केऑस’ या पुस्तकांमधून पाकिस्तान आणि मध्य आशिया (कझाकस्तान वगैरे पाच ‘स्तानं’) इस्लामिक मूलतत्त्ववाद कसा वाढतो आहे आणि त्याच्या मध्यभागी पाकिस्तानच आहे, पण इस्लामिक मूलतत्त्ववादाशी सोयरीक करण्यामुळेच पाकिस्तान कसा अराजकाकडे कोसळत चाललाय, हे मांडलंय.


महिला पत्रकार ग्रेचेन पीटर्सनं पाकिस्तान अफगाणिस्तानात  प्रवास, संशोधन करून मांडलंय की अफगाणिस्तानमधली अफूची शेती, त्यानंतर अंमली पदार्थांचा पाकिस्तान द्वारा जगभर (भारतासकट : एंटर दाऊद!) होणारा व्यापार हा इस्लामिक मूलतत्त्ववादाचा आर्थिक पाया आहे. तो पाक सरकार-सैन्य- ISI च्या सहकार्यानं बळकट केला जातो. वजिरीस्तान भागात, अफगाणिस्तानपाकिस्तान सीमेच्या दोन्ही बाजूंना वावरणारं ‘हक्कानी नेटवर्क’सुद्धा पाकिस्तान सैन्य-सरकार- ISI च्या मदत-मार्गदर्शनाखाली इस्लामिक मूलतत्त्ववादाचा दहशतवादी पाया बळकट करतं. काबूलमध्ये भारतीय दूतावासावर झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्ताननं ‘हक्कानी नेटवर्क’च्या माध्यमातून घडवून आणला होता असं आता सिद्ध झालंय. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात मोलाची भूमिका बजावू शकले असते – असे माजी राष्ट्राध्यक्ष बुर्‍हाणुद्दिन रब्बानी यांची त्यांच्या काबूलमधल्या राहत्या घरी हत्या घडवून आणण्यामागे ‘हक्कानी नेटवर्क’च्या द्वारा पाकिस्तानी ISI च आहे.मुळात पाकिस्तानच्या बाजूचा भारतविरोधी अमेरिकन तज्ज्ञ ‘स्टीफन कोहेन’नं त्याच्या भारत-पाकिस्तानवरच्या ग्रंथात सांगतो की पार २०४७ मध्ये सुद्धा म्हणजे – १०० वर्षांच्या लढाईनंतर – काश्मिर प्रश्न सुटलेला असेल आणि भारत-पाकिस्तान संबंध सुरळित असतील हे अशक्य आहे. अफगाणिस्तानमधल्या इस्लामिक मूलतत्त्ववादी दहशतवादी लढाईसाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर सैनिकी सामुग्री घ्यायची, पण तिचा वापर भारताविरुद्ध करायचा आणि दहशतवादाविरुद्ध नाटकी लढाई करायची – उलट भारतविरोधी दहशतवादाची जोपासना करायची हे पाकिस्तानचं धोरण असल्याचं स्टीफन कोहेन, ब्रुस रायडल् हे अमेरिकन तज्ज्ञ आपापल्या ग्रंथांत स्पष्टपणे सांगतात. अमेरिकेकडून मिळणाऱ्या लष्करी सामुग्रीचा वापर भारताविरुद्ध केला जातो, हे तर माजी लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी आपल्या आत्मचरित्रात – ‘इन् द लाईन ऑफ फायर’मध्ये मान्य केलंय.

आता अगदी नुकताच, अमेरिकी महिला पत्रकार कारलोटा गाल यांचा ग्रंथ प्रकाशित झाला – ‘राँग एनिमी’. अमेरिकेची अफगाणिस्तानातून माघारी जायची वेळ जवळ येत चालली. वर्तमान राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या राष्ट्रपतीपदाच्या दोन टर्म्स पूर्ण झाल्यामुळे, घटनात्मक तरतुदीनुसार त्यांना परत राष्ट्राध्यक्ष होता येणार नाही, अशा वेळी अब्दुल्ला अब्दुल्ला विरुद्ध अब्दुल्ला घानी अशी घमासान, विवादास्पद, म्हणून धोकादायक निवडणूक होते आहे. त्यावेळी तालिबानचे हात बळकट करण्याचं काम पाकिस्तान करत आहे. गेली १३ वर्षं अमेरिका अफगाणिस्तानात जी दहशतवादविरोधी लढते आहे, ती ‘राँग एनिमी’विरुद्ध आहे असं कारलोटा गाल यांचं म्हणणं आहे, त्यांच्या मते खरा शत्रू पाकिस्तान आहे. असाच अभिप्राय स्पष्टपणे नोंदवला आहे, अमेरिकेचे माजी लष्करप्रमुख माईक म्युल्लेन् आणि CIA चे प्रमुख लिओन पनेटा यांनीही. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरूनही म्हणाले आहेत की जगातल्या प्रत्येक दहशतवादी घटनेचे धागेदोरे अंतिमत: कुठेतरी पाकिस्तानात जाऊन मिळतात. त्या पाकिस्तानच्या लेखी मुख्य शत्रू भारत आहे. समान शत्रूविरुद्ध – म्हणून पाकिस्तान-चीन ‘ऑल व्हेदर’ मैत्री – सहकार्य आहे. भारताविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानला ‘स्ट्रॅटेजिक डेप्थ’ हवी. म्हणून अफगाणिस्तामधली राजवट भारताला अनुकूल असणारी नको : प्रतिकूलच हवी, म्हणजे तालिबान. त्यासाठी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधल्या तालिबानला जोपासत राहायचं, भारतातल्या दहशतवादी कारवायांसाठी वापरायचं हे पाकि धोरण बदलल्याची खात्री बाळगता येणार नाही. पण पाकिस्ताननं जोपासलेला हा दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तानवरच उलटू शकतो. तसं झालं तर पाकि अण्वस्त्रं दहशतवाद्यांच्या हातात पडू शकतात – तशी व्यवस्था करून पाकिस्तान हात वर करून मोकळा होऊ शकतो – की हे ‘नॉन-स्टेट’ अ‍ॅक्टर्सचं कृत्य आहे! सर्व धोकादायक शक्यतांना आकार यायला सुरुवात होईल – अमेरिका अफगाणिस्तानमधून माघारी जाईल तेव्हा – किंवा त्यासाठीही थांबायची वेळ येणार नाही –शहीद पाकिस्तानी पत्रकार सईद सलीम शहजाद यानं आपल्या ‘अल् काईदा ते तालिबान’ग्रंथाच्या शेवटाकडे लक्षपूर्वक म्हटलंय की हा अध्याय मी खरा भारतीय वाचकांसाठी लिहीत आहे. २०११ पूर्वीच प्रसिद्ध झालेल्या आपल्या पुस्तकात तो म्हणतो की काही अतिरेकी इस्लामिक शक्ती सातव्या शतकातल्या खलिफा पदाची पुनस्थापना करून जगावर इस्लामिक राज्य स्थापन करण्याच्या कल्पनेनं झपाटलेल्या आहेत. त्यांच्या मते सातव्या शतकात जसा त्या वेळेला दोन बाजूंना असलेल्या दोन बलाढ्य साम्राज्यांचा – पर्शियन आणि बायझेंटाईन – पराभव करून इस्लाम चा विजय झाला तसा आता पुन्हा जगातल्या दोन बलाढ्य साम्राज्यांचा – सोव्हिएत आणि अमेरिकन – पराभव करून जगावर इस्लामचं राज्य स्थापन होण्याची वेळ आलीय. त्या अतिरेकी शक्तींच्या मते निर्णायक लढाई अफगाणिस्तानपासून गंगेच्या खोऱ्यापर्यंतच्या प्रदेशात लढली जाणार आहे.  खिलाफतची पुनस्थापना करण्याचं ध्येय अल् कायदानं सुद्धा पूर्वी जाहीर केलंच होतं. आता अचानक अज्ञातातून वादळाच्या वेगानं ISIS (Islamic State in Iraq & Syria) नं इराकचा भाग जिंकून खलिफा पद जाहीर केलंय.

पुण्यात फरासखान्यापाशी बॉम्बस्फोट झाला. मूळ योजना फसली, नाहीतर मोठी हानी झाली असती, आता शोध चालू आहे दहशतवादी धागेदोरे कुठपर्यंत जातात त्याचा.चार मराठी तरुण अचानक इराकमध्ये ISIS बरोबर असावेत असं निष्पन्न होतंय. पडद्यामागून सूत्रं हलवत ISIS च्या ताब्यातल्या भारतीय नर्सेसना सुरक्षित परत आणलं, यात भारताच्या विदेश-नीतीचा एक विजय निश्चित आहे.

तेंव्हा हे सगळं आठवलं

1 comment: