Tuesday, April 1, 2014

‘हिंदूज्‌’ : अॅन आल्टरनेटिव्ह हिस्टरी

लेखांक १०२
...आणि आपण सगळेच


सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य

हिंदूज्‌’ : न आल्टरनेटिव्ह हिस्टरी

वेंडी डॉनिजर. आणि त्यांचा 700 हून जास्त पानांचा ग्रंथ : : हिंदूज्‌ : अॅन आल्टरनेटिव्ह हिस्टरी.
  
   या ग्रंथात हिंदू धर्म, इतिहास, समाज आणि संकल्पनांची हिंदूज्‌ : अॅन आल्टरनेटिव्ह हिस्टरी ज्या प्रकारे मांडणी केली आहे त्यानं दुखावलेल्या काही व्यक्ती आणि संघटनांनी ग्रंथाचे प्रकाशक पेंग्विन्‌कडे धाव घेतली. पेंग्विन्‌च्या भारतातल्या प्रमुखांनी हा ग्रंथ बाजारातून मागे घेत असल्याची घोषणा केली. ते म्हणाले भारतीय कायदा त्या प्रकारचा आहे, म्हणून आपण हा ग्रंथ मागे घेत आहोत. हिंदूंच्या भावनांचा आदर म्हणून नाही, ग्रंथ अशास्त्रीय, विकृत आहे, म्हणून नाही, हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगिरी नाही किंवा हे आमचं, लेखकाचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, म्हणून ग्रंथ मागे घेणार नाही, अशी ठाम व्यवसायनिष्ठ, तत्त्वनिष्ठ भूमिकाही नाही. भारतातला कायदा तसा आहे, हे ग्रंथ बाजारातून मागे घेण्याचं कारण.
     BBC, CNN या चॅनल्सनी, भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कशा मर्यादा आणल्या जाताय्‌त हे मांडलं. त्यासाठी वेंडी डॉनिजर यांची मुलाखत दाखवली, या ग्रंथात हिंदू धर्माचं विकृत चित्रण आहे, म्हणून पेंग्विन्‌कडे जाणारे श्री.बात्रा BBC, CNN ला सापडले नसावेत. त्या चॅनल्स्‌नी वेंडी डॉनिजर आणि पेंग्विन्‌ची बाजू मांडली. टाईमया अमेरिकन साप्ताहिकात श्री.बात्रांची मुलाखत आली.
     भारतातल्याही काही भाष्यकारांनी हा फॅसिस्ट शक्तींचा विजय झाला, अशा झुंडशाहीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येतो अशी भूमिका मांडली. काही काळापूर्वी जितेंद्र भार्गव यांच्या डीसेंट ऑफ एअर इंडियाया पुस्तकावर विमानमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आक्षेप घेतला होता, त्याची प्रकाशन संस्था ब्लूम्स्‌ बरीनं सुद्धा ते पुस्तक बाजारातून मागे घेतलं. हे सर्व घडत असताना वेंडी डॉनिजर यांचं २०१३ मध्ये प्रकाशित झालेलं ऑन हिंदुइझम्‌हे पुस्तक सुद्धा बाजारातून मागे घेण्यात आलं आहे.
     एकूण काय फॅसिस्ट शक्तींच्या दबावाखाली भारतातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे. तसा भारतातला कायदाही जुनाट, बुरसटलेला आहे!
     संशोधक म्हणवणार्‍या या काही अमेरिकन लेखकांचं एक बरं आहे, तो जेम्स्‌ लेन येऊन शिवाजी महाराजांच्या संदर्भात काही विकृत लिहून गेला, भांडणं भारतात लागली - मला वाटतं तोच त्याचा हेतू असावा. अमेरिकेतून मिटक्या मारत तो मजा बघत बसला. आपली काही वृत्तपत्रं त्याच्या आख्ख्या पानभर मुलाखती छापत राहिली. सलमान रश्दीच्या सॅटॅनिक व्हर्सेस्‌या काल्पनिक कादंबरीवर तत्परतेनं बंदी घालणार्‍या भारत सरकारनं जेम्स्‌ लेनच्या शिवाजी : द हिंदू किंग इन्‌ इस्लामिक इंडियाया पुस्तकावर बंदी घालायला नकार दिला. जेम्स्‌ लेन बसला अमेरिकेत. महाराष्ट्रात वैचारिक, शारीरिक, राजकीय हिंसाचार निर्माण झाला. तशी भारतात या प्रकारची फाटाफूट आणि हिंसाचार निर्माण करायला बाहेरच्या शक्तींची गरज नाही. आपण आधीच आपसातल्या जातीपाती, भाषिक, धार्मिक फाटाफुटींनी स्वत:विरुद्ध विभागलेले आहोत, फुटलेले आहोत.
     त्या आगीत वेंडी डॉनिजरनी होलसेल तेलाचे टँकर ओतलेत, विकृत भावानं.

     अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात होत असल्याचा मुद्दा मांडणारे हे लक्षात घेत नाहीत की श्री.बात्रा किंवा त्यांची शिक्षा बचाव आंदोलन समिती’ - पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करत नाही - आत्ताचं सरकार ती घालणार नाही, ही गोष्ट वेगळी. लेखकाला किंवा प्रकाशकाला कोणत्याही प्रकारे शारीरिक, वाचिक धाकदपटशा हिंसाचार करत नाही. प्रकाशकाला समजावून सांगतात की फार शास्त्रीय अभ्यास असल्याची पोज्‌घेणार्‍या या ग्रंथात हिंदू धर्म, संस्कृती, समाज, संकल्पना या सर्वांचंच विकृत चित्रण करण्यात आलंय. त्यांनी आपला मुद्दा भारताची राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटीत सांगितला. दंगली नाही केल्या, बॉम्बस्फोट नाही घडवले, कुणाचे हातपाय नाही तोडले. असलेल्या कायद्याच्या चौकटीत, फारतर, कायदेशीर कारवाईचा - तो पण , नाईलाजानं इशारा दिला. प्रकाशकानं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा करून लढायला काही हरकत नव्हती. आणि समजा धार्मिक भावना दुखावण्याबाबतचा कायदाही जुनाट, बुरसटलेला, प्रतिगामी असेल - तर तोही बदलायला - बदलण्यासाठी आवाज उठवायला नाही हरकत. कायद्याचं राज्यसर्वांना समान आहे, असायला पाहिजे. कायद्यासमोर सर्व समानआहेत - असायला पाहिजेत आणि कायद्याचं सर्वांना समान संरक्षण आहे, असायला पाहिजे.
     वेंडी डॉनिजर. ग्रंथाच्या जॅकेटवर त्यांची ओळख दिलीय. त्यात म्हटलंय की संस्कृतमध्ये दोन डॉक्टरेटमिळवल्याय्‌त - संस्कृत आणि भारत विद्या (Indian Studies) - ते पण हार्वर्ड आणि ऑक्सफर्डमधून. त्यांनी अनेक संस्कृत आणि हिंदू धर्मावरच्या ग्रंथांचं भाषांतर केलंय. लंडन कॅलिफोर्निया विद्यापीठांत शिकवलंय आणि सध्या शिकागो विद्यापीठात धर्माचा इतिहासया विषयाच्या त्या प्राध्यापक आहेत.
     ‘हिंदूज्‌ : अॅन आल्टरनेटिव्ह हिस्टरीया शीर्षकातही ग्रंथाचा एक आत्मविश्वासपूर्ण दावा दिसून येतो. जॅकेटवर करून दिलेल्या परिचयातही हा दावाच जास्त आत्मविश्वासानं मांडलाय. जगातला सर्वांत प्राचीन धर्म समजावून घेण्यासाठी हा प्रभावी आणि सुनिश्चित ग्रंथ आहेअसं ठामपणे सांगून या धर्मातल्या कोणत्याच संकल्पना सर्व काळ सर्व समाजाला लागू पडत नाहीत, तरीही हिंदू धर्माचं मोठेपण हे आहे की...करत करत वेंडी डॉनिजर हिंदू धर्मातल्या अग्रगण्य भाष्यकार आहेत असं म्हटलंय; की संस्कृत आणि व्हर्नाक्युलर’ (शब्दश: अर्थ - गुलामांची भाषा!) भाषांमध्ये स्त्रिया आणि दलित-बहुजन समाजाबद्दल कसं समृद्ध, करुणामयी (compassion) साहित्य आहे हे ग्रंथात मांडलंय. संस्कृत ग्रंथ रचणार्‍या ब्राह्मण विचारवंतांहून वेगळ्या प्रतिभावंत लेखकांची आकर्षक बहुविधता - हा ग्रंथ मांडतो, असा मोठा दावा पुस्तकाच्या जॅकेटवर केलाय.
     २००९ मध्ये प्रकाशित झालेला हा ग्रंथ मी तेंव्हाच घेतला, वाचला, अभ्यासला. तेंव्हा दिसून आलं की लेखिका किंवा ग्रंथाच्या परिचयाप्रीत्यर्थ लिहिलेला एकही शब्द खरा नाही. खरा आहे एक टोकाचा विकृत, अशास्त्रीय, अत्यंत असभ्य, कुत्सित उपहासपूर्ण सूर. प्रत्येक संकल्पनेचं विकृतीकरण केलंय. अगदी प्राथमिक संस्कृत शब्दांची सुद्धा चुकीची, विकृत भाषांतरं केलीय्‌त. या बाईंनी कसल्या दोन डॉक्टरेट्‌ केल्या, कुणास ठाऊक. ठरवून विकृतीकरण करण्यासाठीच अभ्यास केला.
     उदाहरणार्थ त्या इतिहासशब्दाचा अर्थ That’s what happenedअसा देतात. इति+ह+आसअसा बनणारा शब्द That’s HOW it  happened - हे असंघडलं - असं सांगतो, केवळ हे घडलंअसं सांगत नाही. That’s what happened हा Historyया संज्ञेचा अर्थ होतो. Howमध्ये कारणमीमांसेचा शोध येतो, तो इतिहासया संज्ञेत आहे. पण या बाई आधी भाषांतरही ठाम आत्मविश्वासानं चुकीचं देऊन, मग म्हणतात की भारतीय इतिहास म्हणजे as what people said happened - म्हणण्याचा अर्थ हा की या सगळ्या भाकडकथा, दंतकथा आहेत. अशी आख्ख्या पुस्तकभर चुकीची भाषांतरं आहेत. वासनाचं भाषांतर Perfumes’ (पान ३७) करतात या बाई - अत्तर? सुगंध? ’Desiresकरण्याएवढं त्यांचं इंग्लिशही नीट नाही, संस्कृत कुठून नीट असणार? ‘योगशब्दाचा अर्थ Yoke’ – as in horses to chariots (पान ४२) हा चांगला जोक आहे.योगम्हणजे जोडणे’ - माणसाला स्वत:शी, निसर्गाशी, विश्वाशी जोडणे - घोड्याला रथाशी जोडणे नाही. ऋग्वेदयाचं भाषांतर ‘Knowledge of verses’ (पान १०४) असं आहे - ते Knowledge of Truth पाहिजे. कामधेनूला त्या Wishing cowम्हणतात! नर्मदाचं भाषांतर Jester’ (विदूषक) करतात - अर्थ आहे गर्व हरण करणारी. आरण्यकचं भाषांतर Jungle Bookरे देवा (पान १६७)! म्हणजे रुडयार्ड किपिंलगचा आत्मा धन्य झाला! उपनिषदम्हणजे Sitting beside’ (पान १६७) हा म्हणे संस्कृतचा अभ्यास. अर्थ आहे sitting close’. सर्व प्राचीन विचारव्यूहाचं एकात्मीकरण अद्वैत वेदांतामध्ये प्रकट होतं. तर या बाईंचं म्हणणं आहे, ’ Dualism (द्वैत) is Indian way of thinking’ (पान १०). मग, हिंदू धर्माच्या जागतिक अधिकारी असणार्‍या या बाई Is there such a thing as Hinduism’ (पान १२४) असा एकदम मूलभूतच प्रश्न उपस्थित करतात. बरं हिंदू धर्म नावाचं काही अस्तित्वातच नसेल, तर एवढा ७०० पानी ग्रंथ लिहायचा कशाला माणसानं? तर हेच तर सांगायला, की हिंदू धर्म असं काही नाहीच आहे. हा यांचा सखोल अभ्यास आणि अधिकार!
     बरं काही चुका किंवा मतभेद असणं कोणत्याही ज्ञानशाखेत अगदी शक्य आहे. वेगवेगळ्या वस्तुनिष्ठ फॅक्टस्‌चे अन्वयार्थ वेगवेगळे लावले जाऊ शकतात - हेही अगदी साहजिकच आहे, नव्हे नव्हे आवश्यक आहे, त्यानं चिकित्सक प्रतिभेची जोपासना होते. पण या बाईंच्या अनेक ठिकाणी बेसिक फॅक्टस्‌च चुकीच्या आहेत, काळाची वेडीवाकडी उलटापालट झालीय. गायत्री मंत्राची रचना वाल्मिकीनं केली (पान २५१) हे या बाईंचं अगाध ज्ञान! (बाय द वे, विश्वामित्रानं केली - नाही आपलं, सांगितलेलं बरं, पुन्हा अस्पष्टता राहायला नको.) महाभारतात ७५ हजार श्लोक आहेत म्हणतात बाई! एक लाख आहेत. Rama is said to be perfect man’ (पान ३०२) ही अक्कल. राम मर्यादापुरुषोत्तमआहे. पूर्णपुरुषहा शब्द कृष्णासाठी वापरला जातो. Arabs invaded Ganges valley in 12th centuryहे या बाईंचं भारताच्या इतिहासाचं ज्ञान. अरबांनी सिंधवर आक्रमण केलं आठव्या शतकात. गंगेच्या खोर्‍यात अरबांचं आक्रमण कधीच पोचलं नाही - तुर्क, पठाण, मुघलांचं पोचलं, अरबांचं नाही. कुंभमेळादर वर्षी भरतो, म्हणतात या बाई. त्यांना दर वर्षांनी भरतो हे माहीत नाही. पण या हिंदू धर्म आणि इतिहासाच्या जागतिक अधिकारी व्यक्ती!
     नुसती चुकीची नाही, हिंदू धर्मातली एकही गोष्ट विकृत, वेडीवाकडी, मोडतोड करायची सोडली नाही या बाईंनी. Animals often represent both women and lower classअसा एक विकृत शोध लावला यांनी. विविध मानवी स्वभावांचं प्रतीक म्हणून प्राण्यांचे संदर्भ येतात. हिंसाहा शब्द फक्त माणूस आणि प्राणी यांच्या संदर्भात येतो असा यांचा शोध आहे. म्हणून त्या सरसकट ठोकून देतात Animals often represent both women and lower class’ (पान १०). गुप्त साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती म्हणणार्‍या बाईंनी किंवा त्यांच्या नावानं कोणी, फार अधिकारीअसल्याचा तरी दावा करू नये नं!
     दिव्य ज्ञानानं ओथंबलेली त्यांची काही दे दणादण ठोकून देणारी विधानं पाहिली, की चांगलं मनोरंजन होतं. Physical was a low trade in ancient India’ (पान ११४) हा शोध कोणत्या सखोल संशोधनानंतर लागला यांना? ’Rudra is the maser of poison and medicine’ (पान १२०) असं ठरवलं यांनीच!
     वेद, उपनिषद, योग, यज्ञ, गुरु-शिष्य नातं, भक्ती, रामायण, महाभारत कशाकशाचंही विकृतीकरण करायचं शिल्लक ठेवलं नाहीये डॉनिजर बाईंनी. Intoxication though not addition is the CENTRAL THEME of Vedas’(पान १२२) हे कुठे सापडलं बाईंना? ती त्यांची, वैयक्तिक, मध्यवर्ती संकल्पना असलेल्या स्थितीत हे पुस्तक लिहिलं असावं त्यांनी. आत्मा, कर्म, पुनर्जन्म, भक्ती या संकल्पनांचीही विकृत टिंगल केलीय. या गोष्टींकडे आता आधुनिक विज्ञानही संकेत करायला लागलंय, हा मुद्दा या बाईंच्या समजण्यापलिकडे आहे. जो व्यासभारतीय संस्कृतीचा गुरु आहे; वेदांच्या संहिता तयार करणारा आहे, त्याचं वर्णन करतात या बाई Vyasa appears in Mababharatsa as a kind of a walking semen’(पान २९३), कुठे सापडलं या बाईंना व्यासाचं वीर्य! कालिदासही विकृत करताना डॉनिजर बाईंचं वाक्य आहे - It’s a general perversity of Indian art’ - सर्व भारतीय कलांमध्येही यांना विकृतीच सापडली.
     हे सर्व ठरवून पद्धतशीरपणे केलेलं विकृतीकरण आहे. याला पाश्चात्त्य आणि अमेरिकन जगतात व्यासंगम्हणत असतील तर त्यांच्या व्यासंगाची कीव केली पाहिजे. या बाईंची मेथडॉलॉजीवापरली तर बायबलम्हणजे पोर्नोग्राफी आहे असं दाखवता येईल. जीझस ख्राईस्ट त्याच्या आईला मदर मेरीला मानवी संबंधांतून नाही तर थेट ईश्वरापासूनझाला - या इमॅक्युलेट कन्सेप्शनया श्रद्धेची काहीही विकृत टवाळी करता येईल. चर्चमध्ये ब्रेड आणि वाईन प्रसाद म्हणून घेण्याच्या युखॅरिस्टया संकल्पनेत ख्रिश्चन व्यक्तीची श्रद्धा असते की मी जीझसचं रक्त आणि मांस ग्रहण करत आहे - म्हणजे माझ्यात जीझसचा अंश उतरेल - या संकल्पनेला नरमांसभक्षण (Cannibalism) चं विकृत वळण म्हणता येईल. पण भारतीय - हिंदू मन तसं म्हणणार नाही, म्हणूही नये.
     १९२७ मध्ये एक अमेरिकन बाई कॅथरीन मेयो यांनी मदर इंडियाअशा लोभस नावानं असाच एक विकृत ग्रंथ लिहिला होता. त्याचं वर्णन गांधीजींनी Drain Inspector’s Report’ - गटार निरीक्षकाचा अहवाल, असं केलं होतं. या बाईंनी सगळ्या हिंदू धर्माला, गटार म्हणून सादर केलंय.

     Oh, God, forgive her, for she knows not what she writes!

2 comments:

  1. डॉनिंजर बाईंचं हे पुस्तक वाचायला घेतलं आहे. सहज चाळता चाळता महाभारत विषयावर जाऊन थांबले. ८०० हून अधिक पानांच्या या पुस्तकामध्ये या बाईंना महाभारतातील एकाही कथेला विस्तृत स्वरूपात मांडता येऊ नये ना! प्रत्येक व्यक्तिरेखेविषयी लिहिताना It's another long story, yet another long story असं लिहून काम भागवलेलं आहे. सूर्यदेवाने कुंतीचा XXXX केला असं लिहिलं आहे चक्क! जर महाभारत सुद्धा या बाईंना नीट मांडता आलं नसेल, तर यांनी संस्कृतचा अभ्यास काय कप्पाळ केला असेल?

    (मागे मार्शल आर्ट्स शिकत असताना आम्ही असं ऐकायचो कि युद्धकला न शिकता, नुसते पैसे देऊन सुद्धा ब्लॅक बेल्ट मिळू शकतो पण कठीण परिस्थितीमध्ये स्वसंरक्षणासाठी त्याचा काय उपयोग होणार? तद्वतच या बाईंनी हिंदू धर्म, संस्कृती या संदर्भात ज्या काही पदव्या मिळवल्या आहेत, त्या अशाच द्रव्य खर्चून मिळवल्या असाव्यात. प्रत्यक्ष वाद-विवाद, चर्चा करताना या बाईंना कुठवर पाडाव लागणार?) असो. मात्र हे पुस्तक भारतात विक्रिसाठी सहज उपलब्ध आहे, याचा विषाद वाटतो.

    ReplyDelete
  2. Sir aapan umedvar pahun matdan karata ki parti pahun ?
    Bhartiya rajkaranat aapalyala changalya madhun sarvotam nivadayache nasun vaeta madhun sarvat kami vaet nivadayache asate ase maze mat aahe.Mi swatah parti pahunach matdan karto karan swarv nirnay sarkar mahun party chya vichardharevar aani tyanchya napha-nuksan varach avalambun asatata.
    Aani ya veli aapan konala matdan karnar aahat ? (NDA,UPA,AAP,THIRD Front...etc.) aani ka ?

    ReplyDelete