लेखांक ९९
|
सामान्य नागरिकाच्या
दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य
भारत, दिनांक १७ फेब्रुवारी
२०१४ मुक्काम पोस्ट धर्मशाला, हिमाचल प्रदेश.
आज मी दलाई लामांना
भेटलो. आयुष्यात दुसर्यांदा मला सदेह बुद्धाबरोबर भेटता आलं.
या वर्षी दलाई लामा
माझे ‘व्हॅलेंटाईन’ होते. मूळ भेट १४
फेब्रुवारीला ठरली होती. पण त्या दिवशी दिल्ली विमानतळावर विमानात २ तास
बसल्यानंतर सांगण्यात आलं की धर्मशालाच्या
खराब हवामानामुळे विमानच रद्द. मग जम्मूमार्गे पोचलो धर्मशालाला. पण १४
फेब्रुवारीचा ‘मुहूर्त’ चुकलाच. आज दलाई लामा
अमेरिकेच्या दौर्यावर निघाले, त्यापूर्वी त्यांची भेट मिळाली.
पहाटेच्या
प्राजक्ताच्या प्रसन्न सड्यासारखे सात्त्विक दलाई लामा हे एक ७८ वर्षाचं निरागस, लोभसवाणं बालक आहे.
आपल्यासमोर जगणारा, हलता बोलता बुद्ध आहेत. आपल्याच एका पुस्तकात त्यांनी
म्हटलंय की अनोळखी माणसालाही तो जन्मानुजन्मांचा जिवाभावाचा मित्र असावा तसे भेटा.
आज सकाळी तसेच भेटले ते. आणि मी तर तसा अनोळखी सुद्धा नाही. २००१ मधे मी भारत
सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण खात्याच्या ‘नेहरू युवा केंद्र संघटन’ या अखिल भारतीय
संघटनेचा महासंचालक होतो, तेंव्हा त्यांना भेटलो होतो - भारतीय आणि तिबेटी
युवकांमध्ये सर्व प्रकारचं सांस्कृतिक आदान-प्रदान व्हावं, अशी योजना घेऊन आज एक
तपाहून अधिक काळ लोटल्यावर पुन्हा भेटीची संधी मिळाली. एका तपापूर्वी ते जसे होते
- तसेच आजही भावले - तपःपूर्ती. ज्ञानेश्वर माऊलीच्या संकल्पनेतले ‘मार्तंड जे तापहीन’ मग ‘ते सर्वाही सदा सज्जन
/ सोयरे होती’
असे ते
जन्मानुजन्मांची सोयरिक असल्यासारखे आमच्याशी बोलले.
त्यांच्याकडे बघताना, त्यांच्या सहवासात
वावरताना,
त्यांचं
खळखळून खरंखुरं हसणं ऐकताना वाटत नाही की अस्तित्वाला धोका निर्माण झालेल्या -
अन्याय,
अत्याचार, कत्तलींना बळी पडणार्या
- ज्या समाजाची भाषा, लिपी, संस्कृती, धर्म... सारं काही आक्रमक, विस्तारवादी, साम्यवादी (म्हणून
धर्मविरोधी) चीनच्या निर्दय वरवंट्याखाली चिरडल्या जाणार्या -तिबेटी समाजाचे ते
विश्वव्यापी नेता आहेत. इतक्या अत्याचाराची शिकार झालेला एखादा समाज हिंसा आणि
द्वेषानं पेटून उठला असता (आणि ते समर्थनीय सुद्धा ठरलं असतं) किंवा निराशेनं खचून
मट्कन् बसला असता. पण या चौदाव्या दलाई लामांच्या नेतृत्वाखाली तिबेटी समाज बुद्धाची
करुणा जतन करत,
जोपासत
हान-चिनी वरवंट्यांचा प्रतिकारही करतो आणि सार्या विश्वातल्या सर्व धर्मांचं
अद्वैत साधणारा विचार आणि कार्यक्रमही मांडतो.
अन्याय
अत्याचाराविरुद्धचा लढा केवळ प्रतिक्रियावादी, द्वेषमूलक होऊ न देता, संघर्षाला वैश्विक
विधायक आशय द्यायचा - या बाबतीत दलाई लामा भारतीय संत परंपरा - गांधीजी आणि नेल्सन
मंडेलांच्या मालिकेतले आधुनिक ‘बुद्ध’ आहेत. बौद्ध तत्त्वज्ञानाच्या संकल्पनेनुसार ‘बोधिसत्त्व’ आहेत. ‘अवलोकितेश्वरा’चा अवतार आहेत.
६ जुलै १९३५ ला
त्यांनी आत्ताचा देह धारण केला. तिबेटच्या पार पूर्वेकडच्या, चीनला लागून असलेला ‘आमडो’ प्रदेशातल्या तक्तेसर
नावाच्या छोट्या गावातल्या अत्यंत गरीब शेतकरी घरातला त्यांचा जन्म. जन्माचं नाव
ल्हामो धोंडुप.
दलाई लामा हे १३ व्या
शतकापासून तिबेटी बौद्ध धर्माचं सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय पद. त्याला मंगोल ‘खान’ आणि चिनी सम्राटांनी
सुद्धा तेंव्हापासून मान्यता दिली होती, गुरुस्थानी मानलं होतं. ‘लामा’ म्हणजे बौद्ध ‘भिक्खु’, ‘दलाई’ म्हणजे ‘ज्ञानाचा महासागर’, हा शब्द मूळ मंगोल
भाषेतला आहे. तेव्हापासून या ‘दलाई लामा’ संस्थेभोवती विलक्षण गूढरम्यतेचं वलय आहे. आधीचे दलाई लामा
आपलं आधीचं शरीर सोडण्यापूर्वी, पुढच्या जन्माच्या काही खुणा सांगून ठेवतात. त्यानुसार मग
इतर वरिष्ठ लामा नव्या दलाई लामांचा शोध घेतात. नवे दलाई लामा सापडून, प्रशिक्षित होऊन
आध्यात्मिक आणि राजकीय-प्रशासकीय नेतृत्व सांभाळेपर्यंत सर्व कारभार ‘पंचेन लामा’ पाहतात.
तर १३ व्या दलाई
लामांनी १९३३ मधे देह ठेवला. त्यांनी सांगितलेल्या खुणा शोधत - बायबलमधे, आकाशातल्या तार्याच्या
आणि भविष्यवाणीच्या आधारे जीझस्चा शोध घेत बेथलेहॅमला पोचलेल्या ‘पूर्वेकडच्या
पंडितांप्रमाणे’-
तिबेटी
लामा या तक्तेसर गावात पोचले. ‘रॅशनल’ - बुद्धीला पटू नये अशा अनेक गूढ गोष्टी घडत निश्चित झालं की
हे ल्हामो धोंडुप हे खोडकर, बुद्धिमान बालक म्हणजेच ‘१४ वे दलाई लामा’. मग ल्हासाला आणून
त्याचं कठोर प्रशिक्षण सुरू झालं. त्यांचे प्रशिक्षक ‘रिंपोचे’ आणि इतर शिक्षक
सांगतात की अगदी लहानपणी ते बुद्धिमान, चौकस, खोडकर आणि हसरे होते. आताही ते तसेच आहेत.
१३ व्या दलाई
लामांच्या काळातच एकीकडे इंग्रज साम्राज्यवादी आणि दुसरीकडे चिनी साम्राज्यवादी
यांच्याशी तिबेटचा संघर्ष झाला होता. बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे तिबेटनं
सैन्यशक्तीची जोपासना केली नव्हती. त्यामुळे निर्माण होणारा धोका १३ व्या दलाई
लामांना लक्षात आला होता. त्यांनी संरक्षणासाठी शस्त्रसज्ज होण्याचा प्रयत्न केला, पण त्याला इतर ‘लामां’कडून विरोध झाला.
त्याच वेळी तिबेटी
समाजाला विनाशकालाच्या भविष्यवाणीनं घेरलेलं होते. हाईनरिश हेरर नावाचा ऑस्ट्रियन
खेळाडू दुसरं महायुद्ध सुरू होताना भारतात होता. दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा
तो ऑस्ट्रियन-जर्मन भाषिक आहे, म्हणून भारतातल्या ब्रिटिश सरकारनं त्याला कैद करून ठेवलं.
त्यातून निसटून हाईनरिश हेरर तिबेटमध्ये गेला. त्याच्या ‘सेव्हन् इयर्स इन्
तिबेट ’
या
पुस्तकात चीनच्या आक्रमणापूर्वीच्या (१९५१) तिबेटचं दर्शन घडतं. असं दिसून येतं की
इतिहासकाळाप्रमाणेच तिबेटचा सर्व सांस्कृतिक संबंध भारताशी आहे. भाषा, लिपी, धर्म - भारताकडून
स्वीकारल्याचं तिबेट आजही आंनदानं सांगतो. चलनसुद्धा रुपया होतं. (युवान - चिनी
चलन नाही.) हाईनरिश हेररला तिबेटमधे राहण्याचा परवाना - ‘व्हिसा’ हवा होता. तो
ल्हासामधेच मिळत होता (चीनमधे नाही). पुढे हाईनरिश हेररचा या १४ व्या दलाई लामांशी
संपर्क आला. त्यांच्या ग्रंथात आणि त्याच नावाच्या हॉलिवुडपटात (हाईनरिश हेररची
भूमिका ब्रॅड पिट्नं केलीय -त्याला आता चीनमधे प्रवेशबंदी आहे - आणि या
चित्रपटावरही बंदी आहे) हेरर नोंदवतो की तिबेटी समाजाला अनेक भीषण ‘ओरॅकल्स्’- भविष्यवाणींनी
भेडसावून सोडलेलं होतं - पूर्वेकडून (म्हणजे चीनकडून) आक्रमण येणार, हे नवे आक्रमक धर्म न
मानणारे असणार,
त्यांच्यापासून
तिबेटी भाषा,
लिपी, समाज, संस्कृती, धर्म, जीवनपद्धती - सर्वालाच
प्राणांतिक धोका उद्भवणार... अशा भविष्यवाणीमुळे तिबेटी समाज जणू आधीच शरणागत झाला
होता.
भारतानं अर्थात तिबेटी
समाज आणि संस्कृतीला सन्मानानं सांभाळलं. दलाई लामांच्या अहिंसक लढ्याचं विलक्षण
हृदयद्रावक,
तरीही
प्रेरणादायक वर्णन आपल्याला सापडतं त्यांच्या ‘फ्रीडम इन एक्झाईल’ आणि ‘माय लँड माय पीपल’ या ग्रंथांमध्ये.
(दोन्हीचं मराठी भाषांतर झालंय.) दलाई लामांच्या ‘गव्हर्न्मेंट इन
एक्झाईल’ला भारत सरकारनं
अधिकृत मान्यता दिलेली नाही, पण दलाई लामा आणि तिबेटी निर्वासितांसाठी धर्मशाला येथे
सन्मानपूर्वक जमीन दिली. भारतभर ठिकठिकाणी तिबेटी विद्यांचं संरक्षण, संवर्धन करणार्या
संस्थांना बळ पुरवलं. सहिष्णु आणि सर्वसमावेशक भारतीय संस्कृतीच्या पंखाखाली
तिबेटी भाषा,
धर्म, विद्या नुसत्या
सांभाळल्या जात नाहीयेत तर नव्यानं विकसित होताय्त. दलाई लामासुद्धा धर्म-सुधारणा, समाजसुधारणा, आधुनिक शिक्षण, विज्ञाननिष्ठा, स्त्रीचा सन्मान आणि
समता, कर्मकांडांचा निषेध, लोकशाही या मूल्यांचा
विकास करत बौद्ध-दर्शन अधिकाधिक समृद्ध करतात. त्यांनी २०११ मध्ये आपल्या राजकीय
अधिकारांचा त्याग करून लोकनियुक्त पंतप्रधानांकडे आपले अधिकार सोपवले. दलाई लामा
हे पदच हवं की नको, हवं असल्यास १५ वे दलाई लामा कोण हे जनता ठरवेल, असंही त्यांनी सांगून
ठेवलंय. तरीही आपण हा देह ठेवल्यावर पुढच्या जन्माच्या खुणाही सांगून ते म्हणालेत
पुढचे दलाई लामा ही कदाचित एक अंतर्बाह्य सुंदर अशी स्त्री सुद्धा असू शकेल.
आपल्या ‘युनिव्हर्स इन अ सिंगल
ऍटम’ या ग्रंथात त्यांनी
बौद्ध-दर्शनाद्वारे अद्वैताचा विचार आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ असल्याचं मांडलंय.
रोमन साम्राज्याच्या
अत्याचाराखाली चिरडल्या जाणार्या ज्यूंची जगभर छळणूक झाली. पण एक भारतानं मात्र
त्यांना सन्मानानं आश्रय दिला. ७ व्या शतकात पर्शिया (इराण)वर इस्लामी आक्रमणं
झाली. पारशी समाज परागंदा झाला. त्याला भारतानं आश्रय दिला. भारताकडे आश्रय
मागणार्या पारशी समाजाच्या नेत्यानं ७ व्या शतकातल्या संजाणा बंदरावर प्रभुत्व
असलेल्या गुजरातच्या राजाला वचन दिलं होतं की दुधात साखर विरघळून जाते आणि दूध गोड
करते तसे आम्ही भारतीय समाजात एकरूप होऊ आणि त्याची गोडी वाढवू. पारशी समाजानं हा
शब्द आजपर्यंत खरा केला आहे. मला प्रश्न पडतो की आपल्या भूमीतून उध्वस्त झालेल्या
पारशी समाजाला सन्मानानं आश्रय देताना गुजरातच्या आणि भारतातल्या इतरही राजांना
समजत होतं का की उद्या हे संकट आपल्यावरही कोसळणार आहे. तसं आजच्या भारताला समजेल
का की तिबेटला तिबेटमधून उखडून काढणार्या संकटांचे लोंढे उद्या भारतावरही कोसळू
शकतात. मला वाटतं की पारशी समाजाप्रमाणे भविष्यकाळात तिबेटी समाज सुद्धा एकाहून एक
उत्तम उद्योगपती,
खेळाडू, शास्त्रज्ञ, लेखक पुरवेल. (मूळ
भारतीय समाज कधी सर्वांगीण प्रतिभावंत बनेल?)
१९५९ मध्ये ल्हासा (तिबेट)
सोडलेल्या दलाई लामांनी एके ठिकाणी म्हणून ठेवलंय की मी सन्मानानं ल्हासाला परततोय
हे दृश्य मी माझ्या डोळ्यासमोर पाहतोय. ते दृश्य सत्यात केव्हा येईल असं विचारलं
तर ते सांगतात की चीनमध्ये सुद्धा मोठे बदल घडतील, आत्ता सुद्धा ५०%
पेक्षा जास्त चिनी लोक, अधिकृत जनगणनेमध्ये आपली ‘बौद्ध’ अशी नोंदणी करतात.
त्यांना सुद्धा दलाई लामांबद्दल नितांत आदर वाटतो. याचाच साम्यवादी चीनला धोका
वाटतो. चिनी लोकही अत्यंत चांगले आहेत, त्यांना लोकशाही, मानवाधिकार हवे आहेत, असं दलाई लामाही
सांगतात. पण त्यांचं सन्मानानं ल्हासाला परत जाणं मुख्यतः भारतावर अवलंबून आहे.
लोकशाही भारत समर्थ, समृद्ध झाला - तो होताना आपलं चरित्र आणि संस्कृती विसरला
नाही - चीनसमोर तुल्यबळ, समर्थपणे उभा राहिला - तर दलाई लामांना घडलेलं दर्शन सत्यात
उतरेल,
उतरेल?
मला इथे नम्रपणे सांगावस वाटत की दलाई लामा हे अध्यात्मिक श्रेष्ठ आहेतच.परंतु, बौद्ध धर्माचा लढा हा काही पूर्णपणे अहिंसक नाही त्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे http://www.readwhere.com/read/c/1746668 या लिंकवर अधिक माहिती सापडेल तसेच पुस्तकाचे लेखक http://web.ysu.edu/contentm/easy_pages/view.php?page_id=191&sid=29&menu_id=1235 ह्या लिंकवर.केवळ वैयक्तिक पातळीवरचा आध्यत्मिक अनुभव म्हणून लेख ठीक.पण बुद्ध धर्माच्या इतिहासाची चिकित्सा करायची तर भावनिकतेपेक्षा वस्तूनिष्ठता हवी.आणि हेही लक्षात घ्याव की जडवादी साम्यवादी तत्त्वज्ञानासमोर तिबेट निष्प्रभ का ठरल ?
ReplyDelete