लेखांक ९४ |
... आणि आपण सगळेच
सामान्य नागरिकाच्या
दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य
बट् मनमोहन सिंग इज अॅन ऑनरेबल मॅन!
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली! कार्यबाहुल्या
(शब्दाचा उच्चार कृपया नीट ठसठशीत करावा, नाहीतर गैरसमज होतील!)
मुळे त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे नीटसं आठवतच नाही की
ही त्यांची पंतप्रधान म्हणून पहिली पत्रकार परिषद की शेवटची? की पहिली तीच शेवटची? पण या भूतलाचे ठायी हे
महदाश्चर्य घडिले. पंतप्रधान बोलते झाले.
मोदी पंतप्रधान झाल्यास देशाला फार मोठा धोका
आहे (राहुल गांधी पंतप्रधानपदाला सर्वांत योग्य व्यक्ती आहे.) बरोबरच आहे. ते
वाट्टेल ते कसं बोलतील? कारण मनमोहन सिंग इज अॅन ऑनरेबल मॅन!
आता पंतप्रधान पूर्वनियोजित पत्रकार परिषद
घेताय्त म्हटल्यावर सारं कसं पूर्वनियोजित असणारच की. उपस्थित पत्रकारांना
सिक्युरिटी क्लियरन्स असणार. त्यांनी काय प्रश्न विचारायचे (आणि काय नाही
विचारायचे) हेही पूर्वनियोजित असणार. भारताचं पंतप्रधानपद सांभाळणं काही खेळ नाही
महाराजा! पंतप्रधानांना वेळ नसतो पत्रकार परिषद घ्यायला. ओबामाचं काय, सोपं काम आहे, त्याच्या पाठी संपूर्ण
अमेरिकेची सत्ता आहे. मग तो आठवड्यातून ३ पत्रकार परिषदा घेईल नाहीतर काय! साधी काय ती
बोस्टन मॅरेथॉन. त्यात काय तर फक्त दोन जण मेले, तर हा राष्ट्राध्यक्ष
स्वत: पत्रकार परिषद घेतो. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देतो. दहशतवादाला जशास
तसं उत्तर देऊ म्हणतो. काय हा बालिशपणा आणि संयमाचा अभाव! पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षानं कसं
शत्रूशी संयमानं वागलं पाहिजे. जशास तसं वगैरे भाषा आपल्या देशांतर्गत राजकीय
विरोधकांबद्दल वापरायची असते.
ओबामानं मनमोहन सिंग यांच्याकडून शिकलं पाहिजे. पण अजून ओबामा लहान आहे, शिकेल हळूहळू. ओबामाचा
जन्म झाला त्या सुमाराला मनमोहन सिंग त्यांचा एम्.फिल्./पी.एच्.डी.
चा प्रबंध लिहीत होते, समाजवादी आर्थिक धोरणांमुळे सरकारीकरण, केंद्रीकरण, नोकरशाहीकरण होईल, उद्यमशीलता मारली जाईल
असं मांडत होते. तेव्हा तर राहुल गांधींचा जन्मही झाला नव्हता. पुढे सरकारच्या
आर्थिक प्रशासनात दाखल होऊन ते स्वकर्तृत्वावर चढत चढत देशाच्या सर्वोच्च अशा
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदापर्यंत पोचले. राजीव गांधींची भीषण हत्या आणि
देशासमोर फसलेल्या समाजवादी आर्थिक धोरणांमुळे उभं राहिलेलं दिवाळखोरीचं संकट अशा
वेळी कॉंग्रेसला, पंतप्रधान नरसिंह राव यांना मनमोहन सिंग यांची आठवण झाली. त्यावेळी ओबामा साधा सिनेटर सुद्धा
नव्हता. त्या ओबामानं मनमोहन सिंग यांची शिकवणी लावणं
आवश्यक आहे.
आता पंतप्रधानांची पत्रकार परिषद म्हटल्यावर
आपल्याला वाटेल जागतिक परिस्थिती, तापमान वाढ, पर्यावरण, अमेरिकेची
अफगाणिस्तानातून माघार, पाकिस्तान, चीन, दहशतवाद, नक्सलवाद, आर्थिक विकासाचा
खुंटलेला दर, स्त्रियांवरचे अत्याचार, प्रचंड भ्रष्टाचार, अन्न-पाणी सुरक्षा...
असल्या काहीतरी मुद्द्यांविषयी ते बोलतील. पण आपल्या पंतप्रधानांनी अशा दुय्यम
मुद्द्यांना थेट फाटा देत, देशासमोरच्या सर्वांत महत्त्वाच्या, सर्वांत गंभीर
आव्हानाला हात घातला,
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास देश बरबाद
होईल.
आणि ते काही गैर कसं बोलतील?
कारण मनमोहन सिंग इज अॅन ऑनरेबल मॅन.
अशा वेळी शेक्सपियर आपला केवढा मोठा आधार
असतो.
रोमकरता प्रचंड मोठे विजय संपादन करून
दिग्विजयी ज्युलियस सीझर (आजकाल ‘दिग्विजय’ शब्द वापरायची मला
भीती वाटायला लागली आहे) रोमकडे परतत होता. तो इतका लोकप्रिय झाला होता की
रोममधल्या प्रस्थापित (आणि भ्रष्ट) राज्यकर्त्यांना त्याची भीती वाटत होती. तो
हुकुमशहाच बनेल याची त्यांना खात्री होती. म्हणून सीझरचा मानसपुत्र मानला जाणार्या
ब्रुटसनं सीझर सिनेटमध्ये प्रवेश करताना ‘आईड्स् ऑफ् मार्च’च्या मुहूर्तावर
सीझरचा मर्डर केला. कटवाल्यांनी सीझरचा जिवलग मित्र मार्क अँटनी खुनाच्या वेळी
सिनेटपासून लांब असेल अशी व्यवस्था केली होती. सीझरचा खून झाल्यावर रोमन नागरिक
प्रचंड खवळले. सिनेटसमोर जमून ब्रुटस अँड कं.च्या निषेधाच्या घोषणा करायला लागले.
कटवाल्यांना कळलं की लोक आपल्याला इथंच खतम करतील. तोपर्यंत मार्क अँटनीही पोचला.
तो उत्तम वक्ता होता, तो खवळलेल्या जनसमुदायाला शांत करू शकेल, लोकही त्याचं ऐकतील
कारण तो सीझरचा मित्र. कटवाल्यांसाठी तीच तर समस्या होती, कारण तो सीझरचा मित्र
होता आणि उत्तम वक्ता होता. म्हणून कटवाल्यांनी मार्क अँटनीला अट घातली की
कटवाल्यांविरुद्ध काहीही बोलायचं नाही, फक्त सीझरला
श्रद्धांजली वाहायची. अट मान्य करून, मार्क अॅटनी रोमन
नागरिकांना सामोरा आला,
मार्क अँटनीचं भाषण शेक्सपियरनं आपल्या
शाश्वत कालातीत लेखणीनं अजरामर करून ठेवलंय.
ते ज्युलियस सीझर नाटकात, चित्रपटात, आता दिवंगत झालेला -
पण सार्वकालिक श्रेष्ठ अभिनेता - लॉरेन्स ऑलिव्हिए - नं तितक्याच शाश्वत कालातीत
अभिनयानं सादर केलंय.
‘फ्रेन्डस् रोमन्स, कंट्रीमेन’ मार्क अँटनी
म्हणाला...
समोरच्या खवळलेल्या समुदायातल्या अनेकांची
खात्री होती की ज्युलियस सीझर एक अती महत्त्वाकांक्षी अत्याचारी हुकुमशहा होता.
ब्रुटसनं त्याला मारलं म्हणजे रोमप्रती आपलं कर्तव्यच बजावलं, याची त्यांना खात्री
होती,
त्यांनी
सुद्धा मार्क अँटनीला दम दिला की ब्रुटस विरुद्ध एक शब्द उच्चारायचा नाही,
मार्क अँटनी म्हणाला, मी इथे सीझरला गाडायला
आलोय,
त्याची
स्तुती करायला नाही. तो माझा मित्र होता. दिलदार होता. पण म्हणून काय झालं, ब्रुटस म्हणतो, सीझर अती
महत्त्वाकांक्षी होता, तर ते खरंच असलं पाहिजे, कारण
ब्रुटस इज अॅन ऑनरेबल मॅन.
सीझरला अनेक राज्यं-साम्राज्यांचे मुकुट
आपणहून देण्यात आले होते, पण त्यानं ते नाकारले. तो रोमच्या जनतेसाठी
रडायचा. अती महत्त्वाकांक्षी माणूस जास्त मुर्दाड असावा लागतो, पण ब्रुटस म्हणतो तो
अती महत्त्वाकांक्षी होता,
अँड ब्रुटस इज अॅन ऑनरेबल मॅन.
मार्क अँटनी खिशातून एक मसुदा काढत म्हणाला
हा रोमन जनतेला अधिकार बहाल करून खरं प्रजातंत्र स्थापण्याचा सीझरचा मसुदा आहे, त्याची सीझरनं
माझ्याशी चर्चा केली होती, तो सिनेटमध्ये आज सादर करणार होता, ब्रुटस म्हणतो तो अती
महत्त्वाकांक्षी होता,
अँड ब्रुटस इज अॅन ऑनरेबल मॅन.
मनमोहन सिंग इज अॅन ऑनरेबल मॅन. ते म्हणतात तर खरंच नरेंद्र मोदी
पंतप्रधान झाल्यास देशाला मोठा धोका असला पाहिजे.
मनमोहन सिंग म्हणाले २६/११ च्या मुंबईवरच्या
दहशतवादी हल्ल्यानंतर जनतेनं आम्हाला पुन्हा निवडून दिलं म्हणजे आमच्या कारभारावर
मान्यतेची मोहोर उमटवलीय. तसं नरेंद्र मोदींना गुजरातच्या जनतेनं तीनदा निवडून
दिलं,
पण तो
जातीयतावाद्यांचा विजय असला पाहिजे, जातीयतावादापासून देशाला धोका आहे, देशासमोर सर्वांत मोठा
धोका नरेंद्र मोदी आहे,
कारण मनमोहन सिंग इज अॅन ऑनरेबल मॅन.
फेब्रुवारी-मार्च २००२ मध्ये गोध्रा-कांडनंतर
गुजरातमध्ये जे घडलं ते नितांत दु:खद आणि अन्यायकारकच होतं. त्यानंतर बारा वर्षं
झालेल्या सर्व तपास-चौकशा-निकालांनी नरेंद्र मोदींचं निर्दोषत्व सिद्ध केलंय.
सुप्रिम कोर्टानं नेमलेल्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) नं त्यांना ‘क्लीन चिट्’ दिली. तिस्ता
सेटलवाडनं ताणून धरलेल्या बेस्ट बेकरी केसच्या प्रत्यक्ष साक्षीदार समजल्या
गेलेल्या झाहिरा शेखविरुद्ध न्यायालयानं ‘पर्जरी’ - म्हणजे न्यायालयासमोर
शपथपूर्वक खोटं बोलण्याबद्दल शिक्षा सुनावली. भाजप च्या महिला आमदाराला जन्मठेपेची
शिक्षाही झाली, पण नरेंद्र मोदींना व्यक्ती किंवा मुख्यमंत्री म्हणून दोषी ठरवता येईल असं काहीही सापडत
नाही. इशरत जहॉं आणि सोहराबुद्दिन एन्काउंटर प्रकरणात नरेंद्र मोदींना
लटकवण्यासाठी केंद्र सरकारनं CBI ला IB च्या मागे लावून
दिलं. देशाची एक गुप्तहेर संघटना दुसर्या गुप्तहेर संघटनेवर केस करतेय असं अद्भुत
चित्र दिसून आलं. सुपर-कॉप केपीएस् गिल् म्हणाले की नरेंद्र मोदींनी दंगली
थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी बळ अपुरं पडतंय असं दिसल्यावर
आसपासच्या राज्यांची मदत मागितली. पण एकाही राज्यानं मदत पुरवली नाही आणि आता, अहमदाबादच्या दंगलीत
मारल्या गेलेल्या कॉंग्रेस खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाकिया जाफरी यांचे
विविध अर्ज न्यायालयाच्या विविध पातळ्यांना फेटाळले गेले, पण मनमोहन सिंग म्हणतात, नरेंद्र मोदी
पंतप्रधान झाले तर देशाला धोका आहे, खरंच आहे, कारण
मनमोहन सिंग इज अॅन ऑनरेबल मॅन.
नरेंद्र मोदींनी गुजरातचा विकास घडवला.
राज्यातल्या निवडणुका सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर जिंकल्या. त्या जिंकताना आणि विकासाच्या
योजना राबवताना मुस्लिम समाजासहित सर्व घटकांना सामावून घेतलं. गुजरातमधला मुस्लिम
समाज सुद्धा नरेंद्र मोदींबाबत समाधानी आहे (पण ते जातीयतावादी दहशतवादामुळे असलं
पाहिजे). शरद पवार, राज ठाकरे, अमरिंसह यादव आणि विजय दर्डा इ... सर्वपक्षीय
नेत्यांनी सुद्धा गुजरातचा विकास आणि नरेंद्र मोदींच्या सर्वांना बरोबर घेऊन
जाणार्या नेतृत्वाबाबत अनुकूल मतप्रदर्शन केलं. बंगालमधल्या ‘डाव्या’ विकासविरोधी अतिरेकाला
वैतागलेल्या टाटांच्या नॅनोसाठी नरेंद्र मोदींनी पायघड्या अंथरल्या. त्या
विकासाभिमुख दृष्टिकोनाला रतन टाटांनी प्रशस्तीपत्रक दिलं. आता मांडलेला
कार्यक्रमही विकासाला, रोजगाराला चालना देणारा आहे. पण मनमोहन सिंग म्हणतात, नरेंद्र मोदी
पंतप्रधान झाले तर देशासमोर धोका आहे, खरंय, कारण
मनमोहन सिंग इज अॅन ऑनरेबल मॅन.
त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत
आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम अडखळून पडलाय आणि विकासाचा वेग समाजवादी आर्थिक
धोरणांच्या कालखंडाप्रमाणे लाजिरवाण्या ४% वर आलाय. आपल्याला
सांगितलं जातं की २००८ च्या अमेरिकेतल्या ‘सबप्राईम क्रायसिस्’ आणि युरोपमधल्या ‘सॉव्हरिन डेट
क्रायसिस्’ मुळे सर्वच उभरत्या अर्थव्यवस्थांचा (EMEs : Emergency Market Economies) विकासदर खाली आलाय.
खरंय. पण त्यात भारताचा जास्तच खाली आलाय. दहा वर्षांतल्या कारकीर्दीतली नाव
घेण्याजोगी २ ठळक पावलं - अमेरिकेशी नागरी सहकार्याचा आण्विक
करार आणि ‘मल्टी ब्रॅण्ड रीटेल’ क्षेत्र थेट विदेशी
गुंतवणुकीसाठी खुलं करणं - दोन्ही पावलं अडखळून, अडकून पडलीत. आणि आता
अरिंवद केजरीवालांनी दिल्लीत ‘मल्टी ब्रॅण्ड रीटेल’ क्षेत्रातली थेट
विदेशी गुंतवणूक बंदच केली.
पण देशासमोरचा धोका नरेंद्र मोदी आहे.
दौलतबेग ओल्डीमध्ये चीनची घुसखोरी हा ‘लोकल इश्यू’ आहे! पाकिस्तानशी
मैत्री वार्ता कोणत्याही परिस्थितीत थांबता कामा नयेत, २-५ जवानांची मुंडकी कापली
म्हणून काय झालं! भ्रष्टाचार आणि सरकारी अकार्यक्षमतेचा टाटांना एवढा त्रास होत
असला तर त्यांनी विदेशात गुंतवणूक करावी. नक्सलवाद नाही, दहशतवाद नाही, भारताला सर्व बाजूंनी
घेरणारा चीन नाही, त्या चीनचा ‘ऑल वेदर’ मित्र पाकिस्तान नाही, भारतासमोरचा सर्वांत
मोठा धोका आहे नरेंद्र मोदी.
व्हॉट् अॅन ऑनरेबल मॅन मनमोहन सिंग इज!
भारतातील बहुसंख्या मतदारांना आपल्याला मत देण्याचा अधिकार का आणि कोणी दिला हेच माहित नाहि. अस वाटत कि लोकांना जाणून बुजून गरीब, लाचार , अशिक्षि भायांकित ठेवल जातंय . जातीय वाद , प्रांतीय वाद , धार्मिक वाद मुद्दाम पोसला जातोय , ज्यामुळे प्रस्थापित राजकारण्याना पिढ्यान पिढ्या राज्य करता येईल .
ReplyDeleteशालुतून जोडे…कॉंग्रेस पक्षच समाजात विष पसरवीत आहे….सुंदर लेख
ReplyDeleteअप्रतिम विश्लेषण सर......
ReplyDelete