या कोणत्या देशात राहतो आपण सगळेच या प्रश्नानं मांडलेला छ्ळ काही संपता संपत नाही. या शब्दांच्या चाबकाचे वळ उमटत राहतात, मागील पानावरून पुढे.
दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये तिच्या सोबतच्या मित्राला मारहाण करून, २३ वर्षाच्या युवतीवर ड्रायव्हर, कंडक्टरसकट सहा (की पाच? एकजण म्हणतो मी बलात्कारात सहभागी नव्हतो, मी फक्त तिच्या मित्राला मारलं) जणांनी बलात्कार केला.
दिल्ली! देशाची राजधानी! उगवत्या, समर्थ, समृद्ध भारताची दमदार, भारदस्त, राजधानी! हे शहर अलिकडच्या काळात स्त्रियांसाठी सुरक्षित कधीच नव्हतं. शेवटी भारताची राजधानी आहे ती. देशाचं प्रतिनिधित्व नको का करायला? चालू आठवडयातच कुठल्यातरी आंतरराष्ट्रीय संस्थेनं जगभराच्या देशांची क्रमवारी लावली, स्त्रियांसाठी तो देश किती सुरक्षित आहे, या निकषावर. भारताचा नंबर खूप खालचा लागला. भारत, स्त्रियांसाठी असुरक्षित देश. भारत, जिथे स्त्री म्हणून जन्माला येणं म्हणजे दुःख-वेदना-अपमान-छ्ळ-हुंडा-बलात्कार-कुपोषण-शोषण....या सर्वांना निमंत्रण. याला आंतरराष्ट्रीय संस्थेचा सर्व्हे कशाला हवा?
दिल्लीमध्ये सूर्यास्तानंतर बसस्टॉपवर एकटीदुकटी मुलगी उभी दिसली, तर तिच्या अब्रूची शाश्वती देता येत नाही. किंवा तिलाच विचारायला ’गिर्हाईक’ येतात ’आती क्या, मेरे साथ’ (कुठे मुडद्या? खंडाला?) सुर्यास्तानंतर बसस्टॉपवर एकटीदुकटी उभी आहे म्हणजे ती वेश्याच आहे, असं अनेक पुरुष गृहीतच धरतात. दिल्लीच काय, मुंबईसकट भारतातल्या अनेक शहरांमध्ये हीच स्थिती आहे. अनेक पुरुषांच्या मनात ’स्त्री ही क्षणकालची माता असून अनंत काळची वेश्या आहे’ (क्षमा असावी अचार्य अत्रे) अशीच उपभोग्य वस्तूवादी भावना असते. जे स्त्रीला माणूस मानत नाहीत, त्यांच्या खुरटलेल्या मेंदूंमध्ये वेश्यासुद्धा माणूस आहे. हा विचार येणार कुठून?
बलात्कार केवळ त्या दिल्लीतल्या युवतीवर नाही. रस्त्यांवरून सहज जाणार्या कोणत्याही मुलीबद्द्ल घाण, अचकट विचकट बोलण्यात फार ’पुरुषार्थ’ दाखवला, अंगचटीला जाता आलं, पार्श्वभागाला चिमटे काढता आले तर मोठाच पराक्रम, असं वागणारे-बलात्कारच करत असतात-नजरेनं, हावभावानं, शब्दांनी. मला प्रश्न पडतो की यांना कोणी कधी शिकवलं सांगितलं नाही का स्त्रीशी कसं वागायचं ते (शिवाजी महाराजांचा वारसा कळायला हवा, सांभाळायला हवा). संस्कार म्हणजे काय? रस्त्यावरनं जाणार्या कुणाही स्त्रीला ’सार्वजनिक मालमत्ता’ (कारण आपण सार्वजनिक मालमत्ता ही नासधूस करण्याचीच गोष्ट समजतो ना, आपल्या बापाचं काय जातं) समजून घाणघाण बोलणार्या वागणार्या पुरुषांना आई नसते का, बहीण नसते का, सहकारी-मैत्रीण-प्रेयसी-पत्नी. काही म्हणजे काही नसते का? अशा हरामींना नसावीच मैत्रीण-प्रेयसी-पत्नी. असली तर स्त्रीत्वाचा अपमान समजेल. मग तो चालणार नाही. आपण जिच्याविषयी खुशाल जीभ उचलून घाणघाण टाळ्याला लावतो आहोत, ती सुद्धा कुणाची तरी आई-बहीण-मैत्रीण-प्रेयसी-पत्नी-सहकारी आहे हेसुद्धा त्यांच्या डोक्यात येत नाही का? तर ती माणूस आहे, समान आहे, तिच्या जगण्याला सन्मान आहे, हे त्यांच्या शुक्रजंतूंनी वखवखलेल्या मेंदूत कुठून येणार? घाण अचकट विचकट बोलताना ती फक्त मादी- ’उपभोग्य वस्तू’-आणि हे नराधम. या वागण्याला जनावर म्हणणं हा जनावरांचा अपमान आहे कारण जनावरंसुद्धा इतक्या निष्कारण क्रूरपणानं वागत नाहीत.
मला प्रश्न पडतो की गल्लीतल्या गावगुंडांपासून दिल्लीतल्या नरराक्षसांपर्यंत कधी कोणालाच कायद्याचा धाक वाटत नाही का? आता फार रुबाब करायला जाशील बेटा, नंतर सगळं आयुष्य तिहार जेलमध्ये काढावं लागेल, असं वाटतच नाही त्यांना? की आपलं कोणी काही वाकडं करूच शकत नाही, आपले हात वरपर्यंत पोचलेत, कायदा पण काय कोणाचं xx वाकडं करत नाही, कुठल्याही गुन्हयातून सुटता येतं असं वाटतं त्यांना? का पिसाळलेल्या लैंगिकतेला याचं कशाचंच भान नसतं? एकदा लिंगपिसाट राक्षसीपणा सैराट सुटला की कसला आलाय विवेक आणि विचार. कायद्याचा धाक उरलाच नाहीये. तो आपल्याला, सर्वसामान्य नागरिकांना आहे. कायद्याला आम्ही ’ह्याच्या’वर मारतो म्हणणार्यांना काही धाक वाटतच नाही. बलात्कारासारख्या केसेसही वर्षानुवर्षे चालतात. बहुसंख्य आरोपी सुटतात-जामिनावर किंवा निर्दोष. बेअब्रू स्त्रीचीच होते. तिचं आयुष्य मातीला मिळतं ते मिळतंच.
तुमच्या माझ्या देशात घरांघरांमध्ये सर्वांना मुलगा जन्माला आलेला हवाय. मुलगी शक्यतो ’पाडून’ टाकता येते का बघा. चिवटपणे आलीच जन्माला एवढं करूनही तर साधनसंपत्तीवर पहिला हक्क कुलदीपकाचा. मुलगी कुपोषणाची शिकार. ज्या देशाची समकालीन बुद्धी एवढी फिरलीय की स्त्रीच अशिक्षित, कुपोषित, पीडित, अत्याचारग्रस्त असेल तर सर्व समाज, सर्व पिढ्या आजारी, रोगट, दुबळ्या जन्मतील, जगतील हेसुद्धा समजत नाही, अशा या कोणत्या देशात राहतो आपण सगळेच.
मुलींना, स्त्रियांना सुरक्षित वाटत नाही, सतत असुरक्षित वाटत असतं. आपल्या मुलींवर जिवापाड प्रेम करणारेही असंख्य आई बाप आहेत, ते सतत टेन्शनमध्ये असतात. विशेषतः मुलगी वयात आली की ती रोज घरी सुरक्षित परतेपर्यंत आई-वडिलांचा जीव टांगणीला लागलेला असतो. परवापर्यंत एकवेळ मला लक्षात आहे की स्त्रीच्या गळ्यात मंगळ्सूत्र दिसलं तर भलेभले गुंडसुद्धा तिच्या वाट्याला जात नसत. आता तसंही उरलं नाही विकृत पुरुषार्थापुढे.
इंदिराजींचा देश, शीला दीक्षितांची दिल्ली, मायावती, ममता बॅनर्जी, जयललिता, सुषमा स्वराज यांचा देश. पण अमेरिकेत ओबामा राष्ट्राध्यक्ष झाला म्हणजे काही ’ब्लॅक्स’ ची स्थिती आता सुधारली असं होत नसतं, तसंच आहे इथे.
महिला आरक्षण, सबलीकरण, कायदा, वारसाहक्क.... वगैरे सगळ्या (आवश्यकच, पण) लांबच्या गोष्टी आहेत. साधी रस्त्यावर वाहन चालवताना एखादी मुलगी ओव्हरटेक् करून गेली तर अनेक ’पुरुषी’ वाहनांना खपत नाही, आपला वेग वाढवून परत तिला मागे टाकल्यावरच त्यांना आपण खरे ’पुरुष’ असल्याची खात्री पटते.
एकीकडे ती जगदंबा आहे, विश्वजननी, काली, दुर्गा, महालक्ष्मी आहे. पृथ्वीसुद्धा धरतीमाता आहे, आपला देश भारतमाता आहे. प्रत्येक नदी गंगामाता असते. आधी ’मातृदेवो भव’ म्हणून मग कामाला लागायचं असतं, घरात येणारी सून ’गृहलक्ष्मी’ असते आणि जीवनातला कोणताच संस्कार, कोणताच निर्णय स्त्रीच्या उपस्थिती-अनुमतीशिवाय करता येत नसतो.
पण प्रत्यक्षात तिच्याविषयी अचकट विचकट बोलायचं असतं, चिमटे काढायचे असतात, हुंडा वसूल करायचा असतो, नाहीतर तिचा जीव घ्यायचा असतो. जमलं तर विवाहबाह्य, विवाहपूर्व-उत्तर, विवाह-अंतर्गत बलात्कार करायचे असतात.
या निर्बुद्ध संवेदनाशून्य, अहंकारी, करंट्या जाणीवांना कळतच नाही की स्त्री समानपणे, सन्मानपूर्वक सोबत असण्यात जीवनातला खरा आनंदसुद्धा आहे - ओरबाडण्यात, ओरखडण्यात नाही. माणसातलं जे नातं परस्पर सन्मान-आदर-प्रेम-मैत्री-जिव्हाळा-विश्वास यावर उभं असतं ते जीवन आनंदी आहे (कुठल्या डिक्शनरीत सापडतात हे शब्द?)
देवा ख्रिसमसच्या आठवडयात तरी त्यांना सद्बुद्धी दे (क्षमा कर म्हणवत नाही माझ्याच्यानं - ते म्हणायचं तर ईश्वराच्या पुत्राला म्हणू दे) कारण ते काय करतायत, त्यामुळे ते जीवनात काय गमावतायत, कळतच नाहीये त्यांना.
It all begins when MAN and WOMAN are taught as antonyms.
ReplyDeleteYa sarvanchya mulashi ahe striyancha ghatat pramaan ani khotya purusharthaane bharavaleli, paishyacha maaj aleli, satta dokyat geleli maanas.
ReplyDeleteसर हे सर्व नक्कीच खूप चीड आणणारे आहे.
ReplyDeleteसरकारने कितीही कडक कायदा केला तरी जोपर्यंत न्यायव्यवस्थेतील वेळखाऊपणा दूर केला जात नाही तोपर्यंत समाजाचा न्यायव्यवस्थेवरील कमी होत चाललेला विश्वास दृढ होणार नाही. बलात्काराच्या केसेस जर लवकरात लवकर निकाली लावल्या तर(च!) अशा अत्याचारांच्या घटनांवर स्वत: स्त्रियाच पडदा टाकणार नाहीत व मोठ्या प्रमाणावर पुढे येऊन गुन्हेगारांना कडक शासन मिळवून देतील.
हा फक्त एक लेख नव्हता तर तुमच्या उत्स्फूर्त भावना होत्या हे तुमच्या प्रत्येक वाक्यातून आणि प्रत्येक ओळीतून दिसत होते.
are manasa manasa kadhi hoshil manus...tuzyahun bar gothyatal janawar..-BAHINABAI.
ReplyDeletehrudaybhedak ! jeev kasavis karnare 1 agadi Bahinabainchya oli kharya karnare !
ReplyDelete