Tuesday, June 17, 2014

दिलदार नेतृत्व

...आणि आपण सगळेच

लेखांक ११६

दिलदार नेतृत्व

            सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य

      गोपीनाथ मुंडे गेले.
      आली ती बातमीच पहिली, आणि शेवटची. अपघात झाला, जखमी, रुग्णालयात दाखल, कडवी झुंज... वगैरे काही नाही. अपघात आणि मृत्यू. संपलंच सगळं. पूर्णविराम. पॉईंट ऑफ नो रीटर्न. केंद्रातल्या कॅबिनेट दर्जाच्या - त्यांची समकक्षता राज्याच्या मुख्यमंत्र्याशी असते - मंत्रीमहोदयांच्या गाडीवर दुसरी गाडी येऊन आदळली, ती पण ज्या बाजूला ते बसले होते, तिकडेच. अगम्य आणि अ नाकलनीय आहे. पाणी मागून, सहकार्‍याला, मला हॉस्पिटलमध्ये ने, एवढं सांगायला वेळ मिळाला. हॉस्पिटल मध्ये पोचेपर्यंत संपलं सगळं. एका आश्‍वासक नेतृत्वाचा, उमद्या व्यिक्तमत्त्वाचा, आणि निर्मितीक्षम कर्तृत्वाचा इतका सेन्सलेस्मृत्यू - ही नुसती भाजप किंवा महाराष्ट्राची नव्हे - नव्या उभरत्या भारताची शोकात्मिका आहे.

      संघ परिवारातल्या जुन्या, जाणत्या, दूरदर्शी व्यक्तित्वांमधले एक - म्हणजे वसंतराव भागवत. नरेंद्र मोदींना घडवणार्‍या लक्ष्मणराव इनामदार - वकीलसाहेब’ - यांच्याप्रमाणेच वसंतराव भागवत. संघ परिवारातल्या अनेक पिढ्या असू अम्ही सुखाने पत्थर पायातीलअसं गीत गात खरंच जगले, उपेक्षा, अपमान, गैरप्रचार सगळं सोसत स्वत:चं व्यक्तित्व, अस्तित्व पुसून टाकत खरंच पायामधेच विलीन झाले. त्यांच्या त्या अनाम तपश्‍चर्येनंतर  आज भाजप स्वबळावर केंद्रातल्या सत्तेपर्यंत पोचला आहे. संसदीय मंडळानं नेतृत्वासाठी निवड केल्यावर - आता पंतप्रधानपदी येण्याचं निश्‍चित झालेल्या नरेंद्र मोदींनी - आधीच्या पिढ्यांच्या या पायाभरणीची आपल्याला जाण असल्याचं मनोगत व्यक्त केलं.
      अशा या पायाभरणी करणार्‍या पिढीतले दूरदर्शी - वसंतराव भागवत - त्यांनी कर्तबगार
तरुण हेरून, त्यांना राजकारणात पेरलं - १९७५ च्या आणीबाणीच्या सुमारास, त्या कालखंडात. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर... (धरमचंद चोरडिया कोणाला आठवतात का? आणीबाणीतल्या या पराक्रमी सत्याग्रह्याचं जीवन नाही, पण राजकीय करियर अपघातानंच संपवलं.) हे सगळे त्या पिढीतले. संघ- भाजप वर तेव्हा सातत्यानं ब्राह्मणीपणाचे आरोप होत होते. अशा वेळी गोपीनाथ मुंडेंच्या रूपानं बहुजन समाजातलं, सर्वसामान्य व्यक्तीची सुख-दु:खं जाणणारं, तळागाळातल्या लोकांशी एकरूप होणारं नेतृत्वं पुढे आलं. महाराष्ट्रामध्ये खर्‍या अर्थानं मास-बेसअसलेला भाजप चा नेता, म्हणजे गोपीनाथ मुंडे. त्यांनी १९९५ पूर्वी आंदोलनं, विरोधी पक्षनेता म्हणून कर्तृत्व तर सिद्ध केलंच. पण १९९५ मध्ये सेना-भाजप सरकार बनल्यावर उपमुख्यमंत्री आणि गृह आणि ऊर्जा खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून - सरकार चालवण्याची प्रशासकीय क्षमताही त्यांनी सिद्ध करून दाखवली न)... प्रश्‍न, उपप्रश्‍न, पॉईंट ऑफ ऑर्डर, लक्ष्यवेधी इ... इ... संसदीय आयुधांचा वापर करण्यात ते तज्ज्ञ होतेच. पण रस्त्यावर उतरण्याच्या आंदोलनकारी कार्यपद्धतीतही तज्ज्ञ होते. नंतर सरकार चालवताना, ती धोरणं आखून अंमलात आणताना, फायली हाताळताना, निर्णय देताना - आंदोलन किंवा पक्षीय राजकारणापेक्षा फार वेगळ्या गुणांची गरज असते - तेही गुण असल्याचं त्यांनी सिद्ध केलं. गुंतागुतीच्या विषयांचा गाभा त्यांना पटकन् लक्षात यायचा. भाजप-सेनेचं सरकार आलं तेव्हा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी बेमुदत उपोषणाला बसले होते - औरंगाबादमध्ये. उसावरची झोनबंदीउठवण्याची त्यांची मागणी होती. उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडेंनी स्वत: औरंगाबादमध्ये शरद जोशींची भेट घेऊन - एका चर्चेत प्रश्‍न सोडवला. शेतीच्या प्रश्‍नाची त्यांना जाण होतीच, ‘झोनबंदीउठवण्याचा - ऊस आणि साखर क्षेत्राबाबतचा - मूलगामी निर्णय त्यांनी घेतला, याचा मी सहभागी साक्षीदार होतो.
      प्रमोद महाजनांशी त्यांचं ओळख आणि वैचारिक नातं आधीच होतं. त्याचं प्रत्यक्ष घनिष्ठ नात्यात रूपांतर झाल्यावर महाराष्ट्र आणि भारताच्या राजकारणात मुंडे-महाजन असा वेगळा करता येणार नाही असा समास जुळला. महाजनांच्या केंद्रातल्या राजकारणाला मुंडेंच्या महाराष्ट्रातल्या जनाधाराचा पाया होता. या दोघांनी महाराष्ट्र भाजप वर एकहाती पकड ठेवली होती. त्यामुळेच प्रमोद महाजनांचा अत्यंत अचानक, धक्कादायक, शोकात्मक शेवट झाल्यावर मुंडे व्यक्तिश: आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा - अक्षरश: उध्वस्त झाले. महाराष्ट्र आणि देशाच्याही राजकारणातला त्यांचा दुवाच निखळल्यामुळे ते संघटनेत बहुदा बाजूला पडले, दुर्लक्षित राहायला लागले. त्यामुळे संघ परिवाराच्या संस्कारात वाढलेले, भाजप चा ब्राह्मणीतोंडवळा बदलून, जनाधार निर्माण केलेले मुंडे स्वत:च कॉंग्रेसच्या दारापर्यंत जाऊन परतले.
      असं सगळं नष्टचर्य संपून आता पुन्हा त्यांना राजकारणातला सूर सापडत होता. केंद्रातली मंत्रीपदाची मोलाची जबाबदारी मिळाली होती. तीही त्यांनी समर्थपणे पार पाडली असती, याची त्यांना ओळखणार्‍या सर्वांनाच खात्री होती.
      तर आता सगळ्या आश्‍वासक शक्यता संपल्याच. राजकारणात (सर्वत्रच) दुर्मिळ असलेला दिलदारपणा होता मुंडेंकडे. त्यापायी काही वेळा अडचणीत सुद्धा येत होते. असेच एकदा अचानक बोलून बसले की माझा खरा निवडणूक खर्च ८ कोटी रु. झाला. आता, भारतीय राजकारण - विशेषत: निवडणुका - काळ्या, बेहिशोबी पैशानं घेरलेल्या आहेत आणि वेगवेगळे उमेदवार आपला अधिकृत निवडणूक खर्च सादर करतात तेंव्हा ते निवडणूक कायद्याची फक्त तांत्रिकता पाळत असतात हे सर्वांनाच माहितीय. पण राजा नागडा आहे, असं शहाण्या माणसानं ओरडायचं नसतं, उलट तलम राजवस्त्रांचं राजापेक्षा राजनिष्ठहोऊन कौतुक करायचं असतं. पण त्याची फिकीर नसलेल्या बालकासारखे मुंडे असं काहीतरी ओरडून बसायचे. अडचणीत यायचे. खरं तर आपण सगळीच माणसं आहोत. चार दशकांपेक्षा जास्त काळाच्या सार्वजनिक जीवनात कोणाही माणसाकडून असं २/४ वेळा घडणं साहजिक आहे. दाऊदला फरफटत आणीन किंवा एन्रॉन समुद्रात बुडवीन ही याच प्रकारातली विधानं होती.
      राज्यातल्या सेना-भाजप सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा मी सचिव होतो, त्यामुळे त्या दिवसांमध्ये मुंडेंशी जवळजवळ रोजचंच काम पडायचं. पुढे राजीनामा देऊन आण्णा हजारेंबरोबर भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनात सामील झालो. हे आंदोलन भ्रष्टाचाराविरुद्ध होतं, कोणाही व्यक्ती किंवा पक्षाविरुद्ध नव्हतं, अशी माझी श्रद्धा होती. पण सरकार भाजप-सेनेचं होतं ना. त्यामुळे आंदोलनाचा मतितार्थ आपोआपच राजकीय निघत होता. मी कोणतेही शासकीय नियम किंवा संकेत न मोडता आंदोलनात सहभागी होतो. त्या आंदोलनात आण्णांनी गोपीनाथ मुंडेंवर वैयक्तिक स्वरूपाची शंका उपस्थित करणारे काही मुद्दे मांडले. सार्वजनिक आणि व्यवस्था परिवर्तनाच्या आंदोलनात असं करू नये अशी माझी भूमिका होती, प्रयत्न होता, तसं मी आण्णांना सुचवलंही होतं. पण आण्णांनी आरोप केले. नंतर मला ठिकठिकाणांहून कळत राहिलं की त्या आरोपांविषयी मीच आण्णांना सांगितलं अशी मुंडेंची
समजूत होती. ती दूर कशी करायची, मला कधी कळलं नाही.
      पण भेटीगाठी तर व्हायच्या. अशाच एका भेटीत त्यांनी सांगितलं की १९९६-९७-९८ मधल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात मी होतो तेंव्हा सरकारनं माझ्या प्रशासकीय सेवेच्या १० वर्षांतल्या ( १ ९ ८ ६ - ९ ६ ) फायली तपासून पाहिल्या होत्या - कुठेतरी चुकीची सही, गैरप्रकार, वशिलेबाजी काही आढळतं का हे शोधण्यासाठी. आणि अशी एकही गोष्ट आढळली नाही असंही ते म्हणाले. आता, हे सांगायलाही फारच प्रांजळ आणि दिलदार मन पाहिजे.
अशा या कर्तबगार दिलदारपणाचा अचानक अपघाती अंत झाला आहे. यात जीवनाचा मूलभूत अन्यायकारक आविष्कार दिसून येतो. अपघातात गेले तर देशाची मोठी बला टळेल, सेवा घडेल असे खूप दुष्ट देशद्रोही भरलेले आहेत, ते सर्व दीर्घायुषी ठरतात आणि आत्ता कुठे नव्या कर्तृत्वाला वाव मिळालेले मुंडे अपघातात जातात यात एक अनाकलनीय अन्याय (unfair) आहे.
      सकाळी सकाळी ही हार्ट-ब्रेकिंग न्यूज ऐकल्याच्या क्षणांपासून दिवसभर माझ्या डोक्यात
आनंदमधल्या संवादाची तुटलेली टेप फिरत होती - जिंदगी और मोैत उपरवाले के हाथ में है जहॉंपनाह, इसे न हम बदल सकते हैं, न तुम | हम सब रंगमंच की कठपुतलियॉं हैं, जिसकी बागडोर उपरवाले के हाथ में है | कब कौन कैसे जाएगा कोई नहीं कह सकता...
अच्छे दिन आनेवाले है -
पण ते येण्यासाठी काम करायला
आणि आलेले प्रत्यक्ष पाहायला
आता आसपास गोपीनाथ मुंडे नसणार

त्यांची अनुपस्थिती जाणवत राहणार.

1 comment:

  1. Lavasat garibanna 70% ghare arakshit kara...

    ReplyDelete