Thursday, March 6, 2014

अशोक जैनच्या निमित्तानं

...आणि आपण सगळेच

  लेखांक १००सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य

अशोक जैनच्या निमित्तानं
     यक्षप्रश्न. महाभारताच्या वनपर्वातली ही कहाणी. द्यूतामध्ये हरलेले पांडव, १२ वर्षं वनवास - नंतर वर्ष अज्ञातवास - भोगताय्‌त. त्यापैकी वनपर्वाच्या काळात पांडव भारतभ्रमणासाठी तीर्थयात्रा करत फिरतात. त्यात कोणे एके ठिकाणी जंगलात वाट हरवतात. तहान-भुकेनं व्याकूळ होतात. थकून, दमून, घशाला कोरड पडून एका जागी बसतात. त्यांच्यात ठरतं की कुणीतरी एकानं जाऊन पाणी शोधून काढायचं. त्या काळातल्या कुटुंबव्यवस्थेच्या संकेतानुसार सर्वांत आधी धाकट्या भावानं जायचं, म्हणून सहदेव जातो.

     पाण्याच्या ओल्या वासाचा वेध घेत सहदेव एका तळ्यापाशी पोचतो. पाणी भरून घेणार तेवढ्यात तळ्यातून यक्ष प्रकट होतो. सहदेवाला म्हणतो, हे माझं तळं आहे, त्यातून मला न विचारता तू पाणी घेत होतास, तर आता मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, त्यांची मला समाधानकारक उत्तरं दिलीस तर मी तुला पाणी घेऊ देईन, नाहीतर तू इथेच दगड होऊन पडशील.
     सहदेवाचा दगड बनतो.
     इकडे बराच वेळ झाला, सहदेव अजून कसा नाही आला, म्हणून त्याला शोधायला नकुल जातो. त्याचाही दगड बनतो. मग अर्जुन. मग भीम.
     सर्वांत शेवटी धर्मराज युधिष्ठिर तळ्यापाशी पोचतो. आपल्या भावांचे दगड बनलेले पाहतो, त्याच्याही समोर यक्ष प्रकट होऊन आपले यक्षप्रश्न मांडतो. तो सर्व संवाद सखोल तत्त्वज्ञानाचा आहे.
     त्यामध्ये यक्षानं युधिष्ठिराला विचारलेला एक प्रश्न आहे - जगातलं सर्वांत मोठं आश्चर्य कोणतं.
     युधिष्ठिराचं उत्तर आहे - प्रत्येक जण मर्त्य आहे हे माहीत असून, प्रत्येक जण आपण अमर असल्यासारखा वागतो.
     महाभारताच्या कहाणीतलं हे सत्य आजही खरं आहे.
     जगातलं सर्वांत मोठं आश्चर्य. आपल्या ऐहिक अमरत्वाचा आभास.
     या आभासातून बाहेर पडण्याचा प्रवास प्रत्येकाला स्वतंत्रपणे करावा लागतो. आपल्यालाही एक दिवशी जायचं आहे, हे प्रत्येकाला बौद्धिक पातळीला माहीत असतं. पण तो जाणीवेचा जिवंत भाग बनायला प्रत्येकालाच आपापल्या साक्षात्कारी क्षणांना सामोरं जावं लागतं. ते शब्दांत कितीही सांगितलं तरी अपुरंच आहे. आपल्याला आपापलाच अनुभव जाणिवेमध्ये स्थिर करावा लागतो.
     असे ऐहिक अमरत्वाचा आभास दूर करणारे अनेक तीव्र क्षण, या वर्षांत माझ्या वाट्याला आले.
     उदाहरणार्थ अशोक जैन यांचा मृत्यू. मराठीमधला राष्ट्रीय पातळीचा असामान्य पत्रकार. गेली अनेक वर्षं ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे पत्रकारितेपासून दूर होते. तरी पण आता ते गेले, आपल्याला कळणार्‍या जगात तरी परत न येण्यासाठी, न भेटण्यासाठी गेले. या घटनेला इतकी तीव्र अंतिमता आहे की ते आपल्या कळण्याच्या पलिकडचंच आहे. एक शेवटचा पूर्णविराम. स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, अवतरणचिन्ह... वगैरे काही नाही. नवी वाक्यं निर्माण होण्याच्या सर्व शक्यता संपल्याच. पूर्णविराम.
     प्रकृती अस्वास्थ्याच्या काळातही अशोक जैन यांचं महाराष्ट्र, भारत आणि जगातल्या घटनांकडे बारीक लक्ष होतं. ज्या थोड्या वेळा गेल्या काही काळात भेटलो होतो तेंव्हा मला वाटलं होतं की ते मनातून अस्वस्थ, दु:खी आहेत. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतली ढासळती गुणवत्ता, कोसळणारं चारित्र्य, पेड न्यूज, भ्रष्टाचार, वशिलेबाजी - आता तर वाढत गेलेला - वाढवत नेलेला तीव्र जातीय द्वेष - उथळ आणि सनसनाटी बातमीदारी, अभ्यास आणि सखोलतेचा अभाव - इतकंच काय, बेसिक न्यायबुद्धीचा सुद्धा अभाव, बातम्यांना आलेलं इन्फोटेन्मेंटचं स्वरूप, सरकारी सवलती - उदा. १०% चे फ्लॅट - मिळवायला पत्रकारांची चाललेली धडपड - त्यासाठी राजकीय पुढार्‍यांपुढे लाळघोटेपणा - आणि आत्म्यासकट सर्व काही विकायची तयारी - हे सर्व त्यांना समजत होतं, म्हणून ते अस्वस्थ होते. त्यावर आत्ता तरी सर्व काही बघण्यापलिकडे आपण काही करू शकत नाही या एक प्रकारच्या हताश जाणिवेमुळे ते जास्तच अस्वस्थ होते.
     आपल्या सक्रीय पत्रकारितेच्या काळात त्यांनी उत्तम, अभ्यासू, नि:पक्षपाती, परखड पत्रकारितेचा आदर्श जगून दाखवला होता. दीर्घ काळ दिल्लीत वावरताना त्यांनी राजधानीतूनया सदरातून राष्ट्रीय दर्जाची पत्रकारिता, स्तंभलेखन यांचा वस्तुपाठ घालून दिला. भोवतीच्या घटनांवर बोचरं, तिरकस - पण शक्यतो निर्विष भाष्य कसं करावं ते कानोकानीसदरातून मांडलं.
     मराठीतले एक (माझ्या मते) सार्वकालिक असामान्य लेखक महेश एलकुंचवार. दिलीप पुरुषोत्तम चित्रे, विलास सारंग, दुर्गा भागवत यांच्याप्रमाणे कमी शब्दांत प्रचंड ब्रह्मांड मांडण्याची त्यांची शैली. त्यांनी लिहिलेली तीन नाटकं सलगपणे रंगमंचावर सादर करण्याचा प्रयोग दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीनं केला. ही त्रिनाट्यधारा तास चालली.
     त्यावर अशोक जैन यांनी सडकून, तिरकी, बोचरी, उपहासपूर्ण टीका केली होती.
     त्यानं व्यथित झालेले एलकुंचवार नागपूर भेटीत अशोक जैनना अशा अर्थाचं काही म्हणाले होते की तुमची एक कॉलमची मजा होते, पण त्या नादात नवे नवे प्रयोग मार खातील - मग नवे प्रयोग करायला कुणी पुढे येणार नाही. (एकोणीसशे पन्नाशीच्या दशकात चिं.त्र्यं.खानोलकरांच्या अजगरकादंबरीवर आचार्य अत्रेंनी अश्लील असल्याची टीका केली होती - अत्रेंनी! अश्लीलतेची!! पण त्या धक्क्यामुळे काही काळ खानोलकरांचं लेखनच थांबलं होतं.) महेश एलकुंचवारांच्या मुद्द्याचा अशोक जैन यांनी समंजसपणे विचार केला होता, हे मला माहीत आहे.
     आत्ताच्या राजकारणाकडे पाहिल्यावर यशवंतराव चव्हाण जसे संत ठरतात, तसं आत्ताच्या पत्रकारितेपुढे अशोक जैन संत ठरतात.
     आता ते गेले.
     मृत्यूच्या यक्षप्रश्नांपुढे सामाजिक जाणिवेचा एक अंश दगड बनला.
     अजून त्या धक्क्याशी जरा जुळवून घेतलं जातंय तोवर प्रमोद पागेदार गेल्याची बातमी आली. कॅन्सर. अरे पन्नाशी ही काय जाण्याची वेळ आहे का? पण जाण्याला अशी काही वेळ, वेळापत्रक असतं का? आणखी एक उत्तम पत्रकार. मी मंत्रालयात काम करताना यांच्याशी ऋणानुबंध जुळले. ते, मी सरकारी अधिकारी आणि प्रमोद पत्रकार असे न राहता माणूस म्हणून मैत्रीच्या पातळीवर पोचले. पुढे मी सरकारी नोकरी सोडली. प्रमोदनंही पत्रकारिता सोडल्यासारखीच होती. पत्रकारितेतल्या पतनाच्या अवाढव्य लोंढ्यामुळे अनेक संवेदनशील पत्रकार साईडलाईनला पडल्यासारखे झाले. त्यातला एक उत्तम पत्रकार - प्रमोद पागेदार.
     गेला.
     अशोक जैन, प्रमोद पागेदार अपापलं जगून तरी गेले. चारू देशपांडेनं पंख्याला टांगून आत्महत्त्या केली. चारू देशपांडे. श्री.ग.माजगावकरांच्या साप्ताहिक माणूसमधल्या लेखनापासून - म्हणजे १९७७-७८ आमची दोस्ती. काळापुढे टिकलेली. काळानं पारखून सिद्ध केलेली. चारूचं मराठी लेखन अत्यंत लालित्यपूर्ण होतं. इंग्लिश लेखनही तितकंच बांधेसूद. हसरा चारू भेटीगाठी गप्पांमध्ये मोकळा ढाकळा, काहीसा विस्कळित वाटायचा. पण त्यानं बातमी, भाष्य, ऑप्‌-एड, अँकर-पीस लिहिला की त्याच्या संक्षिप्त, अर्थपूर्ण, सूत्रबद्धतेपुढे थक्क व्हायला भाग पडायचं. इकॉनॉमिक टाईम्समध्ये चारू देशपांडेची बाय्लाईन दिसली की मी ती बातमी-भाष्य-लेख न चुकता वाचायचो. त्यानंही पुढे पत्रकारितेला वैतागून रामराम ठोकला होता. जीवनाच्या अनेक क्षेत्रांत सद्प्रवृत्ती निराशेपोटी निवृत्त होताना पाहण्याची तीव्र वेदना माझ्या वाट्याला आलेलीच आहे. चारूनं उद्योगसमूहात जॉब धरलं. बहुदा तिथे घडलेल्या काही गोष्टींनी त्याला आत्महत्त्येकडे नेलं. कायम हसतमुख आणि उत्तम विनोदबुद्धी असलेला चारू आत्महत्त्या करेल हे कल्पनेपलिकडचं आहे. पण जून २०१ मध्ये मी तिबेटच्या दौर्‍यावर असताना टेक्नॉलॉजीच्या कृपेनं ही बातमी माझ्यापर्यंत पोचली. तिबेटी संस्कृतीचा चीनकडून चालू असलेला खून पाहात होतो. आणि मनाला दीर्घ काळ सतावणार्‍या समस्येशी संघर्ष करत होतो - अजूनही, आहे - की वर्तमान भारतीय संस्कृतीला आत्मनाशाची प्रेरणा झालेली आहे का.? तेंव्हा चारूच्या आत्महत्त्येची बातमी पोचली. टेक्नॉलॉजी आता वेदना सुद्धा जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही, पामीरच्या पठारावर, जगाच्या छपरावर - आपल्यापर्यंत एका क्लिक्‌ सरशी पोचवते. कळण्याच्या पलिकडचं आहे सगळं. अन्‌ तिथे दूर तिबेटमध्ये चारूच्या आत्महत्त्येचं काय करायचं न कळल्यामुळे आलेली तगमग अजून ताळ्यावर आलेली नाही.
     मराठीतल्या सिद्धहस्त लेखिका वीणा गवाणकर यांच्या घरी दुपारी चारू हसतखेळत, मजा करत जेवला, घरी गेला. ड्रायव्हरला म्हटला, थोड्या वेळात येतो, म्हणून वर गेला. तो वरच गेला. पंख्याला दोरी टांगून वर गेला.
     अस्तित्वाचं अंग दगड बनत जाणं काही संपत नाही.
     बेळगावचे एक आदर्श उद्योजक सुरेश हुंद्रे सर्व सरकारी भ्रष्टाचाराच्या नाकावर टिच्चून सरळच व्यवसाय करता येतो, वाढवता येतो - कोट्यवधींचा टर्न-ओव्हर पार करता येतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं. त्यांची-माझी आता १८ वर्षांची जिवलग ओळख. जोडोनीया धन उत्तम वेव्हारे’ - असा व्यवसाय चालवून दाखवल्यावर बेळगावच्या रामकृष्ण मिशनचं काम करत उदास विचारे वेच करी’ - असं सुरेश हुंद्रे जगून दाखवत होते. त्यांच्या उद्योगाचं नाव पॉलिहॅड्रॉन’. आधी अन्य बहुसंख्य उद्योजकांप्रमाणे तेही उन्नीसबीस करत, पाकिटं पोचवत, सरकारी यंत्रणेशी जुळवून घेत व्यवसाय करत होते. इच्छा नाही, पण करावं लागतं, त्याशिवाय बिझिनेस चालवता येणार नाही - असं तत्त्वज्ञान त्यांनी उभं केलं होतं. वरिष्ठ पातळीचा एक एक्झिक्यूटिव्ह नेमण्यासाठी मुलाखत घेताना ते एका उमेदवाराला म्हणाले, नोकरी देतो - पण, समजा पगार पन्नास हजार दिला, तर सही एक लाखावर करावी लागेल, माझाही इलाज नाही. तो माणूस म्हणाला, भ्रष्टाचारानं मिळणारी तुमची नोकरी नको मला. सुरेश हुंद्रे म्हणाले, भ्रष्टाचार अटळ आहे. हा माणूस म्हणाला, आपण बदलू शकतो. सुरेश हुंद्रे म्हणाले, चल आपण बरोबरच बदलू. आणि खरंच बदलले. त्यांनी कामगारांना विश्वासात घेतलं. सरकारी पाकिटं बंद करून टाकली. सर्व खरे खरे हिशोब ठेवत टॅक्सेस्‌ प्रामाणिकपणे भरणं चालू केलं. आपण किती कोट्यवधींचे कर भरतो हे कंपनीच्या मुख्य पोर्चमध्ये भव्य फळ्यावर लावून ठेवलं. पाकिटाची अपेक्षा करत कोणी सरकारी अधिकारी आलाच तर त्याला तो फळा दाखवून, बाहेरचा रस्ता सुधरायला सांगितलं. देश-विदेशांत त्यांचे मोठे सन्मानही झाले. त्यांना विद्यार्थ्यांशी संवाद करायला बोलवायचं आमचं ठरलं होतं.
     तर आता काही काळापूर्वी, एका सकाळी ते उठले. आणि हार्ट अॅटॅकनं गेले.
     अशाच एका सकाळी प्रतिभावंत इंजिनियर मित्र माधव जोग उठला आणि ब्रेकफास्टच्या टेबलवर हार्ट अॅटॅकनं अचानक गेलाच.
     माधव जोग. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेची मूळ कल्पना त्याची. त्याच्या अभियांत्रिकी योजनेमध्ये हा मूळ महामार्ग पुण्यातून गेट-वे-ऑफ-इंडिया पर्यंत सरळ रेषेत होता - मध्ये आवश्यक ते पूल, बोगदे, कल्व्हर्ट वगैरे - पण लेनचा रस्ता सरळ. जागतिक दर्जाचा. तो व्यक्तिश: बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ होता. त्यानं ही योजना बाळासाहेबांना सांगितली. बाळासाहेबांनी तो १९९० च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप च्या निवडणूक जाहीरनाम्याचा भाग बनवला. १९९० ची विधानसभा निवडणूक सेना-भाजप नं जिंकली नाही. तर बाळासाहेबांनी मंत्रालयात मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे ही योजना सुपूर्द केली. नंतर वर्षानुवर्षं रेंगाळत, चिकार राजकीय-प्रशासकीय विलंब, वगैरे होत आत्ताचा, मूळ योजनेपेक्षा खूप वेगळा - कमी कार्यक्षम एक्स्प्रेस वे तयार झाला. दरम्यान राजकारणाला वैतागलेला माधव उदासपणे सेनेपासून दूर होत, फक्त व्यवसायात रमायचा प्रयत्न करत राहिला.
     आणि असाच पन्नाशीमध्ये ब्रेकफास्टच्या टेबलवर अंतिमत: निर्णायक गेलाच.
     असा शाळेच्या दिवसांपासूनचा (१९६९) कार्यकर्ता मित्र विवेकानंद फडके. आम्ही त्याला भाईम्हणायचो. गेला.
     माझे IAS मधले चार बॅचमेट्‌स्‌. दोन हार्ट अॅटॅकनं, एक अपघातात - एकानं आत्महत्त्या केली. IAS/IPS इ... वरिष्ठ अधिकारी आत्महत्त्या कशी काय करतात?
     याला काही उत्तरच नाही. यक्षप्रश्न सगळे.

     मध्ये महाराष्ट्र आणि भारत सरकारमध्ये सर्वोच्च पातळ्यांवर काम करणार्‍या माझ्या IAS मित्रांना भेटायचं निमित्त झालं. मला वाटलं होतं करियरच्या शिखरावर असलेले हे मित्र शांत, प्रसन्न, आश्वस्त असतील. तर ते मला उदास अस्वस्थ दिसले. करियर आणि कदाचित आयुष्याचा अज्ञात शेवट जवळ आल्याच्या जाणीवेतून तलत मेहमूदनं गायलेल्या अंधे जहॉं के अंधे रास्ते । जाये तो जाये कहॉंया गजलमधली एक ओळ आहे ऐ गम के मारों मंजिल वही है । दम ये टूटे जहॉं’. मला वाटत आलंय की शेवटचा श्वास जिथे घेऊ तेच आपलं ध्येय आहे, या जाणिवेला दु:खद कशाला म्हणायचं. प्रवासाचा प्रत्येक क्षण अनमोल आहे. कुठे अमुक एका मुक्कामावर पोचायचंय असं नाहीच. शेवटचा श्वास जिथे घेतला जाईल, तोच आपला मुक्काम. तिथपर्यंतचा प्रवास तर आनंदानं करावा नं. आपली भारतीय संकल्पना आहे की माणसाचा जन्म मिळणं हे सद्भाग्य आहे. अंत झाला अस्ताआधी । जन्म एक व्याधीअसं आरती प्रभूंना का वाटलं हे आपण समजू शकतो, तरी पण व्याधीग्रस्त जन्म सुद्धा संधी आहे. अनमोल आहे. माणसाला मृत्यूची जाणीव झाल्यावरच प्रेम का आठवतं, हाही यक्षप्रश्नच आहे. पण जीवन आहे तोवर प्रसन्नपणे, अलिप्तपणे, सर्वांनाच शुभेच्छा देत, सर्वांशी प्रेमानं वागत जगण्याचा - प्रयत्न तरी करायला, काय हरकत आहे?

3 comments:

 1. अशोक जैन खूप great होते.मी त्यांची पुस्तक वाचली आहेत.मध्यंतरी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक विजय जाधव असेच हृदयविकाराने अचानक गेले.त्याचं काम असच great होत.तेव्हा मला असच वाईट वाटल होत.
  तसेच सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला फेसबुक वरील लेख वाचला.तुम्ही १९९८ मध्ये निवडणूक लढवून सुरुवात केलीत हे खूप great होते.पण, मला वाटत त्यावेळी तुम्ही दुसऱ्यादा खासदार/आमदार निवडणूक लढवायला हवी होती.तुम्ही नक्की निवडून आला असतात.पण, तुम्ही तस का केल नाहीत, हाच माझ्यासाठी मोठा यक्षप्रश्न राहिलाय ? याची मला नेहमीच अजूनही खंत वाटते.मला तर अजूनही वाटत की अजूनही वेळ गेलेली नाही.उलट आत्ताच खरी योग्य वेळ आहे.इतरांचा अगदी 'आप' वगैरे विचार न करता आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी.आणि अगदी अपेक्षित परिणाम नाही मिळाले तर पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उभ रहाव अपक्ष म्हणून.निवडून आल की सुयोग्य पक्षाला पाठींबा द्यावा.तुमच्या मूळ विचारांचा गाभा हा राजकीय आहे, अस मला नेहमी वाटत आलय.आणि शिक्षण क्षेत्रापेक्षा राजकीय क्षेत्रातून थोड्या काळासाठी का होईना पण दूरगामी परिणाम असणार कार्य करता येत, अस माझ प्रांजळ मत आहे.तुम्ही अजूनही पुण्याच नेतृत्व करू शकता जे तुम्हाला अपेक्षित आहे.आणि कलमाडी आदी लोक नसल्याने एक राजकीय पोकळी आणि संधीसुद्धा तयार झालेय जिंकण्याची.एक-दोनदा प्रयत्न करायला काय हरकत आहे ? राजकारणात 'जिंकणे' यासारखी मजा/आनंद नाही जसा तो ओबामांना मिळाला.मला तुम्हाला थोडाकाळ का होईना राजकारणात यशस्वी झालेलं बघायला आवडेल.शुभेच्छा..!

  ReplyDelete
 2. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 3. फार सुंदर/भावपूर्ण लेख झाला आहे. फक्त हे वाक्य खटकलं. फक्त चारूनं उद्योगसमूहात जॉब धरलं हे वाक्य खटकलं. नोकरी हा शब्द हवा होता असं वाटलं. मी मनोहर प्रभुदेसाईंची (रत्नागिरी) मुलगी (मोहना)

  ReplyDelete