Thursday, March 14, 2013

महाराष्ट्राचे ‘साहेब’ (भाग २ – एकूण ३)


  ... आणि आपण सगळेच
   लेखांक 58
 सामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य

महाराष्ट्राचे साहेब
(भाग २ एकूण ३)

यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दीनिमित्त  मागच्या वर्षी लिहिलेली तीन लेखांची लेखमालिका  ब्लॉगवरील मित्रांसाठी



    

साहित्याच्या कोणत्याही निकषांवर यशवंतरावांचं आत्मचरित्र कृष्णाकाठहा अभिजात साहित्याचा आदर्श म्हणून मान्यता पावेल. सर्वांनीच त्यांचं आत्मचरित्र मनापासून वाचलं पाहिजे. आपण चाणक्य मंडल परिवारमधल्या फाउंडेशन कोर्समध्ये तर कृष्णाकाठहा कोर्सचा भाग बनवलाय.
    देवराष्ट्रेगावातल्या सामान्य घरात जन्मलेले यशवंतराव. त्यांच्या जडणघडणीत माऊलीचा वाटा फार मोलाचा आहे. शाळेमधे सर्वच लहान मुलांना विचारलं जातं की मोठेपणी तुला कोण व्हायचंय. बहुसंख्य लहान मुलं त्यांच्या कोणातरी हीरोचं नाव सांगतात. यशवंतरावांना शाळेत असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘मला यशवंत चव्हाणच व्हायचंय’. जीवन दुसर्‍याकडे बघून, तिसर्‍याशी तुलना करून, चौथा काय म्हणतो यावरून घडवायचं नसतं. स्वत:च्या आत डोकावून, स्वत:ला ओळखून, स्वत:च्याच स्वतंत्र स्वयंसिद्ध साच्यात घडवायचं असतं. मला यशवंत चव्हाणच व्हायचंयया उत्तरात यशवंतरावांमधे ही प्रगल्भ समज उत्स्फूर्तपणे व्यक्त झाल्याचं दिसतं.
    पुढे देशातल्या भारलेल्या स्वातंत्र्य चळवळीच्या वातावरणात विद्यार्थी यशवंतरावही भारून गेले. कर्‍हाडमधल्या प्रभातफेरी, ध्वजवंदन, वंदे मातरम्‌मध्ये सहभागी झाले. पोलिसनं पकडून कोठडीत टाकलं. पकडणारा पोलिसही भारतीय-मराठीच होता. त्याला पोलिस केस होऊन एका तरुण पोराचं करियर बरबाद होईल याची काळजी वाटत होती. त्यानं सुचवलं की फक्त माफी माग, तुला सोडतो. पोलिस कोठडीतल्या पोराला भेटायला आई आली. माऊलीला यशवंतरावांनी पोलिसची ऑफरसांगितली. तर आईच ठणकावून म्हणाली, ‘कशापायी माफी मागायची पोरा, तू काय चुकीचं वागला नाहीस, काही माफी मागायची नाही.आईच जेव्हा मुलाला वैयक्तिक स्वार्थ - करियरचं बाळकडू न पाजता स्वातंत्र्य-देशभक्ती-स्वाभिमान आणि लष्करच्या भाकर्‍या भाजण्याची शिकवण देते तेव्हा यशवंतराव घडतात.
    पुढे क्रमाक्रमानं स्वत:तल्या कर्तबगारीच्या बळावर कर्‍हाडमध्ये यशवंतरावांचं नाव नेतृत्वस्थानी घेतलं जाऊ लागलं. जातीपातींचा शाप भारतीय संस्कृतीच्याच हाडीमासी खिळलाय, त्यातून कर्‍हाडची कशी सुटका असेल. कर्‍हाडमध्ये लोकमान्य टिळकांचे काही अनुयायी होते. यशवंतरावांच्या काही सहकार्‍यांनी लोकमान्यांविषयी सुद्धा अनादराचे उद्गार काढून कर्‍हाडमधल्या टिळकपंथीयांना चळवळीतून, संघटनेतून दूर सारावं असं सुचवलं. यशवंतराव आपल्याला सांगतात की लोकमान्यांचं व्यक्तिमत्त्व, विचार, चारित्र्य, त्यांचं कर्तृत्व, देशासाठी त्यांनी केलेला त्याग एवढा मोठा आहे की त्यांच्यावर टीका करणारे आतून कुठेतरी ब्रिटिश सरकारला सामील असले पाहिजेत - म्हणून टिळकपंथीयांना दूर सारा म्हणणार्‍यांनाच त्यांनी दूर सारलं. याचा अर्थ लोकमान्यांच्या सर्व विचार किंवा कृत्यांशी यशवंतराव सहमत असतीलच असा होत नाही. पण वेगळे विचार, प्रसंगी मतभेद असले तरी नातं आदराचं असू शकतं. ही असामान्य प्रगल्भताही पुढे यशवंतरावांच्या जीवनचरित्रात सतत व्यक्त होते.
    स्वातंत्र्यवीर सावरकरांशी असलेलं नातंही असंच. यशवंतराव सांगतात की कर्‍हाडमधल्या आम्हा तरुणांना सावरकरांचं कमालीचं आकर्षण होतं. ते अनेक तरुण मित्रांना घेऊन कुंभारली घाटातून रत्नागिरीला गेले केवळ सावरकरांना भेटायला. पुढे राजकीय, वैचारिक वाटा तर वेगळ्या झाल्या. यशवंतराव तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींच्या सहवासातून मानवेंद्रनाथ रॉय यांच्या एकात्म मानववादया विचारधारेच्या प्रभावाखाली होते. सावरकरांचं हिंदुत्वत्यांना पसंतही नसेल पण म्हणून सावरकरांचं व्यक्तिमत्त्व, वक्तृत्व, विज्ञाननिष्ठा, काव्य, समाजसुधारणा इ... विषयीचा यशवंतराव अनादर करत नाहीत. पुढे मे, १९६० ला साहेबमहाराष्ट्राचा मंगलकलश घेऊन आले तेव्हा सावरकरांनीही महाराष्ट्राला आवाहन केलं होतं की यशवंतराव हा मर्द मराठामहाराष्ट्राचं भवितव्य घडवेल, महाराष्ट्रानं त्यांच्या पाठीशी उभं रहावं.
    शाहू महाराज आणि लोकमान्य टिळकांमधे वेदोक्त प्रकरणामुळे झालेला वाद ही महाराष्ट्राची एक ठसठसती जखम आहे. आता त्या घटनेला ११० वर्षं उलटून चाललेली असली तरी जातीय जाणीवांच्या, त्यातून उद्भवलेल्या भांडणांच्या जखमा अजून शिल्लक आहेत. नव्हे नव्हे त्या पुन्हा उकरून महाराष्ट्राचं रक्त वाहवून स्वत:चा राजकीय स्वार्थ साधण्याच्या उद्योगात आजही अनेक शक्ती सामील असतात. तर मला उत्सुकता होती की टिळक-शाहू संबंध आणि वेदोक्त प्रकरणाकडे यशवंतराव कसं पहातात. त्यांच्या स्वत:च्या लेखणीतून उतरलेल्या लेखांचा संग्रह आहे ऋणानुबंध’. (ते उत्तम वक्ता होते, चतुरस्र वाचक होते, तसे स्वत: कसलेले लेखकही होते.) मोजक्याच, कमी शब्दांत खूप काही सांगून जाण्याची त्यांची शैली होती. त्या शैलीतच त्यांची शाहू-टिळक संबंध आणि वेदोक्ताचा वाद यांचा एका वाक्यात परामर्श घेतला आहे, ‘महाराष्ट्राच्या समाजकारणात लोकमान्य टिळक व छत्रपती शाहू महाराज यांचे ग्रह जमले नाहीत, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट होती.
    पण अशा सर्व जखमा बुजवत, सर्वांना बरोबर घेत, ‘बेरजेचं राजकारणकरण्याची त्यांची भूमिका होती. आता बेरजा आणि राजकारण दोन्हीचा संबंध खोकी, पेट्यांपुरताच उरलाय. त्यांना साहेबांचं बेरजेचं राजकारण कळणं अवघड आहे. महाराष्ट्रातल्या सत्यशोधक चळवळीला त्यांनी आधी स्वातंत्र्यलढ्याशी आणि नंतर कॉंग्रेसशी जोडलं. जेधे-जवळकरांना असं जोडून घेताना त्यांनी पद, पैसे यांची लालूच दाखवून आयाराम गयारामचं राजकारण केलं नाही. शेतकरी कामगार पक्षाच्या रूपानं महाराष्ट्रात कॉंग्रेसला आव्हान उभं राहिलं होतं. ती हवा सुद्धा यशवंतरावांनी कॉंग्रेसच्या शिडात भरून घेतली; पण त्यात माणसं जोडण्याचं बेरजेचं राजकारणहोतं, खरेदी-विक्री सौदेबाजीचा घोडेबाजार नव्हता.
    संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे मात्र साहेबांना शिडात भरून घ्यायला अवघड गेलेलं वादळ आहे. किंबहुना त्यांच्या तेजस्वी कारकीर्दीवर उमटलेलं ते एक किंचित्‌ गालबोट आहे असं म्हणणं फारसं वावगं ठरणार नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र असलेल्या द्वैभाषिक मुंबई राज्याच्या मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई मंत्रीमंडळात ते मंत्री होते. आधी १९५३ मधे तेलुगु भाषिकांचा आंध्र प्रदेश हा पहिला भाषावार प्रांत आकाराला आला. त्यानंतर फाजल अली आयोगाच्या शिफारसीनुसार नोव्हेंबर १९५६ पासून कन्नड भाषिकांचं म्हैसूर (कर्नाटक), तामिळ भाषिकांचं मद्रास (त्याला तामिळनाडू नाव १९६७ सालानंतर देण्यात आलं) आणि मल्याळी भाषिकांचं केरळ हे राज्य झालं. आता मराठी भाषिकांना महाराष्ट्र का मिळू नये याला काही कारण, काही समर्थन उरलं नव्हतं. पण फाजल अली आयोगानं पक्षपात करून द्वैभाषिक मुंबई राज्यच आणखी तरी वर्षं चालू ठेवण्याची शिफारस केली. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पेटून उठला. मुंबईमधे अभूतपूर्व आंदोलन झालं. मोरारजीभाईंनी गोळीबाराचे आदेश दिले. नोव्हेंबर ५६ मधे संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्‌द्यावर १०५ मराठी भाषिक शहीद झाले. पोलिस गोळीबारात एखादी व्यक्ती मारली जाणं तर सोडाच, सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून एक गोळी जरी फायर झाली तरी त्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मूळ कायद्यात (क्रिमिनल प्रोसीजर कोड) तरतूद आहे. पण १०५ जण शहीद झालेल्या गोळीबाराची कधीही न्यायालयीन चौकशी झाली नाही, करण्याच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष करण्यात आलं. नेहरू मराठी भाषिकांचं राज्य बनण्याच्या विरुद्ध होते. तर त्या भारलेल्या, पेटलेल्या वातावरणात यशवंतराव म्हणाले, ‘मला महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत’.
    हे ते गालबोट. आता मधे अर्ध्या शतकाहून अधिक कालखंड उलटून गेल्यावर, नवी कागदपत्रं, साहेबांची डायरी प्रकाशित झाल्यावर आपल्याला माहितीय की संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी त्यांचीही भूमिका होती, ती ते पक्षश्रेष्ठींसमोर मांडत होते. पण पक्षाची अधिकृत भूमिका - मराठी भाषिकांच्या राज्याला विरोध करण्याची - निष्ठावंत पक्षकार्यकर्त्याप्रमाणे सार्वजनिक जीवनात मांडत होते. म्हणून तर शेवटी मंगलकलश घेऊन येण्याचं पुण्य त्यांनाच लाभलं. मंगलकलश आणल्यावर विदर्भातले साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकरांनी साहेबांना विचारलं होतं की महाराष्ट्र मराठा की मराठी?’ यशवंतरावांनी उत्तर दिलं होतं मराठी’ - आणि पुढे बोलल्या शब्दासारखीच त्यांची महाराष्ट्राविषयीची धोरणं होती.
    पण १९५६ ते ६० च्या कालखंडात मला महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठेहे विधान फार मोठं वादळ उठवून गेलं. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रापेक्षा आणि राष्ट्रापेक्षा एक व्यक्ती मोठी नसते. उठलेल्या वादळातून वाट काढायला यशवंतरावांनी प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं नेहरूंच्या हस्ते अनावरण करण्याचा घाट घातला. डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या आधीच्या आवृत्त्यांमधे गझनीच्या महंमदाला रसिक आणि कर्तबगारम्हणणारे नेहरू शिवाजी हा लुटारू होताम्हणतात. पण स्वातंत्र्यानंतर त्यांना एवढं तर कळलं असलं पाहिजे की शिवाजी महाराजांविरुद्ध काही विधान केलं तर महाराष्ट्रात पक्षाची एकही जागा निवडून येणार नाही. म्हणून प्रतापगडावरच्या महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन नेहरूंच्या हस्ते. ते निदर्शनांनी गाजलं. महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठेया विधानाची एवढी तीव्र प्रतिक्रिया उमटत राहिली की, आचार्य अत्रेंनी यशवंतरावांना सूर्याजी पिसाळची उपमा दिली. त्यानं अत्यंत व्यथित होऊन यशवंतरावांनी विचारलं, ‘मी सूर्याजी पिसाळ, तर शिवाजी महाराज कोण?’ संयुक्त महाराष्ट्राचा तोफखाना असलेले अत्रे धडाडले होते, मुंबई बेळगाव - कारवार - विदर्भासहित संयुक्त महाराष्ट्र म्हणजेच शिवाजी महाराज (शिवाजी महाराज त्याहीपेक्षा मोठे आहेत, ही गोष्ट वेगळी).
    या सर्व प्रकारात महाराष्ट्रापेक्षा मला नेहरू मोठेया विधानाचा कालसापेक्ष संदर्भ समजत असला तरी मनाला खटकत रहातोच. तरीही त्या सर्वांतूनही सतत समोर येत राहतं ते यशवंतरावांचं संयमी, संवेदनशील व्यक्तिमत्त्व. आचार्य अत्रे त्यांना सूर्याजी पिसाळ म्हटले म्हणून त्यांना मारहाण झाली नाही, ‘मराठाच्या कार्यालयावर हल्ला झाला नाही, छापखान्याची मोडतोड झाली नाही. असल्या पत्रकारांना जोड्यानं मारलं पाहिजेअसं साहेब म्हणाले नाहीत. राजकारण करायचं म्हणजे टग्याहोता आलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली नाही!
    यशवंतरावांच्या या संयमी, सर्वांना सोबत घेणार्‍या व्यक्तिमत्त्वाचा तोल अवघडातल्या अवघड प्रसंगांमधेही ढळला नाही. जून ७५ मधे इंदिराजींनी देशात आणीबाणी लागू केली, ती साहेबांना मनातून मान्य नव्हती, ते व्यथित होते असं त्यांनी डायरीत नोंदवून ठेवलंय. इंदिराजींनी जयप्रकाश नारायण यांच्यासकट सर्व विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात टाकलं होतं. इंदिराजींच्या मनात सतत यशवंतरावांबद्दल संशय होता, कारण त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊ शकेल असा मासबेसफक्त यशवंतरावांकडे होता. या गंभीर धोकादायक पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं कर्‍हाडमध्येच. अध्यक्ष होत्या रणरागिणी दुर्गा भागवत. यशवंतराव स्वागताध्यक्ष. अचानक दुर्गाबाईंनी जाहीर केलं की हॉस्पिटलमधे असलेल्या जेपींच्या प्रकृतीसाठी आपण सर्वजण मिनिटं शांत उभं राहून प्रार्थना करू या. सर्व राजकीय धोके समजत असून यशवंतराव सर्वांसोबत उभे राहिले. त्यांनी औचित्यभंग केला नाही. अद्वातद्वा तर त्याहून केलं नाही. शांततेची, प्रार्थनेची मिनिटं  संपल्यावर ते शांतपणे तिथून निघून गेले.
    यशवंतरावांच्या व्यक्तित्व-विचारातला हा संयम-स्पष्टता आणि सर्वांना सोबत घेण्याच्या वृत्तीचा सार्वजनिक जीवनात स्वीकार दिसला तर महाराष्ट्राचं आणि भारताचं भलं होईल.

No comments:

Post a Comment