Monday, February 2, 2015

मराठेशाहीचा इतिहास
पानिपत. १४ जानेवारी १७६१. मराठ्यांच्या इतिहासातला, पराभवातला सुद्धा दैदिप्यमान अध्याय. भारताच्या इतिहासाचं एक निर्णायक वळण आणि अजूनही भरून निघालेली जखम.

          
  मराठ्यांचा इतिहास या संज्ञेला अलिकडच्या काही वर्षांमध्ये एक जातीय अर्थ येऊन बसला, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला संपूर्ण भारतवर्षासाठी लढण्याची प्रेरणा आणि दिशा दिली. संपूर्ण देश अत्याचारी आक्रमकांच्या तावडीतून मुक्त करून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं ध्येय ठेवून महाराष्ट्र देशासाठी, देशभर लढला - त्याचं नाव मराठ्यांचा इतिहास’. भारताच्या इतिहासातलं अठरावं शतक मराठ्यांचं शतकआहे. इंग्रजांनी भारत मुघलांकडून नाही जिंकला, मराठ्यांकडून जिंकला. हे आपल्यापेक्षा तत्कालीन इंग्रज अधिकारी आणि इतिहासकारांना समजलेलं होतं. दिल्लीत मुघल बादशहा असला तरी भारताची प्रभुसत्ता खऱ्या अर्थानं मराठ्यांच्या हातात आहे आणि मराठे प्रबळ आहेत तोवर आपल्याला भारत ताब्यात घेता येणार नाही याची नीट जाण इंग्रज अधिकाऱ्यांना होती.
            औरंगजेबानंतर मुघल साम्राज्य खिळखिळं झालं, त्यामुळे तयार झालेल्या पोकळीत मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार झाला असा एक अत्यंत चुकीचा पर्स्पेक्टिव्हमांडला जातो. या पर्स्पेक्टिव्हचंच पुढचं  समीकरण म्हणजे - मुघल साम्राज्याचं पतन आणि इंग्रज राज्याचा उदय यांच्या संधीकाळात मराठ्यांचा इतिहास - एक जणू तळटीप - म्हणून पाहिला जातो, मांडला जातो. ऐतिहासिक वस्तुस्थिती ही आहे की बलाढ्य औरंगजेबाला खतम केलं मराठ्यांनी. मुघल साम्राज्य खिळखिळं केलं तेच मुळी मराठ्यांनी. संपूर्ण मध्ययुगात संपूर्ण भारतभर, भारतासाठी लढू म्हणणारी शक्ती - म्हणजे मराठ्यांचा इतिहास. आज काही काम व्हायला हवं असेल - तर ते म्हणजे - मराठ्यांच्या इतिहासाला भारताच्या इतिहासातलं न्याय्य स्थान मिळवून देणं.
            त्या दृष्टीनं पडलेलं एक पाऊल म्हणता येईल - रघुनाथ यादव चित्रगुप्त विरचित बखर पानिपतची - या आकाराला छोट्या, पण महत्त्वाला मोठ्या - ग्रंथाचं प्रकाशन. पानिपताच्या लढाईची कहाणी सांगणारी ही बखर माधवराव पेशव्यांना पदाची वस्त्रं मिळाली, इथे संपते. बखरीची रचना १७६१ मध्येच झाली.
       शिक्षणानं, व्यवसायानं सर्जन असलेल्या डॉ. उदय कुलकर्णी यांनी ब्रिटनमधल्या रॉयल एशियाटिक सोसायटीतून ही बखर शोधून काढून, परिश्रमपूर्वक संपादन करून, आता सादर केली आहे. डॉ. उदय कुलकर्णी यांचाच पानिपत युद्धावरचा ऐतिहासिक ग्रंथ 'Solstice at Panipat'  - यापूर्वीच प्रसिद्ध झाला आहे.
       ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी चार्लस् मॅलेट याला मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करायला कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार त्यानं मराठ्यांच्या इतिहासाचा आराखडा तयार करून कलकत्त्याला, कंपनीच्या भारतातल्या मुख्यालयात पाठवणं सुरू केलं होतं. त्यासाठी त्यानं ही पानिपतची बखरशोधून इंग्लिशमध्ये अनुवादित करून घेतली होती १७९१ मध्ये - यात इंग्रजांची ऐतिहासिक जाणीव’ (Historical consciousness) दिसून येते. ज्या देशाला जिंकून घ्यायचंय, ज्याच्यावर राज्य करायचंय - तो देश, तो समाज, त्याचा धर्म, संस्कृती, भाषा समजली पाहिजे - (म्हणजे ती मोडून काढता येईल!) या भूमिकेतून इंग्रज आणि युरोपीय (काही, सर्वच नाही) इतिहासकारांनी भारताच्या इतिहासाचा अभ्यास केला, मांडणी केली. आपण मात्र आपल्याच इतिहासाकडे तेव्हाही दुर्लक्ष करत होतो - आजही करतो. भारतीय संस्कृतीच्या रचनेतऐतिहासिक जाणिवेचा अभाव दिसून येतो का - असा एक अस्वस्थ करणारा प्रश्न पडावा - इतपत तरी परिस्थिती आहे.
Cover letter of Panipat campaign's description dated 1761, copied in 1791 for Sir Charles Malet.
       ही परिस्थिती बदलण्याचं एक मोलाचं पाऊल म्हणजे पानिपतची बखर’.
       शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जी दिशा दिली - जे काम नेमून दिलं - संपूर्ण भारत अत्याचारी आक्रमकांच्या तावडीतून मुक्त करणं - ते जवळजवळ पूर्ण करत आणलं होतं - त्याचं वर्णन केलं जातं मराठे अटकेपार पोचलेया विधानानं. अटक, म्हणजे भारतावर मध्ययुगात सतत आक्रमणं येत होती - तो खैबरखिंड उतरल्यावर - सिंधू नदीच्या काठावरचा किल्ला - लष्करी  ठाणंतिथे  भगवं निशाण फडकवलं - ही बातमी मराठ्यांचा सेनापती रघुनाथराव पेशवा - राघोबादादा - पुण्यात आपला भाऊ नानासाहेब पेशव्याला कळवताना अशा अर्थाचं म्हणतात कीथोरल्या आबासाहेबांनी’ - म्हणजे शिवाजी महाराजांनी नेमून दिलेलं काम आपण जवळजवळ पूर्ण करत आणलं आहे - आता आपण आदेश द्याल तर काबूल-कंदाहारवर सुद्धा भगवं निशाण लावू.’ त्यावर उत्तर देताना नानासाहेब पेशवा अशा अर्थाचं म्हणतात की मनसुबा चांगला आहे - पण इकडे हिंदुस्थानात आपल्याला नवी समस्या उद्भवली आहे - आधी तिचा बंदोबस्त करायला हवा - हा संदर्भ प्लासीच्या लढाईचा (१७५७) आहे. त्यात ईस्ट इंडिया कंपनीचा विजय हा आपल्याला - भारताला धोका आहे, हे मराठ्यांना समजलेलं होतं. बंगालच्या चौथाई, सरदेशमुखीचे अधिकार मराठ्यांकडे होते. आपण हिंदुसथानच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्वासाठी लढतो आहोत, त्याचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे याचं मराठ्यांना भान होतं.
       मराठ्यांच्या शत्रूंना सुद्धा होतं. म्हणून तर नजीबखान रोहिल्यानं अहमदशहा अब्दालीला बोलावून घेतलं. आता तू जर आला नाहीस तर भारतावर मराठ्यांचं - म्हणजे हिंदूंचं – ‘काफिरांचंराज्य येईल असं नजीबखान रोहिला कळवतो. त्यानुसार मराठ्यांचा पराभव करून दिल्लीत हिंदुस्थानचा बादशहा म्हणून  राज्याभिषेक करून घेण्याचा धरून अहमदशहा अब्दाली आला - त्याचं वर्णन त्यानं स्वत: जिहादअसं केलंय.
            भारतावर आक्रमण करताना अहमदशहा अब्दालीनं सदाशिवराव भाऊंना एक पत्र पाठवलं होतं, ते यापानिपतच्या बखरीतदिलंय. ते अत्यंत उर्मट भाषेतलं, दम देणारं पत्र आहे. त्याचा मतितार्थ आहे की, गपगुमान नर्मदेच्या दक्षिणेकडे निघून जावं. अब्दाली म्हणतो - तो प्रदेश तुम्हाला नेमून दितोय. त्याला सदाशिवराव भाऊंनी पाठवलेलं उत्तरही तितकंच आक्रमक, जबरदस्त आत्मविश्वासानं भरलेलं आहे. भाऊ अब्दालीला म्हणतात, ‘हे हिंदूंची पातशाही, येथील बंदोबस्त करणे तो आम्हीच करावा... तुम्ही नेम करून देणार कोण? आमचे चित्तास येईल ते आम्ही आपले मते करणार. रूमशामची खबर घ्यावी (रोम, सिरिया, काँन्स्टँटिनोपल ऊर्फ इस्तंबूल) तेथे पावेतो मुळुक काबीज करावा हा आमचा हिया. तेथे दुरानी, इरान तो काये? तुम्ही आपल्या वाटे अटक पार करोन भाईचारा रक्षोन माघारा जाणे...’
            अब्दालीला माघारा जाताच आलं नाही पाहिजे, खतमच करून टाकू, म्हणून मराठ्यांनी त्याच्या सैन्याला वळसा घालून अफगाणिस्ताकडची परतीची वाट बंद केली. मराठ्यांची तलवार आधीची ५० वर्षं भारतभर तळपत होती. पराभव माहीत नव्हता. जबरदस्त रग आणि आत्मविश्वास होता.
           
त्याला साजेसा पराक्रम करत पानिपतची लढाई मराठ्यांनी जवळजवळ जिंकली होती. अब्दालीनं आजचा दिवस आपला नाही असं समजून, सैन्य माघारी बोलावण्याचं शिंग फुंकण्याच्याही सूचना दिल्या होत्या. हातातोंडाशी आलेल्या प्रचंड मोठ्या ऐतिहासिक विजयाचं रूपांतर तितक्यात प्रचंड मोठ्या ऐतिहासिक पराभवात झालं. ही पानिपतची लढाई जिंकली असती तर भारताच्या इतिहासाला वेगळं वळण लागलं असतं. भारतीय राष्ट्रीयत्वाचा मध्ययुगातला आविष्कार म्हणजे मराठ्यांचा इतिहास आहे. पानिपतच्या पराभवामुळे सुद्धा भारताच्या इतिहासाला वेगळं वळण लागलं. बंगाल आणि मद्रासमध्ये इंग्रजांना आपलं आसन स्थिर करायला संधी मिळाली. त्याची किंमत भारतानं पुढे दीडशे वर्षं मोजली. काही अर्थांनी आपण अजूनही इंग्रजी राज्यातल्या गुलामीची किंमत मोजतो आहोत.
            या बखरीतून तसा एक बोचरा मुद्दा स्पष्ट व्हायला मदत होते. भाऊंशी मतभेद झाले म्हणून ऐन युद्धाच्या सकाळी मल्हारराव होळकर सैन्य घेऊन बाहेर पडले - असं उलटसुलट बोललं जातं. या बखरीतून खुलासा होतो की मल्हारराव होळकर युद्ध सोडून बाहेर पडले नाहीत, तर दिवसाच्या शेवटाकडे, हातातोंडाशी आलेला विजय पराभवात परावर्तित होतोय हे लक्षात आल्यावर सदाशिवराव भाऊंनी मल्हारराव होळकरांना सांगितलं की बायका-मुलांना सुरक्षितपणे घेऊन तुम्ही इथून बाहेर पडा.
            आणि विश्वासराव पेशव्याच्या मृत्यूमुळे अस्वस्थ झालेले भाऊ हत्तीवरून उतरून घोड्यावर स्वार झाले. गर्दीत घुसले. गर्दीस मिळाले.
            अडीचशे वर्षं लोटली तरी अजून ठसठसत राहणारा पराभव वाट्याला आला.
            अर्थात पानिपत ही एक हरलेली लढाई आहे - मराठे युद्ध हरले नाहीत. इतकंच काय, युद्ध हरला असं म्हणायचं असेल तर तो अब्दाली हरला. लढाईला एक राजकीय उद्दिष्ट असतं. अब्दालीचं उद्दिष्ट होतं मराठ्यांचा पराभव करून, हिंदुस्थानचा बादशहा म्हणून स्वत:चं राज्य स्थापन करणं. तो १४ जानेवारीची लढाई जिंकला. पण त्याची इतकी प्रचंड तबाही झाली की आपल्याला इथे स्थिरावता येणार नाही हे त्याला कळलं. व्यवहारचतुर सेनापतीप्रमाणे तो हाताशी उरलेलं सैन्य घेऊन अफगाणिस्तानात माघारी गेला. (भाऊंनी सांगितल्याप्रमाणे!) त्याचं राजकीय उद्दिष्ट सफल झालं नाही. याउलट मराठ्यांचं राजकीय उद्दिष्ट होतं पातशाहीचं रक्षण करून मराठ्यांचं प्रभुत्व कायम ठेवणं. १४ जानेवारी या दिवशीची लढाई मराठे हरले, तरी परत सावरले. माधवराव पेशव्यानं मराठी दौलत पानिपतच्या पराभवातून पुन्हा उभी केली. महादजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली मराठे १० वर्षांत पुन्हा दिल्लीत पोचले. आणि अनेक दोष, उणिवा (की ज्यांचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास करायला हवा - कितीही वाईट वाटलं तरी) असून सुद्धा आणखी सुमारे अर्धं शतकभर भारताचं सार्वभौमत्व मराठ्यांनी तोलून धरलं.
            तरी पानिपतावरच्या पराभवाचा सल अजूनही कायम आहे. असायला हवा. पानिपताच्या पराभवाची लीगसीअजून संपलेली नाही. स्वतंत्र भारत आपल्या तेजानं तळपेल - पाकिस्तान (किंवा चीन ...) हा भारताला धोका उरणार नाही आणि समृद्ध, समतापूर्ण भारत नव्या जोमानं जगात उभा राहील, तेव्हा म्हणता येईल की पानिपतावरचा पराभव पुसून काढला. स्वातंत्र्यानंतर त्या दिशेनं बरीच वाटचाल झाली आहे. अजून बरीच करायची आहे.

9 comments:

  1. Glad to read your blog article on my book

    ReplyDelete
  2. SIR, EVERYONE HAVE 1 DREAM IN HIS LIFE.BUT SOME TIMES DUE TO FINANCIAL PROBLEM & DUE TO LACK OF GUIDENCE HIS TARGET CAN NOT ACHIEVD.SIR SAME IS HAPPENING WITH ME. WITH FULL HOPE I AM REQUESTING TO YOU SIR WILL YOU GUIDE ME? MAY I BECOME AN IAS OFFICER? PLZ REPLY SIR,I AM WAITING VERY HOPEFULLY.
    AKSHAY BABARAO GADLING
    9175739473
    akshaygadling2015@gmail.com

    ReplyDelete
  3. Sir Hindu Dharm Khatare Me He !

    ReplyDelete