Wednesday, September 10, 2014

जगद्‌गुरु भारताची व्हिजन

लेखांक १२४
...आणि आपण सगळेच


सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य


जगद्‌गुरु भारताची व्हिजन

            एखादी असामान्य मैफल होते, अन् नंतर ती दीर्घ काळ मनात तरळत राहते. एखादं भारावून टाकणारं नाटक किंवा सखोल उतरणारा चित्रपट पाहून आपण बाहेर पडतो, तरी आतमध्ये ते नाट्य, चित्र अजून चालूच असतं. एखादी कविता वाचतो - ती खाली ठेवून शांत बसावंसं वाटतं, नंतर कामांना उठलो तरी कविता मनात रुंजी घालत असते.
            तसं या १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून केलेलं भाषण आहे.
            आता हे ‘डावे’ सेक्युलर, समाजवादी, काँग्रेस, काही पत्रकार वगैरेंना पटणार नाही, ते ठीकाय्, आपण त्यांच्या मताचा सन्मान करूया. काँग्रेसचं म्हणणं आहे, की सगळे आमचेच कार्यक्रम आहेत - मग खरं तुम्ही खूश व्हायला पाहिजे, तक्रार कशाची. दुसरं कुणी म्हणालं, यात काही नवीन नाही. जाऊ द्या, त्यांनी कोणतं तरी दुसरंच भाषण ऐकलं. ‘डाव्या’साम्यवादी नक्सलवादी माओवादी हिंसाचाराचं वेळोवेळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन करणारे एक विचारवंत म्हणाले, मोदी सरकारपासून देशाला धोका आहे.
            ठीक आहे बुवा, त्यांच्या दृष्टीला तसं दिसलं, त्याचाही सन्मान करूया.
            माझ्या दृष्टीला दिसलं, मुदलातच या क्षणांचं ऐतिहासिक मोल –
            स्वतंत्र भारतात लोकांनी बहुमतानं निवडून दिलेलं पहिलं काँग्रेसेतर सरकार, त्याच्या पंतप्रधानांचा पहिला १५ ऑगस्ट - आणि त्या नात्यानं देशाला उद्देशून केलेलं पहिलं भाषण.
            या क्षणांना, या घटनेला ‘बाय डेफिनिशन’ एक ऐतिहासिक मोल आहे.
            त्याची जाणीव असल्यासारखं संपूर्ण देशाचं लक्ष होतं - की आता पंतप्रधान काय सांगतात, काय मांडतात, देशाला कोणती दिशा देतात, कोणता कार्यक्रम देतात - सर्व शब्दांची चिकित्सा करायला मीडिया सुद्धा सुसज्ज होता.
            नरेंद्र मोदींनी एका कृत्यानंच एक मोठा संदेश दिला, माझ्या मनात ही ‘लिटमस् टेस्ट’ होती – अन् एक प्रकारे, जीव मुठीत धरून मी वाट पाहात होतो की पंतप्रधान बुलेटप्रुफ कवचाआडून देशाला निर्भय बनण्याचा संदेश देतात का.
            १९८४ मध्ये इंदिराजींची हत्या झाल्यापासूनचे सर्व पंतप्रधान १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून बुलेटप्रुफ संरक्षक कवचाआडून बोलत आले. मला हे दृश्य लाजिरवाणं वाटत आलंय.
            आपल्याच देशाच्या राजधानीत, आपल्याच स्वतंत्रता दिवसाला, आपल्या देशाचा पंतप्रधान बुलेटप्रुफ कवचाआडून बोलतो, यात देशाच्या आतल्या आणि बाहेरच्या शत्रूंचा केवढा मोठा विजय आहे, आपल्याला ते हसत असतील. तुमच्या देशाचा पंतप्रधानच, १५ ऑगस्टला सुद्धा – लाल किल्ल्यावर सुरक्षित नाही - देश, लोक आणि लोकशाही काय सुरक्षित असणार, वाटणार. देशाचे शत्रू आपल्याला आपल्या भूमीवर लढायला लावतात आणि पंतप्रधानाला ऐन स्वातंत्र्यदिनी सुद्धा बुलेटप्रुफ संरक्षणाआडून बोलायला भाग पाडतो, यात शत्रूंचा ‘स्ट्रेटेजिक’ विजय आहे आणि मनोवैज्ञानिक वरचष्मा आहे. पण हे आपल्या नेत्यांना, पंतप्रधानांना का वाटत नाही, बुलेटप्रुफ कवचाशिवाय सामोरं जाण्याचं धैर्य ते का दाखवत नाहीत - आणि अशी सुरक्षाव्यवस्था आपल्याला साक्षात १५ ऑगस्टला सुद्धा, राजधानीत सुद्धा ठेवता येत नाही का?
            ... हे सगळंच लाजिरवाणं होतं.


            ते वास्तव नरेंद्र मोदींनी त्यांच्या कृतीनं पुसून टाकलं. ते खुल्या आसमंतात बुलेटप्रुफ कवचाशिवाय बोलले.
            मग, आजपर्यंत बहुतेक पंतप्रधान, एक तयार केलेलं लेखी भाषण अत्यंत नीरस, प्रेरणाशून्य पद्धतीनं वाचून दाखवत. ते देशाशी बोलत नव्हते. एक कर्मकांड पार पाडत होते. त्यांची शैली पण नीरस होती, आशय सुद्धा.
            पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ती ‘प्रथा’सुद्धा मोडली. ते हातात तयार ‘स्क्रिप्ट’ न घेता बोलले. समोर कदाचित मुद्द्यांच्या नोट्स् असाव्यात, पण त्यांनी भाषण वाचून दाखवलं नाही. ते देशाशी, लोकांशी बोलले.
            मुद्दा नुसत्या शैलीचा नाही, आशयाचा आहे - हाताशी तयार ‘स्क्रिप्ट’ न घेता बोलण्याच्या कृतीतून आणखी काही महत्त्वाचे अर्थ दिसून येतात. उत्स्फूर्तता, उत्साह, आशयाची निश्चिती, स्पष्टता आणि सर्वांत मुख्य म्हणजे पंतप्रधानांची सरकारवरची पकड.
            मी तुमच्याशी पंतप्रधान म्हणून नाही, प्रधान सेवक या नात्यानं बोलायला आलोय –
            शब्दांचा खेळ? वह भी सही, पण अलिकडच्या वर्षानुवर्षांत कोणत्या पंतप्रधानांनी, आपल्याला या लोकशाही सत्याचं भान असल्याचं बोलून दाखवलंय, ते पण १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर – लोकसभेत पहिल्यांदा पाऊल टाकताना त्या पायरीवर माथा टेकण्याच्या कृतीचं जे प्रतीकात्मक मोल आहे, त्याचंच हे शब्दरूप. स्वत: पंतप्रधानच असं बोलताय्‌त, वागताय्‌त म्हटल्यावर त्यांचं मंत्रीमंडळ, खासदार आणि पक्षातले सहकारी जरा तरी जनाची नाही तर मनाची तरी बाळगण्याची एक शक्यता, एक आशा - अपेक्षा तयार होते.
            पंतप्रधान, देशाचा नेता बोलत असल्यासारखे बोलले – केवळ पक्षाचा किंवा सरकारचा नाही. त्यांचे डोळे, चेहरा, देहबोली यात कुठेही तीन महिन्यांपूर्वी मिळवलेल्या विजयाचा उन्माद नाही, पण जबरदस्त आत्मविश्वास आहे, देशानं टाकलेल्या जबाबदारीचं भान आहे. चुकूनही कुठे पक्षीय अभिनिवेश नाही, राजकीय कोपरखळ्या नाहीत, उलट आधीच्या सर्व सरकार आणि नेत्यांचे आभार आहेत, की, त्यांनी देशाला इथपर्यंत आणलं, आता आपण इथून पुढे नेण्याची जबाबदारी पार पाडूया. त्यांनी अगदी विरोधकांना सुद्धा सहभाग आणि सहकार्याचं आवाहन केलं.
            निवडणुकीच्या काळात जी ‘विकास आणि सुशासना’ची ‘व्हिजन’ त्यांनी मतदारांसमोर मांडली, तिची आणखी काही कार्यक्रमांसहित त्यांनी पुनरुक्ती केली. अगदी काश्मिरमधले दहशतवादी, त्यांना सीमापारचं असलेलं प्रोत्साहन, देशांतर्गत नक्सलवादासहित भारतीय उपखंडातल्या सर्व देशांना त्यांनी विकासाचं, गरीबी दूर करण्याचं आव्हान एकत्रितपणे पेलूया असं आवाहन केलं.
            २०१९ मध्ये गांधीजींची १५० वी जन्मतिथी येतेय, त्यानिमित्त आपण गांधीजींना प्रिय असलेला स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेऊ, त्याची सुरुवात वाराणसीपासून करू, त्यासाठी मला तुमचं सहकार्य हवंय - असं सगळं ते पूर्वी वाराणसीतच बोलले होते. १५ ऑगस्टच्या भाषणात त्यांनी या मुद्द्याची राष्ट्रीय आवृत्ती सांगितली.
            पंतप्रधान टॉयलेट्स्विषयी बोलतात, स्त्रियांशी सन्मानानं वागण्याचे संस्कार घरात मुलांवर व्हायला हवेत असं सांगतात, देश स्वच्छ करायला सर्वांचाच सहभाग हवाय म्हणतात...
            असं देशानी शेवटचं केव्हा ऐकलं , कुणाला आठवतयं.
            इतक्या जमिनीवरच्या मुद्यांबरोबर त्यांनी भांडवल आणि विदेशी-अनिवासी भारतीयांची गुंतवणूक आणून ‘मेक इन इंडिया’ अशी संपत्ती आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणारी दृष्टी मांडली. तर ‘झीरो डिफेक्ट’ अशा भारतीय वस्तू आणि सेवा निर्माण करून ‘मेड इन इंडिया’ ला जागतिक स्थान, बाजारपेठ प्राप्त करून देण्याचं ध्येय मांडलं.
           

१९६० मध्ये जॉन एफ केनेडी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेंव्हा ते राष्ट्र धास्तावलेलं होतं. तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, जागतिक प्रभाव या सर्व बाबतीत साम्यवादी सोवियत रशिया अमेरिकेला मागे टाकून पुढे जातोय, असं चित्र तयार झालं होतं. तेव्हा ‘देशानं तुम्हाला काय दिलं हे विचारण्यापेक्षा, तुम्ही देशाला काय देणार याचा विचार करा.’ असं (JFK च्या ‘स्क्रिप्टरायटर्स’नी जडवलेलं वाक्य) JFK  नी सांगून अमेरिकेत प्राण फुंकले होते.
            नरेंद्र मोदींच्या या भाषणाची तुलना JFK  च्या त्या भाषणाशी होऊ शकेल.
            आणि नेहरुवाद्यांना आवडणार नाही, ते ठीक आहे, आपण त्यांच्या अभिप्रायांचा सन्मान राखू, पण या भाषणाची तुलना नेहरुंच्या ‘नियतीशी करार’ (Tryst with Destiny) भाषणाशी होऊ शकेल.
            एक महत्त्वाचा फरक आहे,
            नेहरु ‘नियतीच्या करार’भाषणाच्या वेळी भारत देश स्वतंत्र होत होता, हाच प्रचंड एकमेवाद्वितीय ऐतिहासिक क्षण होता- त्याला नेहरुंच्या शब्दांनी निखारलं; नरेंद्र मोदींचे शब्द असे ऐतिहासिक ठरणार का, हे इतिहासाचा क्रूर न्यायाधीश ठरवणार आहे. या भाषणातल्या ‘कथनी’ सारखी या सरकारची ‘करनी’झाली, तर हे पहिल्या काँगे्रसेतर सरकारचं ‘नियतीशी करार’ भाषण ठरेल, त्यासाठी अजून खूप लांबचा रस्ता पार व्हायचाय.


2 comments:

  1. अगदी योग्य विश्लेषण ! खरं सांगू साहेब? या आधी खुप पंतप्रधानांचे भाषणे पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न केला. परंतू ते कधीच शक्य झाले नाही. चार पाच मिनिटे झाली की आपोआप हात रिमोटकडे जायचा. झाडून सगळ्या चैनलवर भाषण चालू आहे पाहून शेवटी मनोरंजन वाहिनी पाहिली जायची. या वेळेस प्रथमच पूर्ण भाषण ऐकावेसे वाटले. एकले! खुप समाधान झाले.

    ReplyDelete
  2. सर, मोदींनी १५ ऑगस्टला केलेल्या भाषणातील एका मुद्याचा तुम्ही उल्लेख केला नाही तो म्हणजे दोन खात्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव. खर आहे मोदींच, युपीएच्या काळात दोन मंत्रालयांमध्ये समन्वय तर सोडाच पण एखाद्या योजनेवरुन दोन मंत्रालय एकमेकांविरुद्ध कोर्टात जायचे, त्यामुळे उशीर व्हायचा व योजनेचा खर्च वाढायचा.युपीएत प्रत्येक मंत्रालय स्वतंत्र संस्थान असल्यासारखे वागत होते. याचे एक उदाहरण म्हणजे आदल्याच दिवशी १४ ऑगस्टला संसदेत प्रश्ऩोत्तराच्या तासाला गडकरींनी माहीती दिली की, गेले काही वर्षे जे रस्त्यांचे कामे रखडले होते ते निधीअभावी नव्हे तर इतर मंत्रालयांची मंजुरी न मिळाल्यामुळे झाला, निधीचा तुटवडा नव्हता. गडकरींनी मंत्रीपदी येताच बरेचशे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले.

    ReplyDelete