Friday, November 29, 2013

विक्रमादित्य... णि आपण सगळेच
लेखांक ८८

 
सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य

विक्रमादित्य
सुनील गावसकरनं निवृत्ती जाहीर केली होती तेव्हा जाणकारांनी विचारलं होतं व्हाय?’. गावसकरनं खास गावसकर स्टाईलमध्ये वाक्य उद्धृत केलं होतं It’s better to retire when people ask ‘why’, rather then ‘why not.’
     आयुष्यभर कायम खांद्यावर प्रचंड जबाबदारी घेऊन धीरोदात्तपणे खेळलेला गावसकर निवृत्ती जाहीर केल्यावर एकदम मोकळेपणानं खेळला. अन्‌ न्यूझिलंडविरुद्ध थेट करियरमधलं सर्वांत वेगवान शतक ठोकून गेला. वाटावं की अजून एवढं क्रिकेट शिल्लक आहे त्याच्यात, स्नायू, रिफ्लेक्सेस्‌ काम करतायत, शरीर साथ देतंय, तर गावसकर कशाला निवृत्त होतोय?
     तेंव्हा गावसकरच्या निवृत्तीमुळे भारतीय - आणि जागतिक सुद्धा - क्रिकेटमध्ये कधी न भरून येणारी पोकळी तयार होईल, असं म्हणणार्‍यांना त्यावेळी गावसकरनं सांगितलं होतं, थोडं थांबा, माझ्यापेक्षा चांगला खेळाडू येतोय.
     हे म्हणायला स्वत:बद्दलचा जबरदस्त आत्मविश्वास, गुणांची पारख आणि कमालीची दिलदार वृत्ती लागते. गावसकरकडे हे सगळंच आहे.
     त्यानं एवढ्या भरवशानं ज्याच्याविषयी सांगितलं तो: सचिन तेंडुलकर. १९८९ मध्ये भारताकडून पदार्पण करताना केवळ १५ वर्षं आणि काही दिवसांचा होता. सुमारे पाव शतकापूर्वी गावसकरनं अपेक्षा व्यक्त केली होती की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ हजारपेक्षा रन कमी करून सचिन निवृत्त होता कामा नये. दोन तपांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर (३४/३५ हजार) रन्स करून - आता गाठायला जवळजवळ अशक्य उत्तुंग शिखर निर्माण करून - सचिन थांबतोय. गावसकरनं डॉन ब्रॅडमनचा २९ कसोटी शतकांचा विक्रम मोडताना ३४ शतकांचा विक्रम स्थापित केला. आणि सचिनच्या उदयाच्या वेळी आशा-अपेक्षा-खात्री-विश्वास सारं काही व्यक्त केलं की ३४ कसोटी शतकांचा विक्रम सचिन मोडेल. सचिननं ५१ कसोटी शतकं केली. शिवाय एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९ . २०-२० आणखी वेगळी. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण - क्रिकेटच्या सगळ्या विभागांमध्ये सचिनच्या सर्वांगीण प्रतिभेचा ठसा आहे.
     अजून केवळ १५ वर्षं आणि काही दिवसांचा असताना सचिनचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं पदार्पण आहे. क्रिकेटच्या इतिहासातला सर्वांत लहान खेळाडू हा विक्रम अगदी काही दिवसांनी हुकला. आणि सर्वांत लहान वयात केलेल्या शतकाचा विक्रमही असाच काही दिवसांनी हुकला. एवढं सोडलं तर फलंदाजीतले सर्व प्रकारचे बहुतेक सर्व संभाव्य आणि काही असंभाव्य सुद्धा विक्रम सचिनच्या नावे आहेत.
     तर सचिन अजून १५ वर्षं काही दिवसांचा होता तेव्हा भारताची पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मॅच होती, ती पावसानं धुतली गेली. मॅच आत्ता सुरू होईल, मग सुरू होईल म्हणून आतुरतेनं वाट पाहात प्रेक्षक स्टेडियममध्ये थांबून होते. आंतरराष्ट्रीय सामना अधिकृत ठरायला किमान प्रत्येकी
२५
षटकं व्हावीच लागतात. तर वेळ अशी आली की २०-२० च षटकं होतील. मग दोन्ही संघांनी मिळून ठरवलं की प्रेक्षकांसाठी २०-२० चा अनधिकृतसामना खेळू. पाऊस चालू असताना त्यावेळचा पाकिस्तानचा मॅच विनरलेगस्पिन गोलंदाज, अब्दुल कादिर, सचिनला शोधत भारताच्या ड्रेसिंग रूमकडे आला, वह बंदा है कहॉं, उसके बारे में बहुत सुना है. आणि मग सचिन दिसल्यावर अब्दुल कादिर म्हणाला - तेरे बारे में बहुत सुना है, तेरे में अगर दम है तो मुझे मारके दिखा (ही पाकिस्तानी वृत्ती?) तर अजून मिसरूड न फुटलेला कुरळ्या केसांचा, गोबर्‍या गालांचा सचिन त्याला म्हणाला - आपको कैसे मारेंगे, आप तो बडे भाई है नं - (आणि ही भारतीयवृत्ती?) दोन्ही देशांमध्ये वडीलधार्‍यांचा मान राखणं, त्यांच्यासमोर अदबीनं वागणं हे मूल्य आहेच. तशी संस्कृती दोन्ही देशांची एकच आहे की.
     मग सामना चालू झाल्यावर अब्दुल कादिरच्याच एका ओव्हरच्या दुसर्‍या चेंडूला भारताची विकेट पडली. सचिन मैदानात उतरला. आणि उरलेल्या चेंडूंवर चार दिशांना षट्‌कार. हा सचिन. तपांच्या तपश्चर्येनंतरही तसाच आहे.
     शारजाच्या ऑस्ट्रलियाविरुद्धच्या एका सामन्यात सचिनला कॅस्परोविक्स्‌ गोलंदाजी करत होता. ऑस्ट्रेलियन्स फक्त विजय ओळखतात. विजयासाठीच खेळतात. त्यासाठी वाट्टेल त्या टोकाला जायला तयार असतात. त्यांचं एक मानसशास्त्रीय तंत्र म्हणजे स्लेजिं’ - प्रतिस्पर्ध्याला खचवतील, चिडवतील, राग आणतील असे शब्द वापरणं, कॉमेंट्‌स्‌ टाकणं - कुजकटपणा करणं - की प्रतिस्पर्ध्याची एकाग्रता ढळेल, त्यापायी त्याला आऊट करता येईल. गांगुलीनं हे त्या गोर्‍यांनाजशास तसं सव्याज परत करण्याची पद्धत सुरू केली. सचिनची पद्धत वेगळी होती. कॅस्परोविक्स्‌ एका चेंडूनंतर सचिनच्या अंगावर धावून गेल्यासारखा निम्म्या खेळपट्टीपर्यंत आक्रमकपणे धावून गेला, आणि त्यानं सचिनकडे बघत कारार्थी उद्गार काढला. जेफ बॉयकॉट्‌ आणि गावसकर कॉमेंट्री करत होते. इंग्लिश जंटलमन जेफ्‌ बॉयकॉट्‌ रागानं लालबुंद झाला आणि गावसकरला म्हणाला, सचिननं अंपायरकडे तक्रार करायला पाहिजे, पण तुम्ही भारतीय, ऐकून का घेता? Why do you turn the other check? तर गावसकर हसून अजून म्हणतोय, की सचिन शब्दात नाही, बॅटनं उत्तर देतो - तोवर पुढच्या दोन चेंडूंना दोन षट्‌कार - ते पण थेट समोर - एक लॉग ऑनला, दुसरा लॉग ऑफ्ला. खलास झालेल्या कॅस्परोविक्स्‌नं क्रिकेटच्या इतिहासातला एक सार्वकालिक श्रेष्ठ, वेगवान, ऑस्ट्रेलियन गोलंदाज डेनिस लिलीला विचारलं - मी सचिनला कसा हाताळू? डेनिस लिलीनं सल्ला दिला होता - Take my word, walk out until honour is intact!
     अर्थात २४ वर्षांत असे सततच विक्रम, सततच विजय असं चित्र नाहीये. असूही शकत नाही. तसं मनुष्यजीवन नाही. कोणाही माणसाच्या जीवनातल्याप्रमाणे सचिनलाही सर्व प्रकारचे चढउतार चालावे लागलेच. चँपियनचा खरा दर्जा दिसतो तो केवळ तो सतत आणि किती वेळा जिंकतो, यात नाही, तर प्रत्येक पराभवानंतर तो दुप्पट जिद्दीनं, गुणवत्तेची जोपासना करून, पहिल्यापेक्षा जास्त तयारीनं परततो - तेंव्हा तो चँपियन असतो. तेही सचिननं करून दाखवलं. फॉर्म हरवल्यासारखं दिसत होतं, तेंव्हा जवळच्या मित्रांनी सुद्धा चर्चा चालू केल्या, की सचिननं आता निवृत्त व्हायला हवं - सचिन शोएब अख्तरच्या उसळत्या चेंडूंना घाबरतो - ज्या शोएब अख्तरच्या उसळत्या चेंडूंवरच ऑफ्ला षट्‌कार मारण्याचा नवा चमत्कार सचिननं करून दाखवला - अन्‌ त्यानंतर शोएब अख्तर (क्रिकेटिंग) आयुष्यातनं उठला, तो उठलाच - त्याच्या कॅप्टननं नंतरची ओव्हर टाकायला शोएबकडे चेंडू दिला, तर तो म्हणाला, मुझसे नहीं होगा, मेरे हाथ-पॉंव कांप रहे हैं - त्याला सचिन घाबरतो अशी चर्चा झाली. अशा एका वेळी, पुन्हा एकदा, जेफ बॉयकॉट्‌नंच केलेलं भाष्य मला लक्षात आहे - मला वाटतं ते वाक्य सर्वांनाच प्रेरणादायक आहे - बॉयकॉट्‌ म्हणाला होता, मी सचिनची बॅटिंग पाहतोय, मला त्यात कुठे खोट दिसत नाही, सचिन कमबॅक्‌करेल, कारण Form is temporary – Class is permanent - फॉर्म हरवल्याच्या प्रत्येक वेळी सचिननं द्विशतक किंवा भारताकरता एक अजब ईनिंग खेळून पुनरागमन साजरं केलं. त्या त्या वेळच्या फॉर्मची फार चिंता न करता, आपणही आपापल्या जीवनात सतत क्लास’ - गुणवत्ता, उत्तमतेची : Excellence ची जोपासना करत राहिलो तर जीवन कितीतरी आनंददायी आणि निर्मितीक्षम बनेल.

     अपयश, उणीवा, चुका, टीका... आपल्या सगळ्यांच्याच वाट्याला येते. सचिन माणूसच आहे. त्याची कशी सुटका असेल यातून? क्रिकेटमधली एवढी सर्वश्रेष्ठ बुद्धिमत्ता, समज, प्रतिभा असलेला सचिन भारताचा कप्तान म्हणून मात्र टिकला नाही. खेळाडू सचिनएवढा कप्तान सचिन यशस्वी दिसला नाही - त्याला टीम किंवा पदाधिकार्‍यांचं मिळालेलं - म्हणजे न मिळालेलं - सहकार्य - कदाचित मत्सर, कारणीभूत असेल का, अशी आपली मला एक भारतीयशंका आहे. बहुदा कारकीर्दीच्या एका टप्प्याला सचिननं कप्तानीच्या झमेल्यात न पडता आपल्या खेळावरच एकाग्र होण्याचा निर्णय घेतला असावा. स्पर्धेतला सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून, एका मालिकेत सचिनला फेरारीमिळाली, तेव्हा त्यानं, ती देशात आणताना करात सवलत मिळावी म्हणून मागणी केली होती. किंवा सरकारकडे वरळीला जागा/फ्लॅट सवलतीच्या दरात मिळावा म्हणून अर्ज केला होता. तेव्हा जगातल्या सर्वांत श्रीमंत खेळाडूंमध्ये गणना होणार्‍या सचिननं अशा सवलती का मागाव्यात यावर नाराजीचे सूर उमटले होते. किंवा एवढा श्रीमंत सचिन हॉटेल व्यवसायात पैसे गुंतवतो, पण एखाद्या सामाजिक कार्याच्या पाठीशी उभा राहात नाही - अशीही टीका झालेली आहे. अन्‌ त्यावर खुलासेही झाले, की सचिन हे सर्व, त्याच्या शालीन स्वभावानुसार, पडद्यामागे राहून, गाजावाजा, प्रसिद्धी न करता प्रत्यक्षात करत असतोच.
     तसं या वर्षामध्येच जागतिक - आणि भारतीय क्रिकेट - बदनाम किंवा कानफाट्या पण झालंय. बेटिं, मॅच फिक्सिंगच्या आरोपांनी, शंकांनी क्रिकेटचं क्षितिज काळवंडलंय. त्यातच क्रिकेटमधलं काहीही न समजणार्‍या राजकीय पुढार्‍यांचा वाढता वावर काही विश्वासार्हता वाढवत नाही.
     पण या सर्वाच्या वर उठत, पलिकडे जात सचिनचं क्रिकेटला  आणि त्या माध्यमातून राष्ट्रीय जीवनाला श्रेष्ठ योगदान आहे, हे समजण्याएवढं भारतीय भान प्रगल्भ आहेच. भारतरत्नजादूगार ध्यानचंदसारख्या खेळाडूंनाही मिळायला हवं. पण सचिनला मिळालं हे योग्य आणि उत्तमच झालं. नाहीतर आधी, खेळाडूंना भारतरत्नद्यायचं नाही असं एक अघोषित धोरण होतं. असं का, आणि का नाही द्यायचं, असं कोणी फारसं विचारलं नव्हतं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत क्रीडासंस्कृतीला महत्त्वाचं स्थान नसल्याचाच तो एक प्रकारे पुरावा होता. कुटुंबसंस्था आणि शिक्षणपद्धतीत कायम आधी पोटापाण्याचं बघा, खेळ (आणि गाणीगिणी!) हे फावल्या वेळचे धंदे आहेत, असंच सर्वसाधारण वातावरण आहे. आणि केवळ पुस्तकी अभ्यासात मिळणार्‍या टक्क्यांना बुद्धिमत्ता, करियर समजण्याचा निकष आहे. तर मग या सर्वांतून या १२० कोटींच्या भारतात जगज्जेते खेळाडू तयार होण्याची परंपरा कुठून निर्माण होणार? आणि झालेच, तर ते वैयक्तिक प्रतिभेवर होतात; उलट त्यांना कुटुंब-समाज-शिक्षण-सरकार-राजकारण वगैरे व्यवस्थांशी संघर्ष करतच पुढे सरकावं लागतं. आता सचिन भारतरत्नअसल्याला सरकारमान्यता मिळाल्यामुळे या चित्रात काही फरक पडतो का, बघायचं.
     पडला पाहिजे, असा एक उत्तुंग आदर्श सचिननं जगून दाखवलाय. अजून सोळा वर्षं पूर्ण नसताना सचिनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चालू झाली. सोळाव्या वर्षी अजून शरीराची (मनाची तर सोडाच) वाढ पूर्ण झालेली नसते अशा वेळी सततच प्रचंड दबावाखाली खेळल्यामुळे लवकरच बर्न आऊटझालेले अनेक प्रतिभावंत खेळाडू, टेनिस सकट अनेक खेळांमध्ये दिसून येतात. सचिन या सर्व चढउतारांना २४ वर्षं पुरून उरलाय. या सर्व काळात शरीराच्या रचनेत, स्नायूंच्या-मेंदूच्या कामकाजात फिजिकल, केमिकल बदल होत असतात. त्यानुसार स्वत:त बदल घडवत परफॉर्मन्सटिकवायचा, नव्हे नव्हे वाढवायचा - ही साधी गोष्ट नाही. क्रिकेटमध्ये खेळाडू त्याच्या वयाच्या तिशीच्या आसपास सर्वोच्च क्षमतेला पोचतो, त्यानंतर त्याचे रिफ्लेक्सेस्‌मंदावतात. सचिन ४० व्या वर्षी ७४ धावांची शेवटची ईनिंग खेळताना, क्षेत्ररक्षण करताना अजूनही पीकफिट्‌ वाटत होता. यामागे प्रचंड शिस्त, समर्पण आवश्यक आहे. खाणं-पिणं-उठणं-बसणं-वेळकाळ सर्वांतच शिस्त, संयम बाळगावा लागतो. हे सर्व साधत सचिननं सर्वोच्च मानदंड प्रस्थापित केले. या सर्व काळात चुकूनही सचिनचं नाव कधी गैरप्रकार, बेशिस्त, लफडेबाजी यामध्ये दुरान्वयानं सुद्धा दिसलं नाही. एवढं उत्तुंग यश मिळवूनही सचिन ते कधी डोक्यात गेल्यासारखा वाटला नाही, जमिनीवरून कधी त्याचे पाय सुटले नाहीत. उलट शब्दांपलिकडे जाणारं असामान्य कर्तृत्व करून सुद्धा सचिन कमालीचा सौम्य, सौजन्यपूर्ण - नम्र दिसतो. हे खर्‍या अस्सल मोठेपणाचं लक्षण आहे. शेवटच्या सामन्यापर्यंत सचिन सरावाला नियमित वेळेत येताना दिसला. क्रिकेटच्या इतिहासात सर्वांत जास्त वेळा खोटं / चुकीचं आऊट दिलं जाण्याचा विक्रम सुद्धा बहुदा सचिनच्याच नावे जमा होईल. पण मैदानावर किंवा मैदानाबाहेर सुद्धा कधीही त्याचा तोल गेलेला दिसला नाही. एवढा महान खेळाडू, पण सचिनला नर्व्हस नाईंटीज्‌चा त्रास शेवटपर्यंत सुटला नाही. नव्वदीत २८ वेळा बाद होण्याचा खरोखरच विश्वविक्रम सचिनच्याच नावे आहे. त्यानं सचिन अस्वस्थ होत असलाच पाहिजे. पण त्याची अस्वस्थता कधी खेळात किंवा वागण्यात व्यक्त झाली नाही.
     त्याच शालीनतेनं त्यानं भारतरत्नही धारण केलंय. आपलं भारतरत्न आपल्या आणि भारतातल्या सर्व मातांना अर्पण करून सचिननं आधुनिक भारतीय संस्कृती समृद्ध करून ठेवलीय. तसे काय, विक्रम येतील आणि जातील - पण टेस्ट क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा पहिला खेळाडू जसा कायम गावसकरच असेल, तसा पहिला, सर्वार्थानं, भारतरत्न असलेला विक्रमादित्य सचिनच राहील. त्याच्या निवृत्त होण्यानं पोकळी निर्माण होणार नाही, एवढी ऊर्जा, एवढी प्रेरणा सचिननं आधीच निर्माण करून ठेवलीय.

2 comments:

  1. चँपियनचा खरा दर्जा दिसतो तो केवळ तो सतत आणि किती वेळा जिंकतो, यात नाही, तर प्रत्येक पराभवानंतर तो दुप्पट जिद्दीनं, गुणवत्तेची जोपासना करून, पहिल्यापेक्षा जास्त तयारीनं परततो - तेंव्हा

    ReplyDelete
  2. sir, deshat itaka motha vishay charchila jatoi, aam aadami party ani tyanchi vishwasarhyata aani tikau pana. yabadal tumche vichar aikayla nakki avadel.

    ReplyDelete