Wednesday, March 6, 2013

देश एक कचरापेटी


  ... आणि आपण सगळेच
   लेखांक ५५
 सामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य
      
 
 
देश एक कचरापेटी
अनुपस्थित आत्मभानाचं आर्किटेक्‍चर


       आपल्याकडे नव्या नव्या भव्य वास्तू उभ्या राहताय्‌त. उभ्या रहाताना त्या सुंदर सुव्यवस्थित असतात. आतून बाहेरून उत्तम रंगाचा हात फिरवलेला असतो. पुढे त्याची देखभाल नीट होत नाही. बघता बघता वास्तू कळकटून जाते, रंग उडतो, पोपडे पडतात. जिन्यांमध्ये कचरा साठून रहातो. पचापचा थुंकलेल्या भिंती भरून जातात. घाण वास भरून रहातो. शहरांचे चेहरे काळवंडून जातात.
      मला त्यात दिसत आलंय भव्य भारतीय संस्कृतीचंच रूपक. निर्मितीच्या अभिजात कालखंडात भव्य आणि सुंदर : एक सद् विप्रा: बहुधा वदन्ति - सत्य एक आहे, जाणकार त्याला विविध नावांनी ओळखतात - असं दिव्य आर्किटेक्चर. पण पुढे देखभाल नाही, नवे नवे भाडेकरू येत-जात राहिले. मग काही घुसखोर, काही आक्रमक. कळकटून, काळवंडून गेली वास्तू. इतकी की कधीकाळी ती भव्य आणि सुंदर होती हेच अनेकांना पटत नाही.
      त्यामुळे झालाय देश एक कचरापेटी.
      आपणच करून ठेवलीय.
      नेमाडेंना वाटते समृद्ध अडगळ!
      रत्नागिरीचा एक कार्यक्रम.
      सर्व पक्ष आणि अनेक शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन केलेला. कोकण बदलतंय, कोकणचा माणूस बदलतोय याची प्रचीती देणारा.

      तो संपवून परत येण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आलेलो. सोबत सोडायला आलेली बुद्धिमान सुंदर माणसं. गाडीला वेळ होता आणि दर दहा मिनिटांना आणखी दहा मिनिटांचा उशीर होत होता. एरवी त्याचा वैताग वाटलाही असता. पण बुद्धिमान, विचारी, स्वतंत्र वृत्तीच्या माणसांशी होणार्‍या संवादाच्या सुखात तो वैताग विरून जात होता. शिवाय भोवती निसर्गसौंदर्याची लयलूट असलेलं कोकण. ते सौंदर्य आणखी खुलेल अशा रितीनं रेल्वे स्टेशनची रचना केलेली. त्यातही स्वतंत्र प्रतिभा कळत होती. नाहीतर आपल्याकडे अनेक वास्तू - विशेषत: सरकारी - इतक्या ओबडधोबड आणि निर्बुद्ध असतात; नुसत्या उभ्या-आडव्या रेघोट्या ओढलेल्या. त्यांचं चरित्रच हरवलेलं असतं. पण कोकण रेल्वेची स्टेशन्स तशी नाहीत. भारताच्या आध्यात्मिक वारशाचं भान असलेल्या ई. श्रीधरन्‌ यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेची कलाकृती अवतरलीय म्हणून तर ही सर्व एकसंधता साधली नसेल ना असाही विचार करत होतो. १00% भारतीय भांडवल, भारतीय तंत्रज्ञान यासहित वेळेत नव्हे, तर वेळेपूर्वी पूर्ण झालेला स्वतंत्र भारतातला जागतिक दर्जाचा एकमेव प्रकल्प. त्या प्रकल्पात भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा नाहीत. पण म्हणजे भारताकडे ही क्षमता आहे एवढा तर आत्मविश्वास देणारा आदर्श आहे.
      असा आनंद अनुभवत दृष्टीचा कॅमेरा कोकणचा लॉंगशॉट घेऊन रेल्वे ट्रॅकवर आला आणि सावकाश पॅनहोत प्लॅटफॉर्मच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरला. दिसल्या सर्वत्र फेकून दिलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, वेफर्सची पाकिटं, सिग्रेटची थोटकं, गुटक्याच्या पाकिटांची फोलपटं, फेकून दिलेलं अन्न, पचापचा थुंकलेल्या पानांच्या पिचकार्‍या... वास मारणारी अदाकारी...
      देश एक कचरापेटी.
     आपल्याला आपल्याच प्रदेशाबद्दल खरी आपुलकी नाही. असती तर अशी घाण करत फिरले नसते सगळे. स्वच्छतागृहं घाण. त्यांच्या मावा-पान-तंबाखूच्या घाणींनी तुंबलेली, नळ तुटलेले, सांडपाणी वाहतंय, दिवे फुटलेले किंवा चोरलेले. सगळा बापाचा माल.
      We don’t care for our country - हेच खरंय. आपली जमीन, पाणी, इतिहास, लोक, संस्कृती आपलेआहेत हे मनात पटलं असतं, तसं जगण्या-वागण्या-बोलण्यात आलं असतं तर आपण असे देश एक कचरापेटीकरून ठेवणारं वागलो नसतो.
      जो उठतो तो वाट्टेल तिथे पचापचा थुंकतो. पान-तंबाखू-मावाची गोळी गालफडात लावण्याची थोरामोठ्यांनी जोपासलेली आपली राष्ट्रीय सवय! त्याचं शास्त्र सांगतं की लाळ साठत जाते तोंडात, ती गिळायची नसते. मग दोनच पर्याय : लाळ गाळायची किंवा पचापचा थुंकायचं. बघता बघता ती सवय रोजच्या जगण्यातही रूपांतरित होते. काही जणांसमोर लाळ गाळायची, उरलेल्यांवर पचापचा थुंकायचं. देश एक कचरापेटी. थुंकणे - राष्ट्रीय छंद.
      टॉयलेटमधे तंबाखूचा तोबरा थुंकायचा. सगळं टॉयलेट तुंबतं. घाण वास मारायला लागतो. सगळ्यांनाच त्रास. पण थुंकणार्‍याची अक्कल त्या तंबाखूबरोबर त्याच टॉयलेटमधे गेलेली असते. मला तर असं वागणारा काय विचार करतो तेच कळत नाही. अविचारच करतो. बहुधा त्याला वाटतं आपण एक मिनिटांत इथून जाणार. असाच विचार प्रत्येक जण करतो. परिणामी घाण/त्रास सर्वांनाच. पण कुणालाच काही देणं-घेणं नाही. इतरांचा विचार डोक्यात येत असेल तर त्याला समाज म्हणतात.
      मी जर दुचाकी वाहनावरून जात असलो तर बसच्या शेजारनं जाणं टाळतोच. मान वळवून खिडकीतून पच्‌कन्‌ कोण केव्हा थुंकेल याचा नेम नाही. दरवेळी बसला आपली दुचाकी आडवी घालून बसमधे घुसून त्या थुंकणार्‍याला थोबाडायला वेळ नसतो आपल्याकडे. बरं, दुसर्‍या दुचाक्यांवरूनही पुढे चाललेला कोण केव्हा वेग तसाच ठेवून थोबाड वळवून थुंकेल याची शाश्वती नाही. त्याचं कारंजं मागनं येणार्‍यावर तुषार उडवतं. सिग्रेट ओढणारा दुसर्‍याच्या तोंडावर धूर सोडतो, वाट्टेल तिथे थोटकं टाकतो. असं करणार्‍याला अडवलं की थुंकणाराच उर्मटपणा करतो. बहुधा त्याला म्हणायचं असतं थुंकणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी बजावणारच’ - लोकमान्य टिळक भरून पावले. खरं तर कायद्यात सार्वजनिक जागी थुंकणे किंवा धूम्रपान करणे निदान गुन्हा तरी ठरवण्यात आलाय. त्याबद्दल दंडाची तरतूद आहे. तेवढा दंड नीट वसूल झाला तर विकास योजनांना निधी कधीही अपुरा पडणार नाही! तुटीचं अंदाजपत्रक करण्याची वेळ येणार नाही!
      गांधीजी किती दूरदृष्टीचे! त्यांनी आपली राष्ट्रीय सवय लक्षात घेऊनच विधान केलं होतं सारे भारतीय एका वेळी थुंकले, तरी तयार होणार्‍या महासागरात गोरा राज्यकर्ता वाहून जाईल’. अवघड मुद्दे सोपे करून सोप्या शब्दात सांगत समाजाला कृतीची दिशा देणार्‍या गांधीजींना एवढं मात्र कळलं नव्हतं की सर्वांनी मिळून एका वेळी एक समान कृत्य करणं याला राष्ट्रम्हणतात. तर आपण एका वेळी थुंकणार तरी कसे? कायदा करून काय होणार? थुंकण्या, धूम्रपान करण्याबाबत कायदा आहे म्हणून काय सांगताय राव? कायदा काय स्त्रियांना न्याय मिळण्याबाबत आहे, जातीपाती न पाळण्याबद्दल आहे. पण म्हणून काय झालं? कायदा काय पाळण्यासाठी असतो? आपल्या थोर राष्ट्रपिता गांधीजींनीच नाही का शिकवलं आपल्याला कायदेभंग करायला! स्वातंत्र्यपूर्व काळात तो सविनयहोता कारण परक्या गोर्‍या साहेबाचं राज्य होतं. आता सविनयची गरज उरली नाही, राज्य आपल्या बापाचंच आहे, आता उर्मटपणाच करायचा असतो. सिग्नल हे तोडण्यासाठीच असतात. कायदे मोडण्यासाठी. कर न भरण्यासाठी असतात आणि सरकारी कर्ज कधी फेडायचंच नसतं, बुडवायचं असतं. मतदान कर्तव्य भावनेनं करायचं नसतं - तो सुट्टीचा दिवस असतो. ड्यूटी नीट करायची नसते, पण पगार, सुट्ट्या, टीएडीए, पगारवाढी वगैरेसाठी आंदोलनं मात्र करायची असतात.
      मागे राजीव गांधींनी कोलकाता एक प्रचंड कचरापेटी झालीय, कोलकाता खचत चाललंय... अशा अर्थाचं विधान केलं होतं. बंगाली बाबू नाराज झाला, कॉंग्रेसचा कोलकात्यात पराभव झाला. मुंबईबद्दल हे विधान कुणी करायची सुद्धा गरज नाही इतकं ते उघड आहे. शरद पवार म्हणाले होते मुंबई विमानतळाचा एस्‌.टी. स्टॅण्डझालाय. (घाण, बेशिस्त, गर्दी, अव्यवस्थापन सांगण्याची उपमा? एस्‌.टी. स्टॅण्ड) शशी थरूर तर विमानालाच जनावर संवर्गात नेऊन ठेवतात. जयराम रमेश म्हणाले मंदिरांपेक्षा टॉयलेट्‌स्‌ बांधणं जास्त महत्त्वाचं आहे, तर काही सांस्कृतिक बुजुर्गांना राग आला होता. गांधीजींनी गावाचं उदात्तीकरण करून त्यांचं ग्रामस्वराज्यसांगितलं. तर आंबेडकरांनी त्याच गावांना दलितांना दाबून ठेवण्याची व्यवस्था ठरवत शहारांकडचा मुक्‍तीचा मार्ग दाखवला. तेव्हा आंबेडकरांनी गावाचं वर्णन शेणाचे ढिगारेअसं केलं होतं. ते वस्तुस्थितीला धरून होतं हे दुर्दैवानं आजही खरंय. गांधीजींना ती वस्तुस्थितीच बदलायची होती. पण गांधीजींसकट सर्व संस्कृतीचा पराभव करण्याइतके प्रबळ बनलोत आपण.
      आपलं असलेलं वैभव आपण नीट सांभाळत नाही. नद्यांचं व्यवस्थापन नीट नाही. ज्याला जमेल तो ओरबाडण्यात मशगुल. पचापचा थुंकण्याचा रोग लागलेली संस्कृती स्वत:वरच थुंकतेय, इतरांवर, स्त्रियांवर, चांगल्या कामांवर...
      भौतिक, नैतिक, वैचारिक घाण करायची सर्वांनीच
      स्वच्छ कोण करणार?
      सरकार
      की ब्रह्मदेवाचा बाप..

1 comment:

  1. sir mla asa watat ki jo paryant manasala swatachya chukichi janiv hot nhi to paryant tyala apn sudharl pahije he kalat nhi pn tyala jevha asa watat tevha wel geleli asate. mag hi durdrushti kadhi yenar apnat...........ase jevha hoel tevhach samaj badlel ani desh sudha. ani hya saglyachi suruwat pratekane swata pasun karaila have.

    ReplyDelete