...आणि आपण सगळेच
लेखांक ५३ |
सामान्य
नागरिकांच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य
हरवलेले आत्मभान
दीर्घकाळचा मुंबईकर
रहिवासीही सांगतो की आत्तासारखी थंडी बारा वर्षांत अनुभवली नव्हती.
पॅसिफिकच्या किनार्यावरच्या काही गावांमध्ये
वावरताना, निळाशार महासागर - काठावरची उत्साह देणारी थंड हवा उरात
भरून घेताना मला वाटलेलं आहे की मुंबई-कोलकाता-चेन्नई - एकूणच भारतातलं हवामान
उष्ण आहे, दमछाक करणारं आहे - राजकीय-सामाजिक व्यवस्थाही दमछाक करणारी
आहे.
पण त्यातही मुंबई जास्त. उष्णता, आर्द्रता, धूळ, आवाज... सकाळी घातलेला
पांढरा शुभ्र शर्ट संध्याकाळपर्यंत घामानं चिंब आणि प्रदूषणानं काळवंडलेला असतो.
एक कोटीहून जास्त माणसं या महानगरात पोटापाण्यासाठी दिवस-रात्र धावत असतात.
भारतातल्या १२१ कोटींचाच एक तुकडा.
भूगोलाचा मनुष्यस्वभावाच्या जडणघडणीवर प्रभाव
पडतो आणि या दोन्हीच्या क्रियाप्रक्रियांमधून इतिहास-वर्तमान आकाराला येतो.
***
तर सध्या मुंबईच्या हवेत आल्हाददायक गारवा
आहे. या काळात दरवर्षी - रोहित पक्षी - फ्लेमिंगोज् मुंबईत उतरतात, शिवडीजवळ. तो
फ्लेमिंगोज्चा नजारा पाहायला आम्ही गेलो होतो - आम्ही म्हणजे सपत्निक. पहिल्यांदा
जाताना जेट्टीची वाट शोधत, विचारत जावं लागलं. भारतात GPS, गुगल्-अॅपल् वगैरे अॅप्स
पराभूत होतात. ‘ह्यूमिंट’ ह्यूमन इंटेलिजन्स् - काम करतो. विचारलं की
माणसं बरोबर सांगतात. पण त्यांना फ्लेमिंगोज् किंवा रोहित म्हटल्यानं काही लक्षात
येत नाही, ‘चिडिया देखने आए हो?’ असं विचारतात. पहिल्या पहिल्यांदा आपल्याला त्रास होतो. मग
सवय होते. ‘अच्छा चिडिया’ असं आपणही म्हणतो
तेव्हा ‘एस्थेटिक सेन्स्’च्या पतनाला सुरुवात
झालेली असते.
इथपासूनच मला समकालीन भारतीय संस्कृतीच्या
वास्तवाचं रूपक वाटणं चालू झालेलं असतं. आत्मभान हरवलेलं असल्यामुळे आपल्याच रोहित
पक्ष्यांच्या भव्य गुलाबी कमालीच्या सुंदर थव्याला आपण ‘चिडिया’ म्हणून निकालात काढतो
आहोत. म्हणजे चिडियाही काही कमी महत्त्वाची किंवा कमी सुंदर नाही. पण फ्लेमिंगो
म्हणजे चिडिया नव्हे. पण आत्मभान हरवलं की त्याबरोबर सौंदर्यदृष्टी सुद्धा हरवलेली
असते.
शिवडी जेट्टीकडे जाण्याचा रस्ताही खराब.
कमालीच्या अस्वच्छतेनं भरलेला. शहर म्हणजे एक अजस्त्र कचरापेटी झालीय असं वाटावं
इतकी अस्वच्छता. तिच्यात सहजपणे वावरणारी गरीब वस्ती. तेलकट काळवंडलेल्या ट्रक्स्, मोडकी तोडकी वाहनं.
काय करणार भौ. आधी एक कोटीवर माणसांना जगायचंय, नंतर तुमचे पक्षी, सौंदर्यदृष्टी, आत्मभान वगैरे. जगणं -
सर्व्हायव्हल् - हेच आद्य आणि अंतिम आत्मभान आहे.
शांतिनिकेतनमध्ये गुरुदेव टागोर आणि
गांधीजींची भेट झाली होती. शांतिनिकेतनचा परिसर, वाहणारी विशाल गंगा, सायंकाळी पक्षी घराकडे
परतत होते. गुरुदेवांनी गांधीजींना विचारलं, ‘तुमच्या तत्त्वज्ञानात
उडणार्या, गाणार्या पक्ष्यांना स्थान आहे का?’ गांधीजींनी उत्तर दिलं
होतं,
‘आहे ना, पण उडण्या-गाण्यासाठी
आधी त्यांचं पोट भरलेलं पाहिजे याची चिंता माझं तत्त्वज्ञान आधी करतं.’
सगळी गर्दी, चिकचीक, खड्डेखुड्डे पार करून
किनार्यावर पोचलो की हजारो फ्लेमिंगोज्चा थवा सामोरा येतो. त्यांच्या आकारांची ‘सिमेट्री’, रचनेतला ‘बॅलन्स्’, गुलाबी पंख. लांबलचक
डौलदार माना... हजारो फ्लेमिंगोज् एकावेळी उडाले तर आकाश भरून टाकतात. दृश्यं
आपल्याला भारून टाकतात. किनार्यावर मोडकीतोडकी जहाजं, बोटी वेड्यावाकड्या
अस्ताव्यस्त नांगरून पडलेल्या. वंगणाचा काळाशार तवंग किनार्यावर दूरवर पसरलेला.
तिथेच कुठेतरी कदाचित ड्रेनेजही समुद्राला येऊन मिळत असावं, कारण सर्वत्र दुर्गंधी
भरलेली - आणि हजारो फ्लेमिंगोज्ची नजरेचं पारणं फेडणारी, नजरेत न मावणारी
कलाकारी.
पुन्हा : भारतीय संस्कृतीचंच समकालीन वास्तव.
आपल्या असामान्य शक्तीचं आपल्याला भान नाही, कदरही नाही.
नायगारा धबधब्याचा नजारा पाहताना मला वाटलं
होतं की निसर्गाचा चमत्कार तर अद्भुत आहेच, पण मानवनिर्मित
कर्तृत्वानंही त्या नजार्याला असं काही कोंदण निर्माण करून दिलंय की दोन्हीच्या
गुणाकारातून भव्य संस्कृती
आकाराला आलीय. भारतातही सर्वत्र निसर्गाचे अद्भुत चमत्कार आहेत, पण आपण अजून त्यांना
सुसंघटित मानवनिर्मित कोंदणात बसवलेलं नाही. आपण अजून ओळखलेलंच नाही स्वत:ला.
शिवडी जेट्टीवरही फ्लेमिंगोज्ना पाहायला तशी
माणसांची फारशी गर्दी नसते. गर्दीचा जीवनसंघर्ष जारी असतो.
***
एकीकडे एका घटकाचा विकासही वेगानं होतोय. नवी
टोलेजंग बांधकामं उभी राहताय्त. अमेरिकन जीवनमान जगू शकणारा, अमेरिका, युरोप आणि अन्य विकसित
देशांच्या मध्यमवर्गीयांच्या तोडीस तोड एक भारतीय मध्यमवर्गही तयार झालाय. ‘लोअर परेल’ची ‘अपर वरळी’ झालीय. १९८२ मध्ये
सुरू झालेल्या दत्ता सामंत प्रणीत संपापासून संपत गेलेला कामगार वर्ग तर
देशोधडीला लागला. गावाकडे परतून शेती करायला ज्यांच्याकडे जमिनी नव्हत्या
त्यांच्या पोरीबाळींना ‘लेडीज् बार’मध्ये रोजगाराची हमी
मिळायला लागली. बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमिनींचा प्रश्न नीट हाताळण्याऐवजी
सरकारनं सोयीस्कर विलंब केला. त्या जागांवर आलिशान, टोलेजंग इमारतींसहित
अय्याशीच्या जागा उभ्या राहिल्या. बंद पडलेल्या गिरणीच्या जागी ‘बोलिंग अॅली’ तयार झाली. तिच्या
दारात शोभेची वस्तू म्हणून ‘पॉवरलूम’ ठेवण्यात आला. शेजारी
शोपीस म्हणून एखाद्या कामगाराचा सांगाडाही शोभला असता. आता या आठवड्यात
घाटकोपर-चेंबूर मार्गावर मोनोरेलची यशस्वी चाचणी झाली.
१५ ऑगस्टपासून मोनोरेल
धावेल,
भारतातली
पहिली. मग मुंबईची मेट्रोसुद्धा. बांद्रा-वरळी ‘सी लिंक’ झाला, आता पुढे तो हाजी अली, नंतर नरीमन
पॉईंटपर्यंत सुद्धा होईल. प्रचंड भ्रष्टाचारातून उभा राहणारा मुंबईचा नवा
विस्तारित विमानतळ सुद्धा होईल, मग जलवाहतुकीसाठी हॉवरक्रॉफ्टस्, उद्योगपतींची ट्रॅफिक
जॅममधून सुटका करण्यासाठी इमारतींच्या डोक्यावर हेलिपॅड्स् आणि हेलिकॉप्टर्स.
गेटवे ऑफ इंडियापासून समुद्राच्या पोटातून उरण-अलिबागकडे रस्ता. ‘सामना’ चित्रपटातला मास्तर
हिंदुराव धोंडे - पाटलाला म्हणतो तसं ‘ऐकूनच गरगरायला होतं’. आत्तासुद्धा
बांद्रा-कुर्ला कॉम्प्सेक्समध्ये गेलं तर कुर्ला-धारावीचा विसर पडायला होतं. जगातल्या
कुठल्या तरी विकसित देशाच्या फोटोत शिरल्यासारखं वाटतं.
विकास हवाच. परिवर्तनही कोणी हवं-नको
म्हटल्यानं थांबत नाही. पण त्याचं ‘कॅरॅक्टर’ हरवलंय. कारण तो विकास
किंवा परिवर्तन आपल्या आतल्या शक्तीतून उत्स्फूर्तपणे उमलून येत नाहीये, बाहेरून कृत्रिमरित्या
चिकटवलेल्या प्रमाणहीन आकारासारखा ओबडधोबड विकास होतोय. उभ्या राहणार्या वास्तू, विमानतळांना
प्रतिभासंपन्न सौंदर्यदृष्टीचं ‘चरित्र’ लाभत नाही, नुसत्या ठोकळेबाज
आडव्या तिडव्या रेघांचे बोचरे कंगोरे उभे राहतात. उभ्या राहताना तात्पुरत्या तरी
नव्या वास्तू छान वाटतात. बघता बघता त्या कळकटून जातात. त्यांच्या देखभालीची काही
व्यवस्था नाही. मुंबईच्या डी.सी. रूल्समध्ये वास्तूंची बाहेरून नियमित रंगरंगोटी
आणि देखभाल करण्याविषयी नियमच नाहीत. बघता बघता रंग उडून जातात, वास्तू काळवंडतात, पोपडे पडतात, आत राहणारे लोक
आपापल्या घरांची काळजी घेतात, पण संपूर्ण वास्तूची काळजी घेण्याची ‘व्यवस्था’च उभी राहात नाही. मूळ
वास्तू उभी करणारा त्याचा नफा घेऊन निघून गेलेला असतो. आता उरते फाटाफूट, ताटातूट, काळवंडलेल्या भिंती.
पुन्हा भारतीय संस्कृतीच्या समकालीन
वास्तवाचंच रूपक. मूळ भव्य, प्रतिभासंपन्न संस्कृतीला आलेलं कळकट रूप.
आत्मभान हरवलेलं.
No comments:
Post a Comment