Thursday, December 11, 2014



कार्यकर्ता अधिकारी :-1

जगण्यातच एवढा गढून गेलो होतो की लिहिण्याचं राहूनच गेलं, आत्तापर्यंत तरी.
1 मार्च 1996 अजून कालच्यासारखा किंवा कदाचित कालच्यापेक्षा जास्त ठळकपणे आठवतो मला. IAS मधून राजीनामा या तारखेपासून लागू झाला. तेंव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा उपसचिव या नात्यानं मुंबई, मंत्रालयातल्या ‘सहाव्या स्वर्गामध्ये’ वावरत होतो. IAS ची नवसा-सायासानं प्राप्त होणारी नोकरी, त्यातही मुख्यमंत्री कार्यालयाची जबाबदारी - असं काहीतरी माणूस आपण होऊन सोडतो, तर सर्वांना वाटलं, काहीतरी बिनसलं असणार, काहीतरी... भ्रष्टाचार, राजकीय ढवळाढवळ, सदसद्विवेकबुद्धीला न पटणारे निर्णय घेण्याचे दबाव... वगैरे वगैरे... म्हणून दिला असणार राजीनामा... असं अनेकांनी गृहीतच धरलं, अजूनही धरतात.
पण असं काही नव्हतं. नव्हतं, म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेत, भ्रष्ट, राजकीय-प्रशासकीय दबाव, अकार्यक्षमता, संवेदनशीलतेचा अभाव... असं सगळं तेव्हाही होतं, आजही आहे (आपण काय इतका सहजासहजी बदलणारा समाज आहोत काय! अरे भले भले संत समाजसुधारक इथे छाती फुटून मेले, पण आमच्या ‘व्यवस्थे’चा टवका सुद्धा उडाला नाही, तर हा अविनाश धर्माधिकारी कोण लागून गेला, समजतो काय स्वत:ला हा!) पण माझ्या राजीनाम्याचं ते कारण नव्हतं. प्रशासनातली माझी 10 वर्षं, मुख्यत: आनंदात, समरसून कर्तव्य करत पार पडली. न मागता एकाहून एक उत्तम पदं, कामाच्या संधी मला मिळत गेल्या. वैयक्तिक पातळीवर कोणतंच दु:ख, निराशा, वैताग, वंचना, निषेध... हे काही माझ्या राजीनाम्याचं कारण नाही.
एक स्वत:शी केलेला करार होता : सर्व आयुष्य शासकीय सेवेत काढणार नाही. प्रशासनात राजीनाम्याच्या 10 वर्षं आधी, 1986 मध्ये शिरतानाच, सर्व समाजाला वादा केला होता, की IAS मध्ये निवड झालीय, तर प्रशासनात शिरून काम करेन, देश कसा चालतो ते आतून समजावून घेईन, राज्यघटना-कायदे-विधिमंडळ-राजकारण-जनता असे सगळे अनुबंध शिकून घेईन, पण आयुष्यभर त्या चौकटीत बसणार नाही. मूळ योजना होती, कलेक्टरशिप करून राजीनामा देण्याची. कलेक्टर - कारण जिल्हा हे अजूनही देशाचं छोटं, पण संपूर्ण रूप आहे. एकदा जिल्हाधिकारी पदावरून प्रशासन सांभाळलं की देश समजायला, आवाका तयार व्हायला मदत होते. मला तर मिळाला, रायगड जिल्हा : ‘हिंदवी स्वराज्या’ची राजधानी! न मागता मिळणारं वरदान ते याहून मोठं कोणतं असू शकतं? आता इथे उत्तम काम करून स्वच्छ आणि कार्यक्षम असं लोकभिमुख प्रशासन असू शकतं, असं आपण दाखवून देऊ - म्हणून काम करत असतानाच मार्च 1995 मध्ये महाराष्ट्रात सत्ताबदल झाला. नव्या मुख्यमंत्र्यांनी मला मुख्यमंत्री कार्यालयाची जबाबदारी सांभाळायला बोलावून घेतलं - न मागता. ही शिकण्याची केवढी मोठी संधी, हा व्यक्त केलेला केवढा मोठा विश्‍वास! अन् त्याहून सर्वांत महत्त्वाचं, म्हणजे संधी किंवा विश्‍वासापेक्षा, ही केवढी मोठी जबाबदारी!
प्रशासकीय सेवेच्या 10 वर्षांमध्ये मी भाग्यवान असलो पाहिजे. सेवेच्या 5 व्या वर्षात, पहिल्याच पदोन्नतीच्या वेळी, थेट राज्याच्या मुख्य सचिवांनी मला उचलून घेतलं, मुख्य सचिव कार्यालयाची जबाबदारी सांभाळायला - म्हणजे सेवेच्या 5 व्या वर्षी महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेच्या सर्वोच्च पदामागे बसून मला शिकता आलं, संपूर्ण राज्याचा कारभार - सर्व खाती, सर्व जिल्हे, सर्व कायदे, कार्यपद्धतीचा आवाका समजावून घेता आला. तर सेवेच्या 10 व्या वर्षी राज्याच्या सर्वोच्च राजकीय पदाच्या - मुख्यमंत्र्यांच्या - मागे बसून राज्य, देश आणि जगाकडे पाहता आलं.
खूप समृद्ध झालो.
कोणत्याही नकारात्मक, निराशा-निषेधातून मी राजीनामा देण्याचं काहीच कारण नाही. अशा राजीनाम्याला उलट मी सुद्धा, लढाई सोडून पळ काढणं म्हणेन - सेवेतल्या भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, वशिलेबाजी वगैरेशी पाय रोवून लढलं पाहिजे. लढता येतं. जिंकता येतं. बदल घडवता येतो. माझ्या परीनं ते 10 वर्षं करून पुढच्या कामासाठी मोकळं व्हावं म्हणून, स्वत:शी समाजाशी ठरलेल्या करारानुसार राजीनामा दिला. माझा राजीनामा हे शासकीय सेवेला दिलेलं ‘निगेटिव्ह व्होट’ नाही. उलट आजही प्रशासन हे देशसेवेचं, परिवर्तनाचं, लोकसेवेचं माध्यम आहे, राष्ट्रीय एकात्मता आणि विकास यांना गती देण्याचं साधन आहे, या जाणीवेतूनच माझं काम चालू आहे.
आयुष्याचा एक टप्पा पूर्ण झाला, आता पुढच्या टप्प्यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य हवं, वेळेच्या भाषेत मोकळीक हवी, म्हणून, आधी रजा घेऊन, सपत्निक, हिमालयात गेलो. सर्व संभाव्य धोके नीट लक्षात घेऊन, विचार करून, हिमालयातून मंत्रालयात परतून, मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यांनी प्रशासनातच थांबण्याची सूचना केली, पण मी पुढच्या योजना सांगितल्यावर, त्यांनी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
1 मार्च 1996 ला IAS मधून मुक्त झालो.
आणि चाणक्य मंडल परिवारचं शैक्षणिक काम, लेखन-वाचन, आंदोलनं, चळवळी, सभा-संमेलनं, निवडणुका, प्रवास... अशा सगळ्या उचापत्यांमध्ये एवढी वर्षं व्यतीत झाली. प्रशासकीय सेवेसंबंधी चाणक्य मंडल परिवारमधल्या तासांना किंवा समाजाला कधी कधी काही काही प्रसंग, किस्से सांगत आलो. पण एकत्र सुसंगतपणे सांगण्याचं आजवर राहून गेलं होतं. जगता जगता लिहायचं राहून गेलं, आजवर.
आता लिहायला बसलो तर आजही 1 मार्च 1996, कालच्यासारखा आठवतो. काळाच्या कोणत्याही एका क्षणामध्ये, अवकाशाच्या कोणत्याही एका कणामध्ये सगळं विश्‍व सामावलेलं असतंच. आठवणींच्या अशा तीव्र, सूक्ष्म काल-अवकाशामध्ये त्याआधीची - प्राशसकीय सेवेतली - 10 वर्षं सुद्धा सामावलेली असतात. ‘कार्यकर्ता अधिकारी’ म्हणून काम करण्याची 10 वर्षं.
( To be continued. Should it be? )