Wednesday, February 27, 2013

मराठी दिवस


    
... आणि आपण सगळेच

लेखांक ५४
 सामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य



मराठी दिवस
     गेल्या काही काळात महाराष्ट्र सरकारच्या खात्यावर पुण्यतसं कमीच जमा आहे. पण त्यात महाराष्ट्र सरकारनं केलेलं एक पुण्यकर्म म्हणजे कविकुलगुरु कुसुमाग्रजांची जन्मतिथी, २७ फेब्रुवारी, ‘मराठी दिवसम्हणून जाहीर करणे. कुसुमाग्रजांची स्मृती जतन केली जाईल, एवढं सोडलं तर वेगळा आणखी मराठी दिवसम्हणजे काय? दिवसच काय, मराठी महिना आहे, मराठी वर्ष आहे, मराठी भारतवर्ष आहे आणि मराठी विश्वही आहे.
    म्हणजे, असायला हवं.
    पण आज तसं असल्याचं चित्र नाही.
    उलट महाराष्ट्राचं, मराठी चित्र फारच फुटलेलं, विस्कटलेलं दिसतंय. ज्या महाराष्ट्रानं संपूर्ण देशाचं - आता तर जगाचं मूलभूत चिंतन मांडायला हवं, कृतीशीलपणे, तो महाराष्ट्रच आता स्वत:विरुद्ध फुटल्यासारखा झालाय. आणि ज्या मराठी भाषेतून जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधली उत्तुंग प्रतिभा फुलून यायला हवीय, त्या मराठी भाषेची महाराष्ट्रातच पीछेहाट चालू आहे.
    आपल्या या महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणात इंग्लिश सक्तीचं आहे, पण मराठी मात्र सक्तीची नाही. सक्ती का करायला लागावी? महाराष्ट्रातच मराठीचा मनापासून स्वीकार का नाही? उलट प्राथमिक शिक्षणात मराठी सक्तीची करायला विरोध आहे, संस्था कोर्टात जातात. लोकांना मला इंग्लिश नीट येत नाहीहे म्हणायची लाज वाटते, पण मराठीत मी कम्फर्टेबल नाहीहे म्हणायची लाज वाटत नाही, बहुधा एक प्रकारचा अभिमानच वाटतो. सगळा भारत एक आहे आणि सर्व भाषा आपल्याच आहेत, पण महाराष्ट्रातच मराठी भाषेला विरोध आहे. मराठी भाषेचा आग्रह धरण्याला जातीयतावादी, संकुचित समजलं जातं. बरं झालं कुसुमाग्रजांनीच आठवण करून दिलीय स्वातंत्र्यदेवतेची विनवणीया फटक्यात :
         परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा तरी
         मायमराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका
कुसुमाग्रज याचं कारणही सांगतात :
         भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे
तर उलट कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून कल्पना निघाली की महाराष्ट्रात प्रशासकीय सेवांसाठी होणार्‍या स्पर्धापरीक्षांना हिन्दी किंवा उर्दूचा पर्याय द्यावा. भारताच्या अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारसींचा त्यासाठी दाखला दिला गेला. खरी शिफारस आहे की एखाद्या राज्यात भाषिक अल्पसंख्याकांची लोकसंख्या राज्याच्या लोकसंख्येच्या १५% पेक्षा जास्त असेल तर शासकीय सेवा भरतीच्या परीक्षा त्या भाषेतही घेतल्या जाव्यात. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात हिन्दी भाषिकांची संख्या ११% आणि उर्दू भाषिकांची संख्या% आहे. तसा हा आकडा सुद्धा खरा मानता येणार नाही, कारण उर्दू म्हणजे मुस्लिमांची भाषा, अशी जातीयतावादी शिकवण देणार्‍यांनी मराठी मुस्लिम समाजाला पढवलंय की मातृभाषा उर्दू म्हणून नोंदवा - खरंतर येत नसते उर्दू, घरात मराठी बोलत असतात. उर्दूची धाव केळी के साल के उप्पर से धाड्‌कन्‌ पड्याएवढीच जात असते. पण जातीय धर्मांधतेपायी मराठीला नकार देऊन मातृभाषा उर्दू नोंदवतात.
    महाराष्ट्राचे थोर कार्यकर्ते, विचारवंत, साहित्यिक हमीद दलवाई सांगत असत की मराठी मुस्लिमानं मातृभाषा मराठीच सांगितली पाहिजे. म्हणून तर ते स्वत: जितके उत्तम कार्यकर्ते होते तितकेच उत्तम साहित्यिकही होते. त्यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी लिहिलेलं आत्मचरित्र मी भरून पावले आहेआणि त्यांचंच कार्य पुढे चालवणारे त्यांचे सहकारी सय्यदभाई यांचं आत्मचरित्र दगडावरची पेरणीहे मराठी साहित्यिकांचे सार्वकालिक आदर्श नमुने आहेत. पण संकुचित, विषारी अज्ञानातून परशुरामाच्या प्रतिमेला विरोध करणार्‍या शक्ती मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथिंदडी हमीदभाईंच्या घरापासून काढू देत नाहीत. मग अध्यक्ष कोतापल्ले सांगतात हे सेक्युलरव्यासपीठ आहे! साहित्य संमेलनात साहित्य कमी, राजकारण जास्त; मराठी भाषेची जोपासना कमी, हेवेदावे, गटबाजी, पायखेचणीच जास्त.
    वर दुष्काळात तेरावा महिना, प्रशासकीय सेवांच्या स्पर्धापरीक्षांमध्ये हिन्दी-उर्दूचा पर्याय देण्याचा प्रस्ताव. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे, लोकभाषाही आहे. राज्याच्या प्रशासनात काम करण्यासाठी जी परीक्षा घ्यायची ती मराठीतूनच असायला हवी कारण निवडल्या जाणार्‍या अधिकार्‍यांना सामान्य जनतेशी संवाद ठेवायचाय, मराठीतून प्रशासन चालवायचंय, इतक्या साधा भूमिकेचा विसर पडतो. महाराष्ट्रात यायचं, राहायचं, काम करायचं, घर घ्यायचं तर मराठी आलीच पाहिजे हा आग्रह राहिला दूर, प्रशासकीय सेवांच्या भरतीतच मराठीला पर्याय हिन्दी-उर्दूचा. तुका म्हणे त्यातल्या त्यात महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं हा प्रस्ताव नाकारला - कोण तरी शहाणं आहे म्हणायचं तिथे. पण असा प्रस्ताव येऊ शकतो हीच काळजीची गोष्ट आहे. आत्ता आला, बारगळला, पण परत येणारच नाही याची खात्री देता येत नाही.
    मराठीला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत - पण अजून बराच लांबचा पल्ला गाठायचाय. दरम्यान तमिळ भाषा अभिजात भाषा म्हणून मान्यता पावली सुद्धा. मराठी ही ज्ञानभाषा असायला हवी, नवं ज्ञान, नवं संशोधन मराठीतून व्हायला हवं हा विचारच कमी होताना दिसतो. भाषा सतत विकसित होत राहायला हवी, तिनं नवे नवे प्रवाह सामीलही करून घ्यायला हवेत आणि नवे नवे प्रवाह निर्माणही करायला हवेत.
    तेवढं मात्र काही क्षेत्रांत होताना दिसतंय. मधल्या काळात मराठी चित्रपटांना आलेली अवकळा दूर होऊन मराठी चित्रपट नव्या प्रतिभावंत कलाकृती देतोय - दादासाहेब फाळकेंनी निर्माण केलेल्या पहिल्या चित्रपटाच्या शताब्दी वर्षाच्या काळात हे घडतंय ही आनंदाचीच गोष्ट आहे. गिरीश कर्नाड किंवा पंडित सत्यदेव दुबेंच्या उंचीची माणसंही म्हणत असत की भारतीय नाट्यसृष्टीत नवीन काही प्रथम कुठे घडत असेल तर ते मराठी नाट्यसृष्टीत. साहित्य आणि नाट्य संमेलनांच्या राजकारणापासून, येड्याचा बाजार करून ठेवणार्‍या बोगस मतदानापासून दूर अनेक तरुण कवी, लेखक, कलाकार, अभिनेते, दिग्दर्शक उत्तम कलाकृती निर्माण करतायत.
    मानवी जीवनांतल्या विविध क्षेत्रांमधली प्रतिभावंत नवनिर्मिती आणि विस्कटलेलं, विषारी होऊन बसलेलं राजकीय-सामाजिक जीवन यामध्ये मात्र विलक्षण तुटलेपण आहे, दरी आहे, विसंगती आहे. काही काळापूर्वी जपानमध्ये प्रवास करण्याची मला संधी मिळाली होती. जपानची लोकसंख्या सुमारे १२ कोटी, म्हणजे जवळपास महाराष्ट्राएवढीच. पण जपानला भाषिक न्यूनगंडाचा कुठे त्रास होताना दिसत नव्हता. इंग्लिशचा स्वीकार केलेला असून सर्वत्र भाषा, पाट्या जपानी भाषेत, लिपीत होत्या. मेडिकल, इंजिनियरिंगसकट सर्व ज्ञानशाखांमधलं थेट पीएच्‌.डी. पर्यंतचं शिक्षण जपानी भाषेत मिळण्याची व्यवस्था आहे, त्याची नोकर्‍या-उद्योगांनी नीट गाठ जोडलेली आहे. वैभवानं ओसंडून वाहणार्‍या आठ पदरी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना आठ-आठ मजली पुस्तकांची दुकानं आहेत, त्यातले पहिले सात मजले जपानी भाषेतल्या पुस्तकांनी भरलेले आहेत आणि सर्वच मजले जपानी माणसांनी भरलेले. महाराष्ट्रालाच भरलेली धाड दूर होईल तर कुसुमाग्रजांची जन्मतिथी खर्‍या अर्थानं साजरी होईल, नित्य नवा मराठी दिसजागृतीचा होईल.

Tuesday, February 26, 2013

हरवलेले आत्मभान



    ...आणि आपण सगळेच
लेखांक ५३
 


सामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य

 

हरवलेले आत्मभान

    दीर्घकाळचा मुंबईकर रहिवासीही सांगतो की आत्तासारखी थंडी बारा वर्षांत अनुभवली नव्हती.
    पॅसिफिकच्या किनार्‍यावरच्या काही गावांमध्ये वावरताना, निळाशार महासागर - काठावरची उत्साह देणारी थंड हवा उरात भरून घेताना मला वाटलेलं आहे की मुंबई-कोलकाता-चेन्नई - एकूणच भारतातलं हवामान उष्ण आहे, दमछाक करणारं आहे - राजकीय-सामाजिक व्यवस्थाही दमछाक करणारी आहे.
    पण त्यातही मुंबई जास्त. उष्णता, आर्द्रता, धूळ, आवाज... सकाळी घातलेला पांढरा शुभ्र शर्ट संध्याकाळपर्यंत घामानं चिंब आणि प्रदूषणानं काळवंडलेला असतो. एक कोटीहून जास्त माणसं या महानगरात पोटापाण्यासाठी दिवस-रात्र धावत असतात. भारतातल्या १२१ कोटींचाच एक तुकडा.
    भूगोलाचा मनुष्यस्वभावाच्या जडणघडणीवर प्रभाव पडतो आणि या दोन्हीच्या क्रियाप्रक्रियांमधून इतिहास-वर्तमान आकाराला येतो.
***
    तर सध्या मुंबईच्या हवेत आल्हाददायक गारवा आहे. या काळात दरवर्षी - रोहित पक्षी - फ्लेमिंगोज्‌ मुंबईत उतरतात, शिवडीजवळ. तो फ्लेमिंगोज्‌चा नजारा पाहायला आम्ही गेलो होतो - आम्ही म्हणजे सपत्निक. पहिल्यांदा जाताना जेट्टीची वाट शोधत, विचारत जावं लागलं. भारतात GPS, गुगल्‌-अपल्‌ वगैरे अॅप्स पराभूत होतात. ह्यूमिंटह्यूमन इंटेलिजन्स्‌ - काम करतो. विचारलं की माणसं बरोबर सांगतात. पण त्यांना फ्लेमिंगोज्‌ किंवा रोहित म्हटल्यानं काही लक्षात येत नाही, ‘चिडिया देखने आए हो?असं विचारतात. पहिल्या पहिल्यांदा आपल्याला त्रास होतो. मग सवय होते. अच्छा चिडियाअसं आपणही म्हणतो तेव्हा एस्थेटिक सेन्स्‌च्या पतनाला सुरुवात झालेली असते.
    इथपासूनच मला समकालीन भारतीय संस्कृतीच्या वास्तवाचं रूपक वाटणं चालू झालेलं असतं. आत्मभान हरवलेलं असल्यामुळे आपल्याच रोहित पक्ष्यांच्या भव्य गुलाबी कमालीच्या सुंदर थव्याला आपण चिडियाम्हणून निकालात काढतो आहोत. म्हणजे चिडियाही काही कमी महत्त्वाची किंवा कमी सुंदर नाही. पण फ्लेमिंगो म्हणजे चिडिया नव्हे. पण आत्मभान हरवलं की त्याबरोबर सौंदर्यदृष्टी सुद्धा हरवलेली असते.
    शिवडी जेट्टीकडे जाण्याचा रस्ताही खराब. कमालीच्या अस्वच्छतेनं भरलेला. शहर म्हणजे एक अजस्त्र कचरापेटी झालीय असं वाटावं इतकी अस्वच्छता. तिच्यात सहजपणे वावरणारी गरीब वस्ती. तेलकट काळवंडलेल्या ट्रक्स्‌, मोडकी तोडकी वाहनं. काय करणार भौ. आधी एक कोटीवर माणसांना जगायचंय, नंतर तुमचे पक्षी, सौंदर्यदृष्टी, आत्मभान वगैरे. जगणं - सर्व्हायव्हल्‌ - हेच आद्य आणि अंतिम आत्मभान आहे.
   शांतिनिकेतनमध्ये गुरुदेव टागोर आणि गांधीजींची भेट झाली होती. शांतिनिकेतनचा परिसर, वाहणारी विशाल गंगा, सायंकाळी पक्षी घराकडे परतत होते. गुरुदेवांनी गांधीजींना विचारलं, ‘तुमच्या तत्त्वज्ञानात उडणार्‍या, गाणार्‍या पक्ष्यांना स्थान आहे का?गांधीजींनी उत्तर दिलं होतं, ‘आहे ना, पण उडण्या-गाण्यासाठी आधी त्यांचं पोट भरलेलं पाहिजे याची चिंता माझं तत्त्वज्ञान आधी करतं.
    सगळी गर्दी, चिकचीक, खड्डेखुड्डे पार करून किनार्‍यावर पोचलो की हजारो फ्लेमिंगोज्‌चा थवा सामोरा येतो. त्यांच्या आकारांची सिमेट्री’, रचनेतला बॅलन्स्‌’, गुलाबी पंख. लांबलचक डौलदार माना... हजारो फ्लेमिंगोज्‌ एकावेळी उडाले तर आकाश भरून टाकतात. दृश्यं आपल्याला भारून टाकतात. किनार्‍यावर मोडकीतोडकी जहाजं, बोटी वेड्यावाकड्या अस्ताव्यस्त नांगरून पडलेल्या. वंगणाचा काळाशार तवंग किनार्‍यावर दूरवर पसरलेला. तिथेच कुठेतरी कदाचित ड्रेनेजही समुद्राला येऊन मिळत असावं, कारण सर्वत्र दुर्गंधी भरलेली - आणि हजारो फ्लेमिंगोज्‌ची नजरेचं पारणं फेडणारी, नजरेत न मावणारी कलाकारी.
    पुन्हा : भारतीय संस्कृतीचंच समकालीन वास्तव. आपल्या असामान्य शक्तीचं आपल्याला भान नाही, कदरही नाही.
    नायगारा धबधब्याचा नजारा पाहताना मला वाटलं होतं की निसर्गाचा चमत्कार तर अद्भुत आहेच, पण मानवनिर्मित कर्तृत्वानंही त्या नजार्‍याला असं काही कोंदण निर्माण करून दिलंय की दोन्हीच्या गुणाकारातून भव्य संस्कृती आकाराला आलीय. भारतातही सर्वत्र निसर्गाचे अद्भुत चमत्कार आहेत, पण आपण अजून त्यांना सुसंघटित मानवनिर्मित कोंदणात बसवलेलं नाही. आपण अजून ओळखलेलंच नाही स्वत:ला.
    शिवडी जेट्टीवरही फ्लेमिंगोज्‌ना पाहायला तशी माणसांची फारशी गर्दी नसते. गर्दीचा जीवनसंघर्ष जारी असतो.
***
    एकीकडे एका घटकाचा विकासही वेगानं होतोय. नवी टोलेजंग बांधकामं उभी राहताय्‌त. अमेरिकन जीवनमान जगू शकणारा, अमेरिका, युरोप आणि अन्य विकसित देशांच्या मध्यमवर्गीयांच्या तोडीस तोड एक भारतीय मध्यमवर्गही तयार झालाय. लोअर परेलची अपर वरळीझालीय. १९८२ मध्ये सुरू झालेल्या दत्ता सामंत प्रणीत संपापासून संपत गेलेला कामगार वर्ग तर देशोधडीला लागला. गावाकडे परतून शेती करायला ज्यांच्याकडे जमिनी नव्हत्या त्यांच्या पोरीबाळींना लेडीज्‌ बारमध्ये रोजगाराची हमी मिळायला लागली. बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमिनींचा प्रश्न नीट हाताळण्याऐवजी सरकारनं सोयीस्कर विलंब केला. त्या जागांवर आलिशान, टोलेजंग इमारतींसहित अय्याशीच्या जागा उभ्या राहिल्या. बंद पडलेल्या गिरणीच्या जागी बोलिंग अॅलीतयार झाली. तिच्या दारात शोभेची वस्तू म्हणून पॉवरलूमठेवण्यात आला. शेजारी शोपीस म्हणून एखाद्या कामगाराचा सांगाडाही शोभला असता. आता या आठवड्यात घाटकोपर-चेंबूर मार्गावर मोनोरेलची यशस्वी चाचणी झाली.
१५ ऑगस्टपासून मोनोरेल धावेल, भारतातली पहिली. मग मुंबईची मेट्रोसुद्धा. बांद्रा-वरळी सी लिंकझाला, आता पुढे तो हाजी अली, नंतर नरीमन पॉईंटपर्यंत सुद्धा होईल. प्रचंड भ्रष्टाचारातून उभा राहणारा मुंबईचा नवा विस्तारित विमानतळ सुद्धा होईल, मग जलवाहतुकीसाठी हॉवरक्रॉफ्टस्‌, उद्योगपतींची ट्रॅफिक जॅममधून सुटका करण्यासाठी इमारतींच्या डोक्यावर हेलिपॅड्‌स्‌ आणि हेलिकॉप्टर्स. गेटवे ऑफ इंडियापासून समुद्राच्या पोटातून उरण-अलिबागकडे रस्ता. सामनाचित्रपटातला मास्तर हिंदुराव धोंडे - पाटलाला म्हणतो तसं ऐकूनच गरगरायला होतं’. आत्तासुद्धा बांद्रा-कुर्ला कॉम्प्सेक्समध्ये गेलं तर कुर्ला-धारावीचा विसर पडायला होतं. जगातल्या कुठल्या तरी विकसित देशाच्या फोटोत शिरल्यासरखं वाटतं.
    विकास हवाच. परिवर्तनही कोणी हवं-नको म्हटल्यानं थांबत नाही. पण त्याचं कॅरॅक्टरहरवलंय. कारण तो विकास किंवा परिवर्तन आपल्या आतल्या शक्तीतून उत्स्फूर्तपणे उमलून येत नाहीये, बाहेरून कृत्रिमरित्या चिकटवलेल्या प्रमाणहीन आकारासारखा ओबडधोबड विकास होतोय. उभ्या राहणार्‍या वास्तू, विमानतळांना प्रतिभासंपन्न सौंदर्यदृष्टीचं चरित्रलाभत नाही, नुसत्या ठोकळेबाज आडव्या तिडव्या रेघांचे बोचरे कंगोरे उभे राहतात. उभ्या राहताना तात्पुरत्या तरी नव्या वास्तू छान वाटतात. बघता बघता त्या कळकटून जातात. त्यांच्या देखभालीची काही व्यवस्था नाही. मुंबईच्या डी.सी. रूल्समध्ये वास्तूंची बाहेरून नियमित रंगरंगोटी आणि देखभाल करण्याविषयी नियमच नाहीत. बघता बघता रंग उडून जातात, वास्तू काळवंडतात, पोपडे पडतात, आत राहणारे लोक आपापल्या घरांची काळजी घेतात, पण संपूर्ण वास्तूची काळजी घेण्याची व्यवस्थाच उभी राहात नाही. मूळ वास्तू उभी करणारा त्याचा नफा घेऊन निघून गेलेला असतो. आता उरते फाटाफूट, ताटातूट, काळवंडलेल्या भिंती.
    पुन्हा भारतीय संस्कृतीच्या समकालीन वास्तवाचंच रूपक. मूळ भव्य, प्रतिभासंपन्न संस्कृतीला आलेलं कळकट रूप. आत्मभान हरवलेलं.